कोझीन (१७९२-१८६७) हा जर्मन ध्येयवाद्यांचाच अनुयायी आहे. सौंदर्याला नेहमी नीतीचा पाया लागतो असे ह्याचे मत आहे. कला म्हणजे अनुकरण व जे सुखविते ते सौंदर्य-ह्या व्याख्या कोझिनला मान्य नाहीत. सौंदर्याची वस्तुदृष्टयाही व्याख्या करता येणे शक्य आहे असे तो मानतो. ऐक्यातील विविधता हे सौंदर्याचे स्वरूप होय. एकतेत अनेकतेचा अनुभव येणे म्हणजे सौंदर्य अनुभवणे होय.

कोझिनच्यानंतर जोप्लाय आला (१७९६-१८४२). हा कोझिनचा विद्यार्थी होता. जर्मनीतील सौंदर्यमीमांसकांचाच मागोवा घेत जाणारा हा आहे. याच्या मते, अमूर्ताचे मूर्तीकरण म्हणजे सौंदर्यसर्जन होय. अमूर्ताला मूर्त करणे हे सौंदर्याचे काम आहे. ज्या सहज लक्षणांनी सौंदर्य प्रगट होते, त्याच लक्षणांनी अमूर्त प्रगट करावयाचे, हे दृश्य जगत् म्हणजे एक वस्त्र आहे. त्याच्यामुळे आपण पाहू शकतो.

स्विस लेखक बिक्टेट हा शेलिंग व हेगेल यांचाच अनुयायी आहे. निसर्गाच्या पाठीमागे अदृश्य असणारे जे काही-ते सौंदर्य होय असे ह्याचे म्हणणे आहे. व्यवस्थित स्वरूपांत प्रगट होणारी स्फूर्ति म्हणजे सौंदर्य.

फ्रान्स देशातील तत्त्वज्ञ रॅव्हेसान मॉचे विचारही असेच अस्पष्ट व संदिग्ध आहेत. हा म्हणतो, ''सौंदर्य जे जगाचे अंतिम ध्येय आहे; सौंदर्य हे अंतिम सत्य आहे. जगाचे वास्तविक सत्य रूप अत्यंत थोर व उदात्त अशा दैवी सौंदर्यात-निर्दोष व परिपूर्ण अशा सौंदर्यात-आहे असे तो म्हणतो. हे जगत् परम सुंदराने निर्माण केले आहे. परम सुंदराची लीला, त्या परम सुंदराचा खेळ म्हणजे हे जगत् होय.''

ही तात्त्विक वाक्ये मुळांतून मी मुद्दाम देत आहे. जर्मनी पंडितांचे जरी फ्रेंच पंडित अनुकरण करितात. तरी एक गोष्ट खरी की जर्मन पंडितांचे विचार ते अधिक विशद व स्पष्ट करून मांडतात. जर्मन लोक जे अस्पष्ट व संदिग्ध असे सांगतात, तेच आपलेसे करून फ्रेंच पंडित सुंदर व स्वच्छ रीतीने मांडून दाखवितात. जर्मन लोकांचे अंधुक विचार एकदा आपलेसे केल्यावर, त्या सर्वांची एकवाक्यता करणे, भिन्नभिन्न व परस्परविरोधी अशा विचारांचा समन्वय करणे यात फ्रेंच लोक कुशलता दाखवितात यात संशय नाही. फ्रेंच लोक फार खोल न गेले तरी जे काही सांगावयाचे ते भीतभीत ते नाही सांगणार, तर स्पष्टपणे व बेडरपणे ते ते ठोकून देतील.

सौंदर्याची चर्चा करताना फ्रेंच तत्त्वज्ञ लॅचेलिअर म्हणतो, ''जे सत्य सुंदर नाही, ते केवळ आपल्या बुध्दीचा तार्किक खेळ आहे असे म्हणा. त्या सत्यात जीव नाही, राम नाही, असे म्हणावयास आपण कचरता कामा नये. ज्याला खरोखर स्थिर व समर्थ असे सत्य म्हणता येईल ते सुंदरच असणार.''

जर्मन तत्त्वज्ञानाचा परिणाम होऊन ज्यांनी सौंदर्यशास्त्रावर लिहिले अशा फ्रेंच टीकाकारांशिवाय दुसरेही फ्रेंच मीमांसक झाले आहेत व फ्रान्समधील सौंदर्यविषयक व कलाविषयक विचारांवर त्यांनी परिणाम घडवून आणला आहे. टेन, गायू, चेरबुलीझ, कोस्टर, व्हॅरान-हे असे नामांकित सौंदर्यमीमांसक आहेत.

टेन (१८२८-९३) हा म्हणतो, ''कोणत्याही महत्त्वाच्या विचाराचे प्रधान स्वरूप प्रकट करणे म्हणजे सौंदर्य होय. प्रत्यक्ष वस्तुस्थितीत ती कल्पना प्रकट झालेली असेल, त्यापेक्षा अधिक पूर्णपणे तो प्रकट करून दाखविणे म्हणजे सौंदर्य होय.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel