आजकाल ख-या सत्कृती निवडणे हे फार कठीण झाले आहे. याचे कारण हे की ज्या खोटया कलाकृती आहेत, ज्यांच्यांत प्राण नाही, आत्मा नाही, हृदय नाही, भावना नाही, त्या सा-या उत्कृष्टपणे नटूनथटून उभ्या असतात. सत्कृतींच्या बाह्य रूपलावण्यापेक्षा यांची बाहेरची शोभा कितीतरी थाटामाटाची असते. यांचा शृंगारसाज अपूर्व असतो. भावनांची भरपाई भूषणांनी केलेली असते. आतील रिक्तपणा बाहेरच्या डामडौलाने भरून काढलेला असतो. या खोटया व नटव्या कलाकृती मन मोहून घेतात, तात्पुरता परिणाम घडवितात, मोहिनी घालतात. या कलाकृतींतील विषयही गुदगुल्या करणारा असतो असतो, करमणूक करणारा, रिझवणारा असा असतो. अशा परिस्थितीत विवेक कसा करावयाचा, निवड कशी करावयाची? सत्कलेचे अनुकरण करण्यासाठी सत्कलेहूनही बाह्य सजावट ज्यांनी केली आहे व ज्या सत्कलांच्या शेजारी उभ्या आहेत, तेथे हे सत् व हे असत् कसे अलग करावयाचे, हंसक्षीरन्याय कसा अंमलात आणावयाचा?
ज्याचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण व शाबूत आहे आहे वन्यपशूला रानांतील हजारो मार्गातून स्वत:चा माग शोधून काढणे ज्याप्रमाणे कठीण जात नाही, त्याप्रमाणेच ज्यांची रूची बिघडलेली नाही अशा शेतक-यांना-कामक-यांना खरी कला निवडून काढणे जड जात नाही. खेडयांतील साधा सरळ मनुष्य-ज्याला अद्याप कृत्रिमतेचा वारा लागला नाही, ज्याच्या नाकाला अद्याप वास येत नाहीसा झालेला नाही. तो ही निवड पटकन करतो. मनुष्याच्या स्वाभाविक गुणांचा जर बिघाड झालेला नसेल तर तो हजारो दांभिक कलाकृतींतून सत्कलेचा नमुना नेमका निवडून काढील. खरी फुले व कृत्रिम कागदी फुले एकत्र ठेवली तरी मधमाशी ज्याप्रमाणे नेमकी ख-या रसगंधयुक्त फुलांवरच बसेल, त्याप्रमाणे कृत्रिम कलाकृती व ख-या जिवंत कलाकृती यांची जरी एकत्र खिचडी झालेली असली तरी खरा गुणग्राही मनुष्य त्यातून खरी कृती निवडून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याला ते जड जाणार नाही. परंतु शिक्षणाने व जीवनाच्या विचित्र पध्दतीने ज्यांची रुची बिघडलेली आहे, अशांना मात्र हे साधत नाही. अशा लोकांची ग्रहणशक्ती दुबळी झालेली असते. त्यांच्या नाकाला वासच येत नाहीसा झालेला असतो. त्यामुळे कलाकृतीचे मोल स्वत:च्या सहज भावनेने त्यांना करता येत नाही. अंत:प्रेरणेने हे अचूक निवडीचे काम त्यांना करता येत नाही. चर्चा करून, वादविवाद करून ते मोल ठरवितात. परंतु या चर्चा, हे अभ्यास, हे वादविवाद गोंधळ मात्र करतात. त्यामुळे आजच्या वरच्या वर्गातील पुष्कळांना ढोंगी व निस्सार कलाकृतींपासून सत्कलाकृती निवडताच येत नाहीसे झाले आहे. तासनतास नवीन नाटक पाहायला, नवीन संगीत ऐकायला ते कंटाळा न दाखवता बसतात. प्रसिध्द अशा कादंबरीकाराच्या सर्व कृती वाचणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे असे ते मानतात. ज्या चित्रांतील कल्पना बुध्दीस समजणे अशक्य असते अशी जी चित्रे ते पाहतात. आणि हे सारे पाहून, मनास वाटो न वाटो, समजो न समजो, हृदय हलो वा न हलो, आपण मान डोलवली पाहिजे. 'वा काय सुंदर, ही खरी कला' असे म्हटले पाहिजे असे त्यांना वाटत असते. परंतु ख-या सत्कृतीकडे ते लक्षही देणार नाहीत, त्यांच्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. उलट त्यांचा तिटकारा दाखवतील, तिरस्कार करतील; याचे कारण एवढेच असते की त्यांच्या मंडळांत सामान्य कलाकृतींची जी सन्मान्य यादी असते त्या यादीत त्या सत्कृतींचा समावेश केलेला नसतो!
काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मी फिरायला जाऊन परत घरी येत होतो. त्या वेळेस मला जरा बरे वाटत नव्हते. मन जरा खिन्न व निरुत्साह झाले होते. होते असे कधी कधी. मी घराजवळ येतो तो शेतक-यांच्या बायकांचे गाणे ऐकू आले. त्या मोठमोठयाने गाणे म्हणत होत्या. ते सामुदायिक गाणे होते. सर्व मिळून म्हणत आली होती. शेतकरिणी त्या माझ्या मुलीच्या आगमनानिमित्त त्यांना झालेला आनंद ते गाणे गाऊन प्रकट करीत होत्या. त्या गाण्यांत त्यांचे ते हेल, त्यांच्या विळे-कोयत्यांचे खणखणणे, सारे मिसळलेले होते. त्या गाण्यांत इतका उत्कट आनंद होता, इतकी स्वच्छ व हृदयपूर्ण भावना होती, इतका उत्साह होता, इतकी सहजता होती, की त्या गाण्याचा माझ्यावर जादूसारखा परिणाम झाला. तो परिणाम माझ्यावर झाला हे माझ्या लक्ष्याही आले नाही. परंतु माझा खिन्न चेहरा एकदम प्रफुल्लित झाला. माझा निरूत्साह सारा पार मावळला व मी आनंदाने भरलेला असा घरात शिरलो.