त्याचप्रमाणे ज्या भावना अननुभूत आहेत, ज्या नवीन आहेत, ज्या भावना पूर्वी कधीही मानवजातीत प्रकट केल्या गेल्या नव्हत्या, अशा भावनांचा लोकांवर अतिशय परिणाम होतो. ज्या उगमापासून अशा भावनांचे खळखळाट पूर वाहणे शक्य असते तो उगम धार्मिक असतो, श्रध्दामय असतो. परंतु वरच्या लोकांची कला, धर्म व श्रध्दा यांना तर आंचवलेली, पारखी झालेली. भावनांना धर्माचे प्रमाण न लावता सुखाचे प्रमाण वरचे वर्ग लावू लागले. या दुनियेत, या संसारांत, सर्वांत जुनी, सर्वांची सर्वकाळांत परिचयाची, नित्य अनुभवाची जर कोणती एखादी गोष्ट असेल तर ती सुखोपभोग ही होय. या सुखोपभोगाच्या कल्पनेत ना नाविन्य, ना रस; ती रोजचीच वस्तू झालेली आहे. परंतु प्रत्येक काळात जो धर्ममय व आध्यात्मिक अनुभव येत असतो, तो नित्य नूतनच असतो. त्या अनुभवाहून नवीन व ताजे असे या जगात दुसरे काय आहे? आणि हे असेच खरोखर असणार. मनुष्याच्या प्रकृतीनेच त्याच्या सुखोपभोगांना मर्यादा घातलेली आहे. काही दहापाच प्रकारांचे, त्या त्या इंद्रियांना सुखविणारे सुखोपभोग असणार! परंतु धार्मिक अनुभव त्याला ना अंत ना पार. मानवजातीची प्रगती नवनवीन धार्मिक अनुभवांमुळे होत असते. ज्यावेळेस एखादा नवीन अनुभव एखाद्या महापुरुषाला येतो, त्यावेळेस मानवजात एक नवीन पाऊल पुढे टाकीत असते. जसजसा धार्मिक अनुभव अधिक स्वच्छ, अधिक सतेज, अधिक निर्मळ, अधिक विशाल असा येत जातो, तसतशी मानव जातीची पाऊले झपाटयाने पडू लागतात. पूर्वी न अनुभवलेल्या अशा भावनांचा प्रवाह धार्मिक अनुभूतींतूनच झरू लागणार, वाहू लागणार. त्या त्या काळांतील धार्मिक अनुभूतीत त्या त्या काळांतील परमोच्च अशी जीवनाची दृष्टी दिसून येत असते. होमर व इतर शोकान्ती नाटके लिहिणारे ग्रीक नाटककार यांनी ज्या नव्या नव्या, ख-याख-या, महत्त्वाच्या व अनंत प्रकारच्या भावना आपल्या कृतींतून ओतून दिल्या आहेत, त्यांचा उगम ग्रीक लोकांच्या प्राचीन धार्मिक अनुभूतींतच होता. तीच स्थिती ज्यू लोकांतही दिसून येईल. ज्यू लोकांतील निरनिराळया पैगंबरांनी व प्रेषितांनी जे नवीन व महत्त्वाचे विचार दिले, ज्या उत्कट अशा नवीन भावना दिल्या त्या सर्वांचा, ईश्वर एक आहे या महान् अनुभूतींतूनच, संभव झालेला होता. मध्ययुगांतील कवींच्या बाबतीत तेच दिसून येते. स्वर्गामध्ये श्रेष्ठ, कनिष्ठ अशा देवांच्या मालिका आहेत हा जो धार्मिक अनुभव त्यांना आला, त्यांतूनच पोप, बिशप इत्यादी धार्मिक संघटना राजा हा श्रेष्ठ आहे, काही लोक वरिष्ठच असतात, काही कनिष्ठच असावयाचे इत्यादी भावना निघाल्या. आणि आजही ख-या ख्रिस्ती धर्माचा ज्याला अनुभव येईल, ईश्वर हा सर्वांचा पिता हे ज्याच्या अनुभवाला येईल, त्याला मानवांचे बंधुत्व, सर्वांवर प्रेम करावे इत्यादी भावना जीवनांत प्रकट कराव्या असे वाटेल.
धार्मिक अनुभूती त्या त्या काळांत निरनिराळया येतात व म्हणून त्यांतून वाहणारे भावनाप्रवाह हे अनेक प्रकारचे असू शकतात. हे भावनाप्रवाह पुन: पुन्हा सतेज, अधिक नवीन व टवटवीत असे होत जातात. कारण धार्मिक अनुभव म्हणजे तरी काय? आसमंतांत असलेल्या सर्व चराचराशी स्वत:चे जे नवीन नाते मनुष्यास जोडावयाचे असते, त्याचे दिग्दर्शन त्या नवीन धार्मिक अनुभूतीत असते. हृदयांत उसळणारी नवीन धार्मिक भावना मनुष्याचे सृष्टीशी नवीन नाते जोडते. परंतु भोगेच्छेपासून उत्पन्न होणा-या भावना या मर्यादित आहेत, एवढेच नव्हे तर त्यांचा अनुभव कधीच आलेला आहे. या भावनांचे प्रकटीकरण केव्हाच होऊन गेले आहे. युरोपातील वरच्या वर्गात धर्मश्रध्दा नसल्यामुळे त्यांच्या कलेला नवीन नवीन विषय, नवीन नवीन अनुभव मिळत ना. ही सुख देणारी कला रोडावली. अत्यंत हीन व क्षुद्र अशा शिळया साधनसामुग्रीवरच, शिळे व उष्टे तुकडे खाऊनच या कलेला स्वत:ची गुजराण करणे प्राप्त होते, स्वत:चे जीवन कंठणे भाग होते.
आधीच कमी झालेले विषयक्षेत्र आणखी दुस-या कारणांनी अधिकच कमी झाले. वरच्या वर्गाची कला धर्मप्रधान नसल्यामुळे ती कला लोकप्रिय, बहुजन समाजाची आवडती अशी राहिली नाही. यामुळे पूर्वीच्या भावना ती प्रकट करी, त्या भावनांचे क्षेत्रही कमी झाले, विषयक्षेत्रही कमी व भावनाक्षेत्रही कमी. जीवनार्थ जो अपरंपार श्रम करावा लागतो, त्या श्रमाची ज्यांना ना जाणीव, ना कल्पना, असे जे वरचे बलवान् व धनवान् वर्ग, त्यांच्या भावनाही फारच तोकडया व थोडया असतात. त्यांच्या भावनांत ना वैचित्र्य ना नाविन्य. या वर्गाच्या भावना क्षुद्र, कमजोर, मर्यादित व हीन अशा असतात. या भावनांना फारसे महत्त्व किंवा किंमत नसते. श्रमजीवी लोकांच्या भावनांपेक्षा या वरच्या वर्गातील लोकांच्या भावना फारच दरिद्री, संकुचित व नि:सत्त्व अशा असतात.