कृत्रिम कला निर्माण करण्यातील दुसरे साधन म्हणजे हुबेहूब अनुकरण करण्याची. जीवनात जसे होत असेल तसे सारे वर्णन करणे. जी वस्तू किंवा जी व्यक्ती वर्णावयाची असेल, तिच्याबरोबर असणा-या इतर सर्व बारीकसारीक गोष्टींचे इत्थंभूत पाल्हाळाने वर्णन करावयाचे. साहित्यविषयक नक्कलेत हे फारच दिसून येत आहे. बाह्यरूप, चर्या, कपडे, हालचाली, आवाज, राहावयाची जागा, या सर्वांचे साद्यंत वर्णन देण्यात येते. कादंब-यांतून (किंवा गोष्टींतून जेव्हा एखादे पात्र बोलू लागते, त्यावेळेस त्याचा आवाज कसा होता, स्वर उंच होता का मध्यम होता, का खालचा होता, बोलताना ते पात्र आणखी काय धंदे करीत होते, हात हालवीत होते का कान खाजवीत होते ते सारे देण्यात येते आणि हे सारे वर्णन करावयाचे तेही काव्यमय पध्दतीने. ते वर्णन सरळ नसावयाचे, तर असंबध्द, आडवेतिडवे असे असावयाचे. जसे कादंब-यांत तसे नाटकांत. चित्रकला म्हणजे फोटोग्राफीच झाली आहे व दोघांतील भेद नष्ट होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संगीतात सुध्दा ह्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत.
कृत्रिम कला निर्माण करण्याचा तिसरा उपाय म्हणजे अवडंबर. हे अवडंबर पुष्कळ वेळा केवळ बाह्य परिणामी असते. या अवडंबराचा परिणाम बाह्य इंद्रियांवर होतो, परंतु हृदयावर मात्र होत नाही. मारूनमुटकून लोकांच्यावर परिणाम घडविण्याच्या या युक्त्या असतात. विशेषत: विरोधदर्शनाने हे परिणाम घडवून आणण्यात येतात. उग्र व कोमल, सुंदर व कुरूप, प्रकाश व अंधार, कठोर व मृदु, मोठा व लहान, सामान्य व असामान्य, शूर व भ्याड, पातिव्रत्य व व्याभिचार सत्य व असत्य असे विरोध जमवून आणून परिणाम करण्यात येतो. वाङ्मयविषयक कलेत विरोधजन्य परिणामांखेरीज, ज्या वस्तूंचे पूर्वी कधी वर्णन केलेले नव्हते, त्या वस्तूंचे वर्णन करूनही परिणाम घडविण्यात येतो. विषयेच्छा जागृत करणारी अमर्याद अश्लील वर्णने, कटिनितंबस्तनांची वर्णने किंवा भीतीच्या भावना उत्पन्न करणारी मरणकाळची इत्थंभूत वर्णने-त्या वेदना कशा होत होत्या हे सारे सांगणे; एखाद्याचा खून होतो, त्यावेळेस किती आतडी बाहेर आली याचे जणू डॉक्टरांप्रमाणे वर्णन करणे, किती रक्त सांडले, जखमा किती होत्या, कशा होत्या-सारे आले पाहिजे. चित्रकलेतही या गोष्टींचा उदय होत आहे. चित्रकलेत विरोधजन्य परिणाम आहेतच, परंतु शिवाय एक नवीनच विशेष वर डोके काढू बघत आहे. चित्रामध्ये एखाद्या वस्तूला अगदी उत्कृष्ट चितारावयाचे व इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करावयाचे. सारी कला त्या एका वस्तूच्या निर्मितीत केंद्रिभूत करावयाची व चित्रांतील इतर वस्तू कशातरी रंगवावयाच्या. चित्रकलेतील नेहमीचे परिणाम प्रकाश व भयंकर-वस्तु-दर्शन या दोन प्रकारांनी बहुधा घडविण्यात येतात. नाटकांत विरोधजन्य परिणाम असतातच; परंतु याशिवाय, 'वीजा, वादळे, मेघ, वारे, चंद्रप्रकाश, समुद्राचे देखावे, लाटा, पोषाखांतील अपूर्वाई, स्त्रियांचे दिगंबरत्व, खून, मारामारी, काही मूर्खपणाचे प्रकार इत्यादी गोष्टी असतात. मरणोन्मुख मनुष्य मरणकाळच्या सर्व स्थितींचे हावभाव करून दाखवितो. आंचके लागणे, विव्हळणे, मान टाकणे-सारे प्रत्यक्ष दाखविण्यात येते. संगीतामध्ये कोमल सुरांतून एकदम तारसप्तकांत जाणे, अगदी मृदुतर, एकदम अत्यंत तीव्र, कधीकधी तेच तेच सूर पुन: पुन्हा आळवून दाखविणे इत्यादी गोष्टींनी परिणाम घडवू पहात असतात.
लोकांवर परिणाम व्हावा म्हणून वर सांगितल्याप्रमाणे अनेक प्रयत्न करण्यांत येत असतात. परंतु आणखी एक विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे, एका क्षेत्रांतील कलेला भिन्न क्षेत्रांतील कलेचेही काम करावयास लावणे ही होय. संगीतात वर्णन आणावयाचे, चित्रकलेला गोष्ट सांगावयास लावावयाचे, गोष्टींत नाटयमयता आणावयाची.