अठराव्या शतकात जर्मनीच्या बाहेर ही अशा प्रकारची कलेसंबंधीची व सौंदर्यासंबंधीची मते होती. जर्मनीत विकेलहॅमनंतर सौंदर्यविषयक नवीन मते निर्माण झाली. या नवीन विचारसरणीचा कान्ट हा जनक आहे. १७२४ ते १८०४ हा याचा काळ. सौंदर्य व मला म्हणजे काय ह्याबद्दलची जास्तीत जास्त स्पष्ट कल्पना त्याने करून दिली.

कान्टची सौंदर्यविषयक शिकवण पुढे दिल्याप्रमाणे आहे :

स्वत:च्या बाहेर असलेल्या या सृष्टीचे ज्ञान मनुष्याला असते व स्वत:चेही सृष्टीशी संबध्द असे काही ज्ञान असते. मनुष्य स्वत:च्या बाहेर सत्यासाठी शोध करीत असतो व स्वत:मध्ये तो साधुतेचा शोध करीत असतो. सत्यशोधन हे केवळ शुध्दबुध्दीचे काम आहे व साधुत्वसंशोधन हे व्यावहारिक बुद्धिचे काम आहे. संशोधनाच्या ह्या दोन साधनांखेरीज तिसरे एक साधन असते-ते म्हणजे निर्णायक शक्ती. ही निर्णायक शक्ती बुध्दिवाद न करताच निकाल देत असते व इच्छा नसताही सुख निर्मिते. ही निर्णायक शक्ती सौंदर्यविषयक भावनांचा पाया आहे. बुध्दीचा उपयोग करावयास न लावता, विचार वगैरे न करिता ज्यामुळे सहजच समाधान व सुख होते, ते सौंदर्य होय-असे कान्टचे मत आहे. तेथे व्यावहारिक फायदे, लाभालाभ इत्यादींचा हिशोबी विचार नसतो. एकदम सुखानुभूती आल्याशिवाय राहातच नाही. सौंदर्याची ही व्यक्तिनिष्ठ व्याख्या होय. आता वस्तुनिष्ठ सौंदर्य म्हणजे काय ते पाहू. स्वत:च्या हेतूला योग्य असा जो वस्तूचा आकार-तो आकार, ते रूप म्हणजे वस्तूचे बाह्य सौंदर्य होय. ह्या वस्तूकडे उपयोगाच्या दृष्टीने आपण पहावयाचे नसते. त्या वस्तूच्या तिच्या धर्मानुरूप, तिच्या हेतूनुरूप असलेला जो आकार तो आकार म्हणजे वस्तुनिष्ठ सौंदर्य होय.

कान्टच्या अनुयायांनी कान्टच्याच मताचे अनुकरण केले आहे. शिलर हा कान्टचाच अनुयायी (१७५९-१८०५). शिलरने सौंदर्यशास्त्रावर पुष्कळ लिहिले आहे. सौंदर्य हा कलेचा हेतू असे कान्टप्रमाणे तोही म्हणतो. निर्हेतुक आनंदातून ह्या सौंदर्याची उत्पत्ति असते. कला म्हणजे एक लीला आहे. याचा अर्थ ती महत्त्वाची नाही असा नव्हे. जीवनातील सौंदर्य प्रकट करणे म्हणजे कला होय. सौंदर्यनिर्मितीशिवाय दुसरा तिसरा काहीही हेतु तेथे नसतो.

शिलरशिवाय कान्टचा दुसरा मोठा अनुयायी म्हणजे वुईल्हेम हंबोल्ट हा होय. सौंदर्याच्या व्याख्येत जरा ह्याने नवीन भर घातली नसली तरी सौंदर्याच्या विविध स्वरूपाचे विवरण त्याचे बरेच केले आहे. नाटक, संगीत, विनोद-इत्यादि सौंदर्याची अनंत रूपे-त्यांचे विवेचन त्याने केले आहे.

कान्टनंतर झालेले दुय्यम दर्जाचे तत्त्वज्ञानी वगळून आपण फिक्टे, शेलिंग व हेगेल आणि त्यांचे अनुयायी ह्यांच्याकडे वळू या.

फिक्टे (१७६२ ते १८१४) ह्यांचे मत पुढीलप्रमाणे आहे. सृष्टीच्या दोन बाजू आहेत, दोन अंगे आहेत. हे जग म्हणजे आपल्या मर्यादा, आपल्या उपाधि, आपल्या स्वतंत्र मध्येयात्मक व्यापार-इत्यादींची बेरीज आहे. एका दृष्टीने पाहिले तर जग समर्याद व सोपाधिक आहे, दुस-या दृष्टीने पाहिले तर ते स्वतंत्र व निरुनपाधिक आहे. सोपाधिक व समर्याद जगात सारे काही बध्द असते; दडपलेले, वेडेवाकडे झालेले असे असते, म्हणजेच सोपाधिक जगात आपण कुरुपता पाहतो. सोपाधिक जगात अव्यंग असे काही नाही म्हणून सुंदरही काही नाही. परंतु जगाकडे दुस-या दृष्टीने पाहिले म्हणजे प्रत्येक वस्तूचे आंतरपूर्णत्व अव्यंगत्व आपणास प्रतीत होते-म्हणजेच वस्तूंतील सौंदर्य आपणास दिसून येते. जगाकडे वरवरच्या दृष्टीने पहाल तर जग कुरूप दिसेल, आंत दृष्टि देऊन बघाल तर ते सुंदर दिसेल. द्रष्टयाच्या दृष्टीवर वस्तूंतील सौंदर्य वा कुरूपता ही अवलंबून असतात. म्हणून फिक्टेच्या मते सौंदर्य हे बाहेर नसून बघणा-याच्याच सुंदर अंतरात्म्यांत ते आहे. ह्या सुंदर आत्म्याचे बाह्य प्रकटीकरण म्हणजे कलात्मक व्यापार होय. मनाला, हृदयाला वळण देणे एवढेच नाही तर सर्व जीवनला नीट वळण देणे हा कलेचा हेतु होय. मनाला, बुध्दीला वळण देणे हे विचारस्रष्टयांचे काम आहे; हृदयाला विनीत करणे हे संतांचे काम आहे. सौंदर्याचा विशेष हा बाह्य सृष्टीत नसून कलावानाचा जो सुंदर आत्मा, त्या आत्म्याच्या सात्र्निनत्र्चयांत तो असतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel