आजच्या सुशिक्षितबुवांचे अज्ञान इतक्या थराला पोचलेआहे की जे खरे थोर विचारकर्ते, खरे कवी, खरे गद्यलेखक, प्राचीन किंवा १९ व्या शतकातील... ते सारे या नवसुशिक्षितांस जुनाट व टाकाऊ वाटू लागले आहेत. नवीन सुशिक्षितांना या जुन्यांच्या लिहिण्यापासून कांहीच बौध्दिक किंवा हार्दिक खाद्य मिळत नाही. या सा-या थोर ग्रंथकारांकडे हे नवसुशिक्षित तिरस्काराने पाहतात. आम्हाला जे उच्च वाटते, दिव्य व थोर असे वाटते ते या जुन्या युद्रुकांजवळ आहे कोठे असे हे म्हणतात. परंतु तो निटशे! वा: केवडा विचारद्रष्टा व विचारस्त्रष्टा! निटशेची अनैतिक, रोगट व घमेंडखोर असंबध्द बडबड आजच्या काळांतील अंतिम तत्वज्ञान म्हणून मानले जाते. दुर्बोध कवींच्या कविता, त्या वेडयावाकडया रचना, नादमधुर परंतु अर्थशून्य ते चरण यांना श्रेष्ठ काव्य म्हणून मानण्यात येते. नाटकगृहांतून अशी नाटके केली जात आहे की ज्यांचा अर्थ प्रेक्षकांना तर राहोच, स्वत: त्या नाटकाच्या निर्मात्यासही सांगता येत नसतो. अशी काव्ये, अशी नाटके, अशा कादंब-या लाखांनी प्रसिध्द होत आहेत व कलाकृतींच्या नावांखाली खपत आहे.

शाळेतील अभ्यास ज्यांचा संपलेला असतो, आता आणखी काय वाचावे असा ज्यांना प्रश्न असतो... अशी मुलेमुली प्रश्न विचारतात ''आमच्या शिक्षणाला पूर्णता येण्यासाठी आणखी मी कोणकोणती पुस्तके वाचू?''

खेडयांतील लिहावयास शिकलेला मनुष्य हाच प्रश्न विचारतो. ज्याला खरा प्रकार मिळावा अशी इच्छा असते, खरे ज्ञान मिळावे अशी तळमळ असते, असा तो खेडयांतील मनुष्य विचारतो, ''आता मी काय वाचूं, कोणते पुस्तक घेऊन वाचू?''

अशा प्रश्नांना उत्तरे देता यावीत म्हणून ''तुमची उत्कृष्ठ १०० पुस्तके कोणती?'' असा प्रश्न पुष्कळ थोर लोकांना विचारण्यात येत असतो व त्यांची उत्तरे प्रसिध्द करण्यात येतात. पण एवढयाने खरी अडचण दूर होत नाही.

किंवा युरोपियन समाजात पहिल्या दर्जाचे, दुय्यम दर्जाचे, कनिष्ठ दर्जाचे असे लेखकांचे निरनिराळे गट पाडतात. श्रेष्ठ, मध्यम व अधम अशी लेखकांची वर्गवारी केल्यानेही प्रश्न नीट सुटत नाही. कारण ज्याला आपण श्रेष्ठ मानतो त्याने जे जे लिहिलेले असते ते सारेच उत्कृष्ट नसते, तसेच ज्यांना आपण अत्यंत खालच्या दर्जाचे लेखक म्हणतो, त्यांनी जे जे लिहिले ते सारेच ताज्य असते असेही नाही. कधी सामान्य मनुष्यही असामान्य गोष्ट लिहितो व असामान्य लेखक टाकाऊ व गचाळ लिहितो; तेव्हा ही वर्गवारीसुध्दा नीट प्रकाश पाडीत नाही. गारगोटीतून हिरा, कच-यांतून दाण्याची कशी निवड करावी ते समजत नाही.

प्रकाशासाठी तळमळणारा तरुण विचारतो, ''मी काय वाचू? सांगा मी काय वाचू?'' अशा तरुणाला खरी टीकाच उत्तर देऊ शकेल. आर्नोल्डने हेच टिकेचे ध्येय म्हणून सांगितले आहे. परंतु आजची टीका उत्तर देऊ शकणारी नाही, ती पंथ दाखवू शकणार नाही. जी टिका अव्हील व सदभिरुचिहीन अशा ग्रंथांनाच शिरोधार्य समजते, अशा रद्दी ग्रंथांचे समर्थन करण्यासाठी वाटेल त्या कलाविषयक, सौंदर्यविषयक, साहित्यविषयक किंवा तत्त्वज्ञानविषयक प्रक्रिया शोधून काढते, जी टीका स्वत:च्या विरुध्द मत असणा-यांचे ग्रंथ टाकाऊच मानीत असते, अशा  ग्रंथांची टवाळी करणे हाच जिचा परमानंद असली टीका पंथ कसा दाखविणार, दिवा कसा देणार? कधी साहित्यकृतींची चर्चा करण्याच्या मिषाने ही टीका आर्थिक व राजकीय मते प्रकट करू पहात असते, कधी पैसे घेऊन कोणा ग्रंथकाराला शेलापागोटे देत असते; कधी एखाद्या विवक्षित ग्रंथकाराला जे आदर्शभूत म्हणून वाटते तेच सर्व समाजाने मान्य करावे असे कधी कधी ही टीका बजावीत असते! तरुणाला असली टीका मार्गदर्शक कशी होईल, प्रकाश कसा दाखवील?

जे हे अपरंपार प्रस्थही लिहिलेजात आहे, त्यातील आम्ही काय वाचावे, या अत्यंत जिव्हाळयाच्या महत्त्वाच्या प्रश्नाला सत् अशी टीकाच उत्तर देऊ शकेल. पूर्वीच्या किंवा समकालीनांच्या लिहिण्यात जे जे उत्तमोत्तम असेल ते ते दाखविणे, ते जनतेसमोर आणणे, तिकडे जनतेचे लक्ष वेधणे, सर्वांचे डोळे तिकडे वळतील अशा उंच ठिकाणी ते मांडणे इत्यादी काम जी टीका करीत असेल ती टीकाच ''आम्ही काय वाचावे'' या महत्त्वाच्या व गंभीर प्रश्नास उत्तर देऊ शकेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel