प्रकरण चौदावे
(कलेचा गुण (हा आकारावर अवलंबून असतो.) कलागुण हा कलाविषयापासून निराळा विचारण्यात येत असतो; कलेची खूण; कला तद्रूप करते; ज्यांची रूची बिघडलेली आहे, त्यांना कला समजणे अशक्य आहे; कला हृदयस्पर्शी केव्हा होईल? ज्या वेळेस तिच्यातील भावना कलावानाची स्वत:ची असेल, ती भावना स्पष्ट मांडलेली असेल व तिच्यात तळमळ असेल तेव्हा.)
आपल्या समाजातील आजची कला इतकी बिघडलेली आहे, इतकी विपरीत झालेली आहे की, असत्कलेलाच सत्कला असे म्हणण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर खरी कला म्हणजे काय याची दृष्टीही आज समाजात राहिली नाही; सत्कला ओळखताच येत नाही. आपल्या समाजात जी कला आहे तिच्यासंबंधी बोलता यावे म्हणून आधी सत्कला व असत्कला किंवा यथार्थ प्राणवान कला व सोंगाडी कृत्रिम कला यांतील भेद स्पष्ट करून दाखविला पाहिजे.
असत्कलेपासून, सोंगाडया कलेपासून खरी कला निवडण्याचे एक मुख्य अनिर्वाघ्य असे लक्षण आहे. खरी कला ही स्पर्शजन्य असते. ती दुस-याला त्याच भावनांचा स्पर्श करते. प्रयत्न न करता, स्वत:ची दृष्टी किंवा मते न सोडता, एखादी कलाकृती वाचून, ऐकून किंवा पाहून जर कलावानाच्या हृदयाशी एकरूप होण्याचा अनुभव आला, कलावानाशीच नव्हे तर त्या कलाकृतीने जे जे स्पष्ट झाले, त्यांच्याशीही एकरूप होण्याचा जर अनुभव आला तर ती खरी जिवंत कला आहे असे समजावे. आणि दुसरी एखादी कृती कितीही काव्यमय असली, हुबेहूब वर्णन करणारी असली रिझविणारी व सुखविणारी वाटली. काही परिणाम घडवणारी आहे असे जरी वाटले, तरी जर ती कलाकृती कलावानाशी तन्मयता करून देत नसेल, आपले व कलावानाचे आत्मैक्य करीत नसेल, हा धन्यतम कृतार्थतेचा आनंद आपणांस अनुभवता येत नसेल, त्या कलाकृतीने स्पष्ट होणा-या इतरांशी समरसता निर्मित नसेल तर, ती कलाकृती खोटी आहे, प्राणहीन आहे असे समजावे.
हे लक्षण प्रत्येकाच्या अनुभवावर अवलंबून राहणार, व्यक्तिगत राहणार हे खरे आणि ख-या कलेचे कार्य काय हे जे विसरून गेले आहेत, कलेपासून काहीतरी निराळेच जे मागत असतात. (आणि बहुतेक याच मामल्याचे असतात.) ते खोटया व सोंगाडया कलेपासून जी एक क्षुब्धता निर्माण होते, जे एक चांचल्य प्रतीतीस येते, त्यालाच मी ज्या भावनेबद्दल वरती लिहिले ती समजत असतात. ह्या प्रक्षुब्ध तेसच ते भावना म्हणतील व फसतील, ही गोष्ट खरी आहे. या लोकांची अशी फसगत होणे जरी अपरिहार्य असले तरी त्याला इलाज नाही. ज्याप्रमाणे ज्याला दिसतच नाही त्याला लाल म्हणजे हिरवे नव्हे हे पटवून देता येणे अशक्य आहे; परंतु हे असे असले तरी मी जे वर म्हणतो आहे ते खरे आहे. तीच सत्य दृष्टी आहे. ज्यांची कलेबद्दलची भावना बिघडलेली नाही, विकृत झालेली नाही, किंवा मेलेली नाही, अशांना वरील तत्त्व सत्य व पूर्णपणे निश्चित व नि:शंक आहे असे वाटते. कलाकृती ओळखण्याचे ते निर्विवाद लक्षण आहे असे हे मानतात. इतर सर्व भावनांपेक्षा कलेने हृदयांत उत्पन्न झालेली भावना काही निराळीच असते असे हे लक्षण स्पष्टपणे सांगत आहे.
या भावनेचे मुख्य वैशिष्टय हे की आपण त्या कलाकृतीमुळे कलावानाशी इतके तादात्म्य पावतो की ही कलाकृती जणू आपलीच आहे असे आपणांस वाटते; आपलेच हृदय येथे उघडे झाले आहे, आपलेच मुके मन येथे बोलके झाले आहे, आपल्याच हृदयात जे होते, जे आपणांस प्रकट करण्याची इच्छा होती, तेच येथे प्रकट करण्यात आले आहे असा जणू आपणांस अनुभव येतो. कलावान व आपण दोन भिन्न व्यक्ती आहोत हे बुध्दीतील, जाणिवेतील द्वैत या अनुभवामुळे नाहीसे होते, एवढेच नव्हे तर ज्यांनी त्या कलाकृतींपासून भावना ग्रहण केल्या असतील, त्यांच्याशीही आपण एकत्व पावतो. आपण आपले व्यक्तित्त्व व विशिष्टत्व विसरणे व इतरांशी तदाकार होणे यांमध्येच कलेची महान व आकर्षण शक्ती आहे, यातच कलेचे कलात्व आहे.