दुसरा दुष्परिणाम असा की धंदेवाईक कलावानांच्या टोळयांच्या टोळया करमणुकीच्या व विलासाच्या कलाकृती बेसुमार निर्मित आहेत की त्यामुळे श्रीमंत व धनिक लोकांना आपले अस्वाभाविक जीवन चालवणे शक्य होते. जी मानव्याची थोर तत्त्वे हे श्रीमंत लोक कधी कधी बोलून दाखवितात, त्याच तत्त्वांशी अत्यंत विसंगत व विसदृश अशी जीवने ते जगत असतात व तसे करणे त्यांना शक्य होते. कर्मशून्य श्रीमंत लोक जगतात तसे जगणे, विशेषत: श्रीमंत व विलासी रमणी जे जीवन जगतात तसे जगणे हे निसर्गापासून फार फार दूर आहे. भूतमात्रांच्या जीवनापासून हे जीवन फारच वेगळे असते, फारच भिन्न असते; असे जीवन त्यांच्याशिवाय कोणाचेच ह्या सृष्टीत नसेल; केवळ कृत्रिम असे हे जीवन असते. शरीराच्या निरनिराळया अवयवांस ताणतील, बांधतील, रंगवतील, टोचून घेतील, शरीराचे हालहाल करून घेतील. या रमणींची जीवनशक्ती इतकी क्षीण झालेली असते, त्यांच्या जीवनातील आरोग्यमय उत्साह, खरा आनंद इतके दूर गेलेले असतात की आज जिला कला म्हटले जाते ती जर नसती, तर या रमणींनी आत्महत्याच करून घेतली असती! या कलेच्या करमणुकीशिवाय जगणे त्यांना अशक्य व असह्य झाले असते. श्रीमंतांना स्वत:च्या जीवनांतील अर्थशून्यता या करमणुकीच्या कलेमुळे दिसून येत नाही. हे धंदेवाईक कलावान् दिमतीला आहेत म्हणून श्रीमंतांना स्वत:चे जीवन तितके नीरस व कंटाळवाणे होत नाही. जलसे, नाटकगृहे, सिनेमा, प्रदर्शने, गायनवादननर्तन, कादंब-या हे सारे ह्या श्रीमंतांपासून हिरावून घ्या म्हणजे मग आज जे जीवन ते चालवीत आहेत ते चालविणे त्यांना जड जाईल. प्रत्येक क्षण त्यांना खायला येईल. वेळ त्यांना दवडता येणार नाही, वेळ कसातरी मारता येणार नाही. तो वेळ मग त्यांच्या बरोबर बसेल. वर सांगितलेल्या गोष्टींनी त्यांचे जीवन भरलेले असते, म्हणून त्यांना ते रिते भास नाही. या गोष्टींत निशिदिन दंग राहणे म्हणजेच खरे श्रेष्ठ, सुसंस्कृत व कलावंत जीवन असे त्यांचे मत असते. चित्रे विकत घेणारे, संगीतज्ञांस साहाय्य देणारे, लेखकांना हातभार लावणारे, असे हे श्रीमंत लोक आपण कलेचे पुरस्कर्ते आहोत म्हणून मिरवीत असतात. कलावान् लोकांशी ते परिचय ठेवतात व पैशाने हा परिचय वाटेल तेव्हा मिळतो. ह्या सा-या गोष्टी जर दूर झाल्या, ह्या कलाच नाहीशा झाल्या, हे पुरस्कर्तृत्व दूर झाले, त्यामुळे वाटणारा मोठेपणा नाहीसा झाला तर मग श्रीमंत जगू शकतील का? त्यांचे रिते जीवन, पोकळ जीवन त्यांना किती क्षुद्र व अर्थहीन आहे हे त्यावेळेस त्यांना समजून येईल. आपली जीवनपध्दती कृत्रिम, घातुक, मनुष्यांना न शोभेशी आहे हे तेव्हाच त्यांना दिसेल. त्यांचे डोळे तेव्हाच उघडतील. कृत्रिम कलेत गुंगत राहिल्यामुळे त्यांना जगणे आज शक्य होते. त्यांमुळेच स्वत:च्या जीवनातील फोलपणा, निर्दयपणा व अस्वाभाविकपणा त्यांना दिसत नाही. नैसर्गिक जीवनावर सारखे अतिक्रमणच त्यांनी चालविलेले असते. अशाप्रकारे श्रीमंत वर्गाचे जे अयोग्य व अन्याय्य जीवन, त्या जीवनाला ही धंदेवाईक विकृत कला आधार देते, ते जीवन त्यांना शक्य करते, हा या विकृत कलेचा दुसरा मोठा दुष्परिणाम होय.
या विपरीत कलेचा तिसरा दुष्परिणाम म्हणजे सर्वसामान्य जनता व मुले यांचा होणारा बुध्दिभेद; वरच्या वर्गातील कलेच्या विपरीत कल्पनांनी ज्यांची मने अद्याप कलुषित व कलंकित झालेली नसतात, असे जे कामकरी व अशी जी मुले, त्यांच्या मनात कोणाला मान का द्यावा, कोणाची स्तुती का करावी, कोणाची पूजा का करावी, ह्याबद्दल काही निश्चित कल्पना असतात. शेतकरी किंवा मुले यांना शारीरिक शक्ती व नैतिक शक्ती यांच्यासमोर नमले पाहिजे ही गोष्ट ठावूक असते. हरक्युलीससारख्या बलभीमासमोर किंवा बुध्द-ख्रिस्तांसारख्या महात्म्यांसमोर (ज्या बुध्दाने मानवजातीच्या कल्याणासाठी सुंदर व तरुण पत्नी, समृध्द असे राज्य यांचा त्याग केला, आणि ज्या ख्रिस्ताने सत्यासाठी क्रॉसला कवटाळले हे व असेच इतर हुतात्मे) आपण लवावे, त्यांची आपण स्तुती करावी हे त्यांना माहीत असते. शारीरिक बळ व अध्यात्मिक बळ दोन्ही पूजार्ह आहेत ही गोष्ट त्यांना समजत असते. संत व वीर या दोघांना ते जाणतात. शारीरिक बळाला मान दिलाच पाहिजे, कारण नाहीतर मान द्यावयाला ते भाग पाडील, ही गोष्ट ते समजतात. त्याचप्रमाणे दिव्य प्रेम, थोर आध्यात्मिक सामर्थ्य यांची पूजा करणे म्हणजे धर्मच आहे. ही गोष्टही अधिकृत मनाचे ते शेतकरी, कामकरी व त्यांची मुले ओळखीत असतात, कारण अशा थोर संतांकडेत्यांचे सारे अंतर जीवन ओढ घेत असते; येथे जुलमाचा रामराम नाही तर हृदयातील भक्तीचा प्रणाम असतो.