शास्त्राची कल्पनाच आपण अति विपरित केली आहे. शास्त्राने अर्भकांच्या मृत्युसंख्येस आळा घालावा, शास्त्राने वेश्याव्यवसाय बंद करावा, शास्त्राने भयंकर रोग होऊच देऊ नयेत व फैलावू देऊ नयेत, शास्त्राने पिढयान्पिढया चालणारा -हास थांबवावा, सरसकट होत जाणारी युध्दातील मूर्खपणाची कत्तल बंद करावी-शास्त्राने हे सारे करण्याचे अंगावर घ्यावे असे म्हटलेले ऐकताच शास्त्रज्ञ आ पसरून पाहू लागतात. हे ऐकून त्यांना अचंबा वाटतो, चमत्कार वाटतो. काय बावळटपणाचे सांगणे असे त्यांना वाटते, प्रयोगालयात बसून एका पेल्यातील प्रवाही पदार्थ दुस-या पेल्यात ओतणे. एखादा गॅस तयार करणे, प्रकाकिरणांचे पृथ:करण, बेडूक किंवा झुरळे यांची चिरफाड करीत बसणे, इत्यादि गोष्टींना भौतिकशास्त्र ही संज्ञा शोभते किंवा विशिष्ट शास्त्रीय परिभाषेत सामाजिक, आर्थिक, धार्मिक, तत्त्वज्ञानविषयक, ऐतिहासिक-अशा विषयांवर शब्दजाल विणणे यालाही शास्त्र ही पदवी शोभून दिसेल. ज्या शब्दजालांचा अर्थ स्वत: लिहिणा-यालाही स्वच्छ व स्पष्ट समजत नसतो, ज्या शब्दजालांचा उद्देश आहे तेच पुढे चालवा एवढेच सांगण्याचा असतो, अशा गोष्टींना सामाजिक शास्त्रे अशी भूषणाची संज्ञा देण्यात येत असते.

परंतु ज्याला सच्छास्त्र म्हणता येईल, ज्या शास्त्राबद्दल आदर वाटेल, ज्याला पूज्य मानता येईल, ते शास्त्र अशा स्वरूपाचे नसते. आजची शास्त्रे सच्छास्त्राचा मान मागत आहेत, परंतु तो त्यांना मिळणार नाही. मनुष्याने कशावर विश्वास ठेवावा, कशावर ठेवू नये, काय मानावे, काय मानू नये, मनुष्यांचे परस्परसंबंध कसे असावेत, सामुदायिक जीवन कसे चालवावे, समाजरचना कशी असावी, स्त्रीपुरुषांचे संबंध कसे असावेत, मुलांना शिक्षण कसे द्यावे, कोणते द्यावे, जमिनीचा उपयोग कसा करावा, जमिनीची वाटणी कशी करावी, जो श्रम करील त्याची जमीन किंवा वडिलोपार्जित हक्क सांगेल त्याची; परराष्ट्रांशी संबंध कसे असावेत, गाईगुरे, पशु, पक्षी यांच्याजवळ माणसाची वागणूक कशी असावी-इत्यादि  मानवी जीवनाला जे अति उपयुक्त व अति महत्त्वाचे आहे ते समजून घेण्यात खरे शास्त्र आहे.

खरे शास्त्र असेच होते व असेच पुढेही असले पाहिजे. असे शास्त्र आजही उत्पन्न होत आहे. परंतु अशा स्वच्छस्त्राला नाकारण्यात येत आहे. खोटे शास्त्रज्ञ या ख-या शास्त्राला उडवून देत आहेत. समाजाच्या आजच्या रचनेचे समर्थन करणारे समाजशास्त्रज्ञ या नवीन उदार व गंभीर सच्छस्त्राला नावे ठेवीत आहेत. ह्या शास्त्रात काही अर्थ नाही, याची जरूरी नाही, हे अशास्त्रीय शास्त्र आहे अशी नावे भौतिकशास्त्रज्ञ सुध्दा ठेवीत आहेत.

