प्रकरण तिसरें
[भिन्न भिन्न सौंदर्यविषयक प्रक्रियांचा सारांश-बामगर्टनपासून तो आजतागायत पर्यंतच्या ग्रंथकारांनीं सौंदर्याच्या केलेल्या भिन्नभिन्न व्याख्या-हया प्रकरणावरुन दिसून येईल कीं कलेची समाधानकारक व्याख्या अजून केली गेली नाहीं. कलेची व्याख्या ती, कीं जी वाचक खुशाल सोडून देतो ! जिचें महत्व त्याला वाटत नाही ! या प्रकरणांत टॉलस्टॉयचे स्वत:चे विचार नाहींत. मधून मधून जी विरोधक व निषेधक टीका त्यानें थोडी फार केली आहे, त्यांत थोडे फार त्याचे विचार येथें आहेत.]
अर्वाचीन सौंदर्यशास्त्राचा बामगर्टन हा जनक होय. त्याच्यापासून मी सुरुवात करितों. (१७१४-१७६२) बामगर्टनचें म्हणणें असें कीं तत्वज्ञानाचा विषय सत्य हा असतो व ललित ज्ञानाचा विषय सौंदर्य हा असतो. सौंदर्य म्हणजे परिपूर्णता (अंतिम सत्य). ही पूर्णता इंद्रियगम्य असते, इंद्रियातीत नसते. बुध्दीच्या अनुभवास येणारी पूर्णता म्हणजे सत्य; नैतिक धृतीच्या अनुभवास येणारी पूर्णता म्हणजे शिवं; इंद्रियाच्या अनुभवास येणारी पूर्णता म्हणजे सुंदरम्.
‘सौंदर्य म्हणजे मेळ, प्रणामबध्द्ता’ अशी बामगर्टनची व्याख्या आहे. अवयवांचा परस्परांशी व अवयवीशीं असणारा मेळ म्हणजे सौंदर्य होय. सौंदर्याचा हेतु आनंद देणें व वासना उत्तेजित करणें हा होय असें तो म्हणतो. (काँटनें सौंदर्याची जी व्याख्या केली आहे व सौंदर्याचीं जीं लक्षणें सांगितली आहेत, त्या सर्वांच्या अगदी विरुध्द् अशी ही विचारसरणी आहे.)
सौंदर्याच्या आविष्काराबद्दल बामगर्टनचें असें म्हणणें आहे की परमोच्च सौंदर्य सृष्टींत प्रकट होत असतें, म्हणून सृष्टीचें अनुकरण करणें हें कलेचें परम ध्येय आहे. (अगदी नवीन अशा ताज्या सौंदर्यशास्त्रज्ञांनी या विचारसरणीच्या विरुध्द् उभारणी केली आहे.)
मेयर, एस्चेन्बर्ग, एबरहार्ड वगैरे बामगर्टनचे दुय्यमदर्जाचे अनुयायी आपण सोडून देऊं. आपल्या गुरुच्या विचारसरणींत महत्वाची भर त्यांनीं घातली नाहीं, किंवा महत्वाचा बदलहि केला नाहीं. फक्त सुंदर व सुखप्रद हयांत त्यांनीं थोडा भेद दर्शविला आहे. बामगर्टनच्या पाठोपाठ आलेले दुसरे महत्वाचे ग्रंथकार-त्यांच्याकडे आपण वळू. सुल्झर, मेंडेलसन व मॉरिझ हे तिघे आपण घेऊं या. कलेचा हेतु सौंदर्य नसून सत् हा आहे असें बामगर्टनच्या विरुध्द् हयांचे म्हणणें आहे. १७२०-७७ हा सुल्झरचा काळ होय. हयाचें असें म्हणणें आहे कीं ज्यांत शिवत्व आहे, तेंच सुंदर समजलें गेलें पाहिजे. त्याच्या विचारसरणीप्रमाणें मानवी जीवनांत कल्याण व मांगल्य आणणें हें ध्येय आहे. नैतिक भावनांचे नीट संवर्धन व विनयन केल्यानेंच हया ध्येयाची प्राप्ति होईल. हया ध्येयाचीच पूजा कलेनें करावयाची आहे. कलेनें हया ध्येयाकडे गेलें पाहिजे, जनतेला नेलें पाहिजे, मानवी जीवनाला वळविलें पाहिजे. सार्वजनिक मांगल्य हा कलेचा हेतु होय. सौंदर्य तें, जें हृदयांत सर्वांच्या मंगलाची व कल्याणाची कल्पना जागृत करितें व त्या कल्पनेला नीट वळण देतें.
मेंडेलसनचा काळ १७२९ ते १७८६. सुल्झरसारखेंच हुबेहुब हयाचेंहि म्हणणें आहे. भावनेला सौंदर्याची नीटशी कल्पना नसते. सौंदर्याचे निर्विकल्प म्हणजे काय ? ज्ञान भावनेला असतें. हें ज्ञान सविकल्प करणें - म्हणजेच सौंदर्याचा विकास करणें-हा कलेचा हेतु होय. या सौदर्यवेलीचा इतकाव असा विकास करावयाचा कीं तिच्यावर सत्यं शिवाचीं फुलेंफळें डोलूं लागतील. नैतिक परिपूर्णता-हें कलेचें ध्येय होय.