ज्या कृती सहजतेने हृदयांतून झ-याच्या पाण्याप्रमाणे बाहेर पडलेल्या नसतात, ज्या डोके खाजवून व डोके आपटून निर्माण झालेल्या असतात, त्या कृतींना आदर्श ठरवून त्यांचे अनुकरण करण्याबद्दल हे टीकाकार शिफारस करीत असतात. (भावनाशून्यत्व हा येथून-तेथून सर्व टीकाकारांचा विशेष आहे. कारण तसे नसते तर कलाकृतींचे विशदीकरण किंवा विदारण करीत ते बसले नसते). टीकाकारांचा हा असा धर्म असल्यामुळे कलेची अपरंपार हानी ते करीत असतात. शोकान्त अशी ग्रीक नाटके, डान्टे, टॅसो, मिल्टन, शेक्सपिअर, गटे (गटेची तर प्रत्येक ओळ म्हणजे उत्कृष्ट कला आहे!); तसेच अर्वाचीन काळांतील इन्सेन, झोला यांच्या कृति; संगीतात बीथोव्हेनची शेवटची रचना व टॅसोची कृती-ह्या कलावानाच्या सर्व कृतींची-ह्या सर्व मस्तकोत्पन्न कृतींची टीकाकार स्तुती करीत असतात. आपण केलेल्या स्तुतीचे नवीन टीकाशास्त्र बनवून ते समर्थनही करीत असतात. (अशा शास्त्रांपैकीच आधुनिक सौंदर्यमीमांसा हे एक शास्त्र आहे.) आणि मंदच नव्हे तर मतिमान लोकही या अशा नवीन विचारप्रणालीस शिरसावंद्य मानतात. या नवीन शास्त्राप्रमाणे कलाकृती तयार होऊ लागतात. कधी कधी-खरे हाडाचे जिवंत कलावानही-स्वत:च्या हृदयाची हाक व भूक बाजूस सारून, ईश्वरदत्त प्रतिमेचा गळा दाबून या नियमांस शरण जातात व त्या नियमांप्रमाणे काहीतरी करण्यासाठी आटापिटी करतात.
टीकाकारांनी ज्या खोटया व कृत्रिम कलाकृतींची स्तुति केली असेल, ती कलाकृती इतर दांभिक व सोंगाडया कलाकृतींसही आत घेण्यासाठी दार उघडते. ती स्वत: कलामंदिरात शिरून या साळकायाघोळकायांसही आत घेतो.
सोफोक्लीस, युरिपिडीस, एसचाम्लस, विशेषत: अॅरिस्टोफेनस-यांच्या कृती रानवट, जंगली, सदभिरुचीस धक्का देणा-या अशा असूनही, त्यांची स्तुती अजून चाललीच आहे किंवा अर्वाचीन लेखकांतील डान्टे, टॅसो, शेक्सपिअर, मिल्टन आणि चित्रकारांतील रॅफेल एन्जेलो, संगीतांत बँक आणि बीघोव्हेन, विशेषत वीथोव्हेनची अंतिम रचना (शाबास या टीकाकारांची) यांची स्तुति चाललीच आहे. आणि इब्सेन, मॅटर्लिक, व्हर्लेन, मॅलर्मिस, फ्लिंगर्स, बॉक्लिन्स, स्टक्स, शिनेडर, वॅग्नर, जिस्झट, बर्लिऑस, प्रॅहॅम, रिचर्डस्ट्रास-हेही त्यांच्यांत मिळवा. हा सारा नकलाकार, त्यांचे नकलाकार, त्यांचे पुन्हा नकलाकार-अशा नकलाकारांचा प्रचंड तांडाच्या तांडा कलावान म्हणून मानण्याची आवश्यकता व शक्यता या टीकाशास्त्रामुळे झालेली आहे.
टीकाशास्त्राने अशा प्रकारे नकली गाणी भरपूर होण्याची सोय केली आहे. परंतु नकली मालाच्या प्रसारांचे याहूनही भयंकर असे तिसरे एक कारण आहे व ते म्हणजे ठिकठिकाणी असणारी कलागृहे, कलाभवने व कलाधामे!
कला ही केवळ श्रीमंतांसाठी म्हणून होतांच, ती धंदा झाली. ती धंदा म्हणून होताच निरनिराळया पध्दती अस्तित्वात आल्या, निरनिराळी तंत्रे शोधून काढण्यात आली. निरनिराळी शास्त्रे बनविण्यात आली. कलेचा धंदा करणारे ही तंत्रे, ही शास्त्रे, ह्या पध्दती शिकू लागले. त्यांना शिकविण्यासाठी शाळा उघडण्यात आल्या. पाठशाळांतून अलंकारशास्त्रे पढविण्यास येऊ लागली. निबंधलेखनाचे तास ठेवण्यात येऊ लागले; चित्रकलेसाठी, संगीतासाठी, नाटयकलेसाठी स्वतंत्र भवने व मंदिरे स्थापन होऊ लागली.
या कलाभवनांतून कला शिकवली जात असते! आणि खरोखर कला म्हणजे काय तर कलावानाला जो अंतरी उत्कट अनुभव आला, तो दुस-यास देण्याची कृती. आणि ही गोष्ट या शाळांतून, या मंदिरांतून कशी शिकवणार ते हरी जाणे!
कोणतीही शाळा मनुष्याच्या हृदयांत भावना उत्पन्न करू शकणार नाही किंवा त्या त्या माणसाने स्वत:च्या स्वभावानुरूप ती भावना प्रकट करावी हे तर नाहीच नाही शिकविता येणार. भावनेचा अनुभव व ती प्रकट करणे यांत तर कलेचे सारसर्वस्व आहे.