अध्यात्मवादी तत्त्वज्ञानी सांगतात की कला म्हणजे सौंदर्याच्या गूढ कल्पनेचे किंवा परमेश्वराचे प्रकटीकरण होय. परंतु खरोखर तसे काही एक नाही; तसेच शरीरदृष्टया कलेचा विचार करणारे कला म्हणजे खेळ मानतात, तसेही नाही; केवळ बाह्य साधनांनी स्वतःच्या भावना प्रकट करणें म्हणजेही कला नाही; आणि केवळ सुख देणे म्हणजे तर कला नाहीच नाही. कला हे मानवाचे हृदयैक्य करणारें ऐकात्म्य करणारे बलवान साधन आहे, कलेने आपणास दुस-यासही स्वतःच्या भावनात मिळवून घेता येते. म्हणूनच व्यक्ति किंवा समाज यांच्या उन्नतीसाठी कला अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच जीवनात कलेचे फार महत्त्व आहे.

मनुष्याला स्वतःचे विचार वाणीच्याद्वारा, शब्दांच्याद्वारा प्रकट करीता येतात ही फारच सुंदर व थोर गोष्ट आहे ! कारण या शक्तीमुळे मानवजातीने पूर्वी विचारक्षेत्रांत काय काय केले आहे ते आपणांस कळू शकते. या शब्दशक्तीमुळे दुस-यांचे विचार आपणास समजतात. या शक्तीमुळेच मनुष्य दुस-याच्या कार्यात सहकारी होऊ शकतो, व जे विचार दुस-यांपासून घेऊन स्वतःच्या जीवनात त्याने मिसळून दिले आणि जे विचार त्याला स्वतःला स्फुरले ते सारे विचार समकालीनास व पुढे येणा-या पिढीस तो देऊ शकतो. मनुष्यामध्ये दुस-यांच्या भावनांशी एकरूप होण्याची दुसरी एक शक्ती आहे व ही पण फार थोर अशी गोष्ट आहे. कलेच्याद्वारा समकालीन लोकांच्या जीवनाशी, अनुभवांशी, तसेच प्राचीनांच्या अनुभवांशी, प्राचीनांच्या सर्व भावनांशी मनुष्य एकरूप होऊ शकतो; तसेच स्वतःच्याही भावना समकालीनांस व पुढे येणा-यांस तो देऊ शकतो ही किती सुंदर गोष्ट आहे दुस-याच्या भावनांबोधींत डुंबावयास सापडणे किती भाग्याची गोष्ट आहे ?

पूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी जे विचार केले, ते ग्रहण करण्याची शक्ती जर मनुष्यात नसेल, त्याप्रमाणे स्वतःचे विचार दुस-याला देण्याची जर शक्ती माणसांत नसेल, तर माणसे रानटी पशूच होतील. त्यांची कॅस्पर होसर याच्यासारखी स्थिती होईल.

तसेच कलेनें दुस-यांच्या भावनांशी एकरूप होण्याची शक्ती जर माणसांत नसती तर लोक पशुहूनही पशू झाले असते. ते एकमेकांपासून दूर राहिले असते व परस्परांचे कट्टे दुष्मन बनले असते. यासाठी कला ही फार महत्त्वाची वस्तु आहे. वाणीइतकीच कलाही महत्त्वाची आहे आणि म्हणूनच तिचा भरपूर सर्वत्र प्रसार झालेला आहे.

वाणीचा उपयोग ज्याप्रमाणे व्याख्यानें, प्रवचनें किंवा ग्रंथ लिहिणे एवढया पुरताच होतो असे नाही तर आपल्या हरघडी होणा-या व्यवहारांत, विचारविनिमयांत स्वतःचे अनुभव सांगताना तिचा उपयोग होतो त्याचप्रमाणे व्यापक अर्थ जर केला तर कलाही सर्व जीवन व्यापून राहिली आहे असे दिसून येईल. परंतु सर्व शाब्दिक व्यवहारांस ज्याप्रमाणे आपण वाक्य म्हणत नाही, त्याप्रमाणे कलेच्या सर्व स्वरूपांस आपण कला हा शब्द लावीत नाही. कलेच्या अर्थाची व्याप्ति कमी करून काही विवक्षित कलास्वरूपांनाच आपण कला ही संज्ञा देत असतो.

आपण नाटकगृहांत, जलशांत, प्रदर्शनात जे पाहतो किंवा ऐकतो त्याला कला म्हणण्यात येते; त्याप्रमाणेच सुंदर इमारती, पुतळे, काव्ये, कादंब-या, या सर्वांना कला म्हणून समजण्यात येते, ह्या सर्व गोष्टींना कला म्हणण्याचा आपण परिपाठ पाडिला आहे. परंतु जीवनात परस्परांशी व्यवहार करीताना, एकमेकांचे बरे वाईट अनुभव एकमेकास निवेदन करताना ज्या कलेचा आपण उपयोग करतो, त्या कलेतील
-------------------------------------
(१ टीप  : कॅस्पर हॉसर हा नूरबर्गच्या मार्केटांत १८२८ च्या २३ मे ला सापडला. त्याला त्यावेळेसच फारच थोडे बोलता येत असे. तो वयाने साधारण १५-१६ वर्षांचा होता. त्याला सर्वसामान्य वस्तूंचेही फारच थोडे ज्ञान होते. मागून त्याने स्वतःची हकीगत सांगितली. एका तळघरात तो लहानाचा मोठा झाला. तेथे एकाच मनुष्य त्याच्याकडे जात असे व हा मनुष्यही क्वचितच दृष्टीस पडे.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel