आजची सत्कला व प्राचीन कला यांच्यांत मुख्य भेद आहे तो हा की, ज्या भावनांमुळे भेद निर्माण होतील, ज्या भावना मानवांना एकत्र आणण्याऐवजी त्यांच्यामध्ये वैषम्य व विरोध, स्पर्धा व वैरे निर्माण करतील, अशा भावना व अशा भावनांचे विषय आजची खरी ख्रिस्तधर्मीय कला वगळील. हे विषय असत्कलेचे आहेत असे ती म्हणेल; ते विषय जरी पूर्वी चांगले मानले गेले होते, तरी आजची विशाल धर्मदृष्टी त्यांचा स्वीकार करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोजच्या जीवनांतील साधेच प्रसंग-ज्यांतील सरळ, सुंदर भावना सर्वांना अनुभवता येतील. असे साधे प्रसंग प्राचीन कला वगळीत असे, परंतु आजची खरी कला त्यांना वगळणार नाही. कारण अशा भावना साध्या असल्या तरी सर्वांना जोडतात. थोडक्यात मानवांना जे जे जोडील ते महान् धर्मदृष्टीचे असो, किंवा साध्या रोजच्या प्रसंगांतील असो. ते आजची कला घेतल्याशिवाय राहणार नाही.
ख्रिश्चन कला ईश्वरीप्रेम व बंधुता हृदयाहृदयांत निर्माण करून दृढतम ऐक्याच्या भावना सर्वांना देईल व सदैक्याचा, प्रेममूल ऐक्याचा नवपंथ बांधील. तसेच जीवनांतील सुखदु:खांत आपण आधीच एकरूप आहोत, तीच दु:खे व तेच आनंद आपल्या सर्वांच्याच वाटयाला आलेले आहेत, आपण समभाग आहोत ही भावना पण निर्माण करील. हे आधीच असलेले ऐक्य दाखवून दुसरे उदात्ततर बंधुभावाचे ऐक्य-सारे आपण ईश्वराचे म्हणून एक, हे ऐक्य निर्माण करू पाहील; म्हणून आजची ख्रिश्चन कला विविध आहे व असू शकेल. दोन प्रकारचे प्रवाह तिच्यांत असतील. ईश्वराशी तद्द्वारा परस्परांशी असलेले जे मानवी ऐक्य त्याच्या भावना देणारी हा एक प्रवाह; दुसरा प्रवाह म्हणजे संसारांतीलच सहृदय व समान अशा भावना देणारी-ज्या भावना यच्चयावत् सर्वांच्या अनुभवाच्या असतात. थोर पारमार्थिक प्रवाह व सरळ सुंदर असा सांसारिक प्रवाह, या दोन प्रवाहांचा मधुर संगम या नवसत्कलेत होईल. कारण हे दोन्ही प्रवाह मानवांच्या हृदयांचे ऐक्यच करणारे आहेत.
ईश्वराबद्दल व सर्व मानवांबद्दल प्रेम उत्पन्न करणारी, तसेच द्वेषमत्सर-स्पर्धांबद्दल निषेध व तिरस्कार व्यक्त करणारी अशी जी धर्ममय कला, हा जो धार्मिक-कला-प्रवाह-तो मुख्यत्वेकरून वाणीच्या द्वाराच प्रकट होत असतो. काही थोडयाच प्रमाणात चित्र व शिल्प यांतूनही तो प्रकट होतो. परंतु दुसरी जी सांसारिक कला-सर्व जनांची कला-ती साहित्यांत, चित्रांत, शिल्पांत, नृत्यांत, बांधकामांत विशेषेकरून संगीतात प्रकट होत असते.
ईश्वराबद्दल व सर्व मानवांबद्दल प्रेम उत्पन्न करणारी, तसेच द्वेषमत्सर-स्पर्धांबद्दल निषेध व तिरस्कार व्यक्त करणारी अशी जी धर्ममय कला, हा जो धार्मिक-कला-प्रवाह-तो मुख्यत्वेकरून वाणीच्या द्वाराच प्रकट होत असतो. काही थोडयाच प्रमाणात चित्र व शिल्प यांतूनही तो प्रकट होतो. परंतु दुसरी जी सांसारिक कला-सर्व जनांची कला-ती साहित्यांत, चित्रांत, शिल्पांत, नृत्यांत, बांधकामांत विशेषकरून संगीतात प्रकट होत असते.
ईश्वर व मानव यांच्याबद्दल प्रेमापासून उद्भवणारी जी परमोच्च कला ती दोन प्रकारची असते : विधायक व निषेधक. ती प्रेमाचा पुरस्कार करते व द्वेषमत्सरांचा निषेध करते; प्रत्येकाच्या स्वातंत्र्याला उचलून धरते, गुलामगिरी व दास्य यांचा निषेध करते. या कलेची उदाहरणे अर्वाचीन काळातील द्यावयाची झाली (विधायक व निषेधक दोन्ही प्रकारची) तर शिलर या जर्मन नाटककाराचे रॉबर्स हे नाटक, व्हिक्टर ह्यूगोच्या पॉव्हरिस व मिझरेबल या कादंब-या डिकन्सने लिहिलेल्या ख्रिस्टमस् कॅरोल, चाइम्स, टेल ऑफ टु सिटीज् व इतर काही गोष्टी; अंकल टॉम्स केबिन; डॉस्टाएव्हस्कीचे ग्रंथ, विशेषत: मृत्यूच्या घरांतील आठवणी हे त्यांचे पुस्तक, जॉर्ज इलियटची ऍडॅम बीड कादंबरी ही उदाहरणे देता येतील.
साहित्याशिवाय इतर कलेत ही धार्मिक कला फार क्वचितच आढळते. ईश्वरीप्रेम व मानवैक्य यांच्या भावना देणारी चित्रे चित्रकलेत फार विरळ आढळतात. विशेषेकरून नावाजलेल्या चित्रकारांच्या कृतीतून या भावनांचा दुष्काळ असावयाचा हे ठरलेलेच. बायबलातील गोष्टीसंबंधी पुष्कळ चित्रे आहेत. परंतु ही चित्रे धार्मिक भावना उचंबळवू शकत नाहीत. कारण त्या भावना चित्रकाराच्या हृदयातच नव्हत्या. निरनिराळया लोकांच्या वैयक्तिक भावना दर्शविणारी चित्रे आहेत, परंतु महान त्यागाची, उदात्त कृत्यांची, थोर प्रेमाची अशी चित्रे क्वचितच आढळतात आणि जी अशी थोडी आढळतात ती फारशा न नावाजलेल्या चित्रकारांचीच असतात. कॅमस्कॉय याने एक चित्र काढलेले आहे (त्याच्या ज्या चित्रांची नावाजणी झाली आहे, त्यांच्यापेक्षा हे चित्र कितीतरी पटीने अधिक योग्यतेचे आहे) या चित्राममध्ये एक दिवाणखाना दाखविलेला आहे. दिवाणखान्याच्या पुढच्या बाजूला सज्जा आहे. सज्जाखालच्या रस्त्यांतून विजय मिळवून आलेले विजयी शिपायी मोठया व ऐटीने कूच करीत चाललेले दाखविले आहेत. सज्जामध्ये एक दाई उभी असते. तिच्याजवळ एक मूल आहे व शेजारीच एक लहान मुलगा आहे. ती तिथे शिपायांच्या मिरवणुकीकडे कौतुकाने पहात असतात. परंतु त्या मुलांची माता कोठे आहे?