कविता ३६
ते पहा दोन वीर दौडत आले. ते लढू लागले वाटते. रक्ताने व लखलखाटाने सारे वातावरण त्यांनी भरून टाकले आहे. ही द्वंद्वयुध्दे, हा शस्त्रास्त्रांचा खणखणाट म्हणजे तारुण्याचा हा उन्माद आहे, यौवनाची ही गर्जना आहे. जे तारुण्य प्रेमविकारांना बळी पडत असते त्या तारुण्याची ही आरोळी आहे.
तलवारी तुटल्या! तारुण्य असेच मरते, सरते, मातीत जाते. परंतु ती मोडलेली तलवार, तो भंगलेला खंजीर; त्याचा बदला घेण्यात आला, उसने फेडण्यात आले. पोलादी खिळे व तीक्ष्ण दात यांनी सूड घेतला. काळाने पोखरलेल्या व प्रेमाने विव्हळ झालेल्या हृदयांचा त्वेष-तो अपरंपार असतो; त्याला ना अंत, ना पार. ना सीमा, ना मर्यादा. त्या खळग्यांत चित्ते आणि वाघ यांच्या गुहा आहेत. ते दोघे वीर तेथे त्या खळग्यांत जवळजवळच पडले आहेत. त्वेषाने व रोषाने ते परस्परांस आवळीत आहेत, पकडीत आहेत. आतापर्यंत उघडीबोडकी असलेली काटेरी झुडुपे-त्यांच्यावर त्यांचे ते देह फुलांप्रमाणे शोभत आहेत. त्या खोल दरीत माझेच मित्र आहेत. ती दरी म्हणजे नरक आहे. परंतु तेथेही मित्र आहेत. चला, जाऊ या त्या दरीत. हे निर्दय नारी! कशानेही शांत न होणारा हा जो मत्सर, हा जो द्वेष, त्याला अमर करण्यासाठी चल त्या दरीत जाऊ.''
खरे सांगावयाचे म्हणजे या वर दिलेल्या उता-यांनाही दुर्बोध अशा किती तरी कविता ह्या संग्रहांत आहेत. जिचा अर्थ खटपट केल्याशिवाय लागेल अशी क्वचितच एखादी कविता यांत तुम्हाला आढळेल. कितीही डोके आपटा. त्या डोकेफोडीने काही अर्थप्राप्ती होईल तर शपथ. कारण ज्या भावना कवी देऊ पहात आहे, त्या फार वाईट, हीन व नीच आहेत. आणि त्या उघड देण्यात त्याची त्यालाच लाज वाटत होती म्हणा, म्हणून मुद्दाम अशा विक्षिप्त रीतीने व अस्पष्ट पध्दतीने त्याने त्या प्रकट केल्या आहेत. ही दुर्बोधता म्हणजेच मुळी त्याच्या कलेचे मध्येय! आधीपासून विचार ठरवावयाचा की असे लिहीन, ज्याचा अर्थ ब्रह्मदेवालाही लागणार नाही. बॉड्लिअरच्या गद्यामध्ये तर दुर्बोधतेची कमालच आहे. वास्तविक गद्याममध्ये तरी लेखक अधिक स्वच्छ व स्पष्टपणे लिहू शकतो. परंतु हे राजेश्री गद्यांत पद्यांतल्यापेक्षा अधिक दुर्बोध आहेत! आहे की नाही कलेची थोरवी!
लहान गद्य कविता
अपरिचित
तुझे सर्वांत जास्त प्रेम कोणावर रे आहे? हे गूढ मनुष्या! हे अपरिचिता!
सांग. बापावर? आईवर? बहिणीवर? भावावर?
''मला आई ना बाप, बहीण ना भाऊ.''
मित्रांवर?
''तू असा शब्द उच्चारून विचारीत आहेस, ज्या शब्दांतील अर्थ या क्षणांपर्यंत मला कळलेला नाही.''
देशावर?
''कोणते अक्षांश रेखांश त्याचे आहेत ते मला माहीत नाही.''
सौंदर्यावर?
''माठया आनंदाने सौंदर्यावर प्रेम करीन. अमर देवता!''
सोन्यावर?
''तू जितका देवाचा तिरस्कार करतोस, तितका मी सोन्याचांदीचा
करतो.''
तर मग हे अपूर्व अपरिचिता! हे नवख्या माणसा! तुझे प्रेम आहे तरी
कशावर, आहे तरी कोणावर?
''माझे अभ्रांवर प्रेम आहे......जी अभ्रे जात असतात, विरून जात
असतात....तेथे......अपूर्व आश्चर्यकारक अभ्रे!''
या संग्रहात ''रस्सा व ढग'' म्हणून एक गद्यकाव्य आहे. कवी जिच्यावर प्रेम करतो, तिलाही याच्यातील एक अक्षर समजणार नाही. स्वत:ची दुर्बोधता तिलाही जणू त्याला पटवून द्यावयाची होती.