आजही पुष्कळ असे सद्ग्रंथ प्रसिध्द होत आहेत, ज्यांतून रूढिप्रिय धर्माचा फोलपणा व बाष्कळपणा दाखविलेला असतो. आजच्या काळाला अनुरूप अशा बुध्दिगम्य व स्वच्छ धर्माची आवश्यकता त्यांतून मांडलेली असते. परंतु ज्याला धर्मशास्त्र असे नाव दिले जाते ते अशा सद्ग्रंथांना नावे ठेवीत असते, आणि जे आचारविचार, ज्या रूढी आजच्या काळाला शोभत नाहीत, ज्यांना आज काही अर्थ नाही, आज केवळ भाररूप असे ज्यांचे अस्तित्व आहे, त्यांचेच समर्थन करण्यात, त्यांनाच पाठिंबा देण्यात हे धर्मशास्त्र मग्न झालेले असते. किंवा आज असे एखादे पुस्तक किंवा व्याख्यान छापले जाते की ज्यात जमीन ही खाजगी मिळकत नसावी हे तत्त्व मांडलेले असते. बहुजन समाजातील दारिद्रयाला जमिनीची खाजगी मालकी असणे हे एक महत्त्वाचे मुख्य कारण आहे, वगैरे विचार मांडलेले असतात. जे खरे अर्थशास्त्र असेल ते अशा पुस्तकांचे स्वागत करील, या विचारांचा आणखी विकास करील. या विचारांतून सुचलेल्या आणखी कल्पना मांडील परंतु व्याजांचे अर्थशास्त्र असे काही तर नाहीच करीत, उलट ह्या विचाराच्या विरुध्दच बाजू ते मांडीत असते. इतर मालमत्तेप्रमाणे जमीनसुध्दा काही थोडयांच्याच हातात एकत्रित होणे इष्ट आहे, अशाप्रकारचे मत हे खोटे अर्थशास्त्र प्रतिपादीत असते. लढाई, फाशीची शिक्षा इत्यादि गोष्टी मूर्खपणाच्या आहेत, अविवेकाच्या व अनैतिक आहेत. ख-या शास्त्राने ह्या गोष्टी पटवून दिल्या पाहिजेत असे एखादे पुस्तक सांगत असते. वेश्यांचा धंदा हा अपायकारक व माणुसकीस न शोभणारा आहे असे दुसरे एखादे पुस्तक सांगते. मादकपेये पिणे, मांस खाणे हे योग्य नाही, युक्त नाही, हितावहही नाही-मानवास हे शोभत नाही असे तिसरे एखादे पुस्तक सांगते. देशाभिमान ही कल्पना आता जुनाट झाली, ती विवेकहीन व फार धोक्याची आहे असे आणखी एखादा ग्रंथकार गंभीरपणे सांगतो. असे ग्रंथ होत आहेत. अशा प्रकारचे विचार धैर्याने मांडणारे ग्रंथकार दिसू लागले आहेत. परंतु या सर्व ग्रंथांना अशास्त्रीय असे संबोधण्यात येते! आणि जे ग्रंथ विषमता राहिली पाहिजे, युध्दे चालली पाहिजेत, मांसमद्याचे सेवन केले पाहिजे, वेश्याव्यवसायाची जरूरच आहे, फांशीची शिक्षा नसेल तर गुन्हे वाढतील, कोमल अंत:करणाचे होणे नेहमीच चांगले नसते असे सांगतील, अशा ग्रंथांना सामाजिक शास्त्रे ही पदवी मिळत असते! आणि जे शोध, जे बोध, केवळ पोकळ जिज्ञासेची तृप्ती करतात, ज्यांचा मानवी जीवनाच्या हितमंगलाशी, विकासाशी काडीचाही संबंध नसतो, अशा गोष्टींनाही भौतिक शास्त्रे ही महनीय पदवी देण्यात येत असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel