मनुष्य आपल्या वासनाविकारासाठीच कसा जगत आहे, त्यांच्यासाठी कसा धडपडत आहे, त्या विकारतृप्तीसाठी तो कष्ट सोसतो, हाल काढतो, कारस्थाने रचितो, दुस-यांजवळ कसा झुंजतो, दारिद्रयांतून मार्ग काढीत शेवटी एकदम पैसेवाला कसा होतो, कोणा आप्तेष्टाची इस्टेट त्याला कशी मिळते, तो एकदम मोठा होतो, मग नायकनायिकेचे लग्न कसे लागते व इटकुली मिटुकली गोष्ट कशी संपते हेच ह्या हजारोंहजार पुस्तकांतून दाखवण्यात आलेले असते. असल्या पुस्तकांतील प्रत्येक गोष्ट जरी खरोखर घडलेली असली असे गृहीत धरिले... कारण असे घडलेले असण्याचा संभाव शक्य आहे... तरी ही पुस्तके असत्य व अमृतच होत. कारण जो मनुष्य केवळ स्वत:साठी, स्वत:च्या वासनातृप्तीसाठी जगतो, त्याचे ते जगणे म्हणजे जगणेच नव्हे. त्याची बायको जरी रंभा शुभांगी असली, कुबेराला लाजविणारे जरी त्याचे वैभव असले, तरी तो सुखी असणार नाही.
परंतु एखादी ख्रिस्ताची आख्यायिका असेल. तो व त्याचे शिष्य भटकता भटकता एका श्रीमंताकडे येतात. परंतु तो श्रीमंत त्यांना घरात घेत नाही. ते एका गरीब विधवेकडे जातात. ती त्यांचे स्वागत करते, त्यांना जेवण देते. पुढे ख्रिस्त त्या श्रीमंताकडे पखालभर सोने पाठवतो व त्या विधवेचे उरलेले एकच वासरू ते नाहीसे करण्यासाठी एका लांडग्याला पाठवतो! परंतु श्रीमंताला ते द्रव्य शापरूपच होईल व ती विपत्ति विधवेला बरीच होईल. तो श्रीमंत पैशाचा गुलाम होईल, ती विधवा देवाकडे अधिकच वळेल.
अशी गोष्ट सर्वस्वी अशक्य आहे. कारण हे वर्णिलेले घडले नाही, कधी घडणे शक्य नाही. परंतु ही गोष्ट तरीही सत्य आहे. ही गोष्ट खोटी आहे असे कोण म्हणेल? सत् काय व असत् काय हे येथे दाखविण्यात आले आहे. ईश्वराची इच्छा करणा-याने कशाच्या मागे लागावे ते या गोष्टीत सुंदर रीतीने दर्शविण्यात आले आहे.
या गोष्टीतील पशुपक्षी माणसांसारखे बोलतील, झाडेमाडे हंसतील रडतील, मनुष्याच्या खाटा व पलंग उडत जातील. नाना चमत्कार असतील. तरीही या गोष्टी सत्यच आहेत. देवाचे राज्य त्या दाखवीत आहेत. आणि हे सत्य जर तुमच्या वर्णनांत नसेल, तर तुमची ती सारी वर्णने खोटी आहेत, असत्य आहेत. कारण देवाच्या राज्याचे दर्शन तुमची वर्णने घडवीत नाहीत. ख्रिस्त स्वत: ज्या गोष्टी किंवा दंथकथा सांगे त्या अशक्य असतील, परंतु त्या गोष्टी चिरंतन सत्याने भरलेल्या आहेत. ख्रिस्त फक्त एवढेच म्हणे, ''नीट ऐका म्हणजे झाले. आपण कशा रीतीने ऐकत आहोत इकडे लक्ष असू द्या.''
४
(सेमिनॉव्हने लिहिलेल्या ''कामकरी लोकांच्या गोष्टी'' या पुस्तकाला टॉलस्टॉयने लिहिलेली प्रस्तावना.)
कोणत्याही कलाकृतीचे परीक्षण तीन दृष्टीने करावयाचे असा माझ्यासाठी तरी मी नियम करून ठेवला आहे. पहिली गोष्ट म्हणजे कलाकृतीतील विषय, दुसरी गोष्ट म्हणजे विषयाला अनुरूप अशी रचना आहे का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे कलाकृतींत असलेल्या विषयाबद्दल, स्वत: कलावानाला किती जिव्हाळा आहे. ही तिसरी गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. या गुणामुळेच कलाकृतीत जिवंतपणा व जोर येतो. या गुणांमुळेच ती कृति अन्य हृदयांस स्पर्श करू शकते. कलावान् स्वत:च्या कळकळीनेच स्वत:च्या भावना श्रोता, द्रष्टा किंवा वाचक यांना देऊ शकतो. स्वत:च्या भावनांनी तो जर वेडा झाला असेल तरच तो दुस-यांस तन्मय करू शकेल.
सेमिनॉव्हमध्ये हा तिसरा गुण फारच उत्कृष्टत्वाने आहे.