परंतु वरच्या वर्गातील लोक, वरच्या वर्गातील कलावान् व वरच्या वर्गातील सौंदर्यमीमांसक वरील सत्य गोष्टीच्या विरुध्द सदैव बोलत असतात. गाँचरेव्ह याच्या उद्गाराची मला स्पष्ट आठवण आहे. गाँचरेव्ह हा हुशार, बुध्दिमान व चांगला सुशिक्षित होता. तो नगरात राहणारा होता व सौंदर्यमीमांसक होता. तो एकदा मला म्हणाला, ''टर्जिनाव्हच्या स्पोर्ट्समनचे नोटबुक या पुस्तकानंतर खेडयांतील लोकांच्या जीवनासंबंधी लिहावयाचे असे काही उरलेच नाही. त्या नोटबुकांत सारे येऊन गेले.'' काम करणा-या लोकांचे, मजुरांचे व शेतक-यांचे जीवन त्याला इतके साधे व नीरस वाटले की त्यात जणू फारसे काही नाहीच. शेतकरी व मजूर यांची सारी जीवनसृष्टी टर्जिनाव्हने लिहिलेल्या त्या दहावीस गोष्टीत येऊन गेली. काय असणार काय त्या कायाक्लेशी श्रमजीवी लोकांच्या जीवनांत?
परंतु याच्या उलट श्रीमंतांचे जीवन किती रसपूर्ण ! गाँचरेव्हला वरच्या धनिकांचा जीवनक्रम, खुशालचेंडू कांचनभटांचा जीवनक्रम, म्हणजे कलेला मिळालेला अनंत विषय असे वाटे. श्रीमंतांच्या निराशा, कंटाळा येत असल्यामुळे व काही करावयास नसल्यामुळे त्यांना वाटणारे असमाधान, त्यांच्या प्रेमकथा, त्यांच्या प्रणयलीला-केवढा अफाट व किती हृदयसंगम विषय? एक प्रियकर आपल्या वल्लभेच्या करांबुजांचे चुंबन घेतो, दुसरा कपोलांचे घेतो, तिसरा ओठांचे घेतो, चौथा आणखी कशाचे तरी घेतो-किती विविधता व नवीनता! एक आळसामुळे असमाधानी आहे, तर दुसरा जग आपणांवर प्रेम करीत नाही म्हणून रडत आहे, किती करूण प्रसंग! मजुरांच्या जीवनांत वैचित्र्य नाही, आणि आळशी, मिजासी असे जे श्रीमंत चंदुलाल त्यांच्या जीवनांत मात्र अपरंपार वैचित्र्य, किती प्रसंग, किती गंमती, किती करुणा-हे मत गाँचरेव्हचेच आहे असे नाही, तर आजच्या वरच्या वर्गातील अनेकांचे हेच मत आहे.
परंतु पहा, ते मजुराचे जीवन पहा. काम करणा-यांचे ते जीवन! ते जरा नीट डोळे उघडून पहा. त्यांच्या श्रमांचे ते अनेक प्रकार, त्या शेकडो प्रकारच्या कामांतून येणारे शेकडो धोक्याचे प्रसंग, संकटे, आपत्ती, हाल, कधी खोल समुद्रांत, तर कधी मैलमैल खोल खाणीत; कधीं प्रखर आगीजवळ तर कधी प्रचंड यंत्राजवळ; कधी हात तुटणार तर कधी पाय भाजणार; मृत्यु जणू समोर पाठीमागे सदैव आजूबाजूला प्रासावयाला उभाच! त्याचे पोटासाठी या देशांतून त्या देशांत जाणे; नाना जातींच्या, नाना धर्माच्या, नाना राष्ट्रांच्या लोकाशी हरघडी येणारे त्याचे संबंध, व होणारे व्यवहार, मालक, अधिकारी, देखरेखकरी यांच्याशी उडणारे खटके, होणारे संप; रानावनांत, जंगलांत, महाडांत सृष्टीशी येणारे संबंध, कधी समोर वाघ गुरगुरत येतो, पायाशी साप फुत्कार करतो, पाठीमागून लांडगा हल्ला करतो; नदीनाले ओलांडताना प्राणावर येणारे प्रसंग; खांद्यावर बक-या व त्यांची पिले घेऊन तो नदीतून कसा जातो, पुरांतून गुरेढोरे कशी पैलतीराला आणतो; विजा कडाडतात, मेघ गरजतात, खळखळाट पाण्याचे संवात पायांजवळ वहात असतात. सोसाटयाचे वारे सुटतात, झाड डोक्यावर पडेल असे वाटते; शेतक-यांचे गायीबैलांवरील प्रेम, त्यांना तो कसा जपतो, आंजारतो-गोंजारतो, त्या शेतक-यांचा आवाज ऐकतांच गायी कशा हंबरतात, तो कुत्र्याला कसे कुरवाळतो, मांजराला कसे प्रेमाने वागवितो; तो स्वत:च्या हाताने लावलेल्या झाडांना फळे लागलेली पाहून किती आनंदतो; शेतांतील, मळयातील, बागांतील त्याचे निरनिराळया ऋतूंतील काम; कधी कडक थंडीत तर कधी ऊन भाजून काढीत असताना, कधी चिखलांत, तर कधी पावसांत; तो मोट कशी हांकते, गाणी कशी म्हणतो, पांवा कसा वाजवितो; त्याचे मुलाबाळांजवळचे प्रेमळ व अकृत्रिम वर्तन, जी मुलेबाळे व जी घरांतील बायामाणसे केवळ नात्यागोत्याची, स्वत:च्या रक्तामांसाची म्हणूनच त्याला प्रिय असतात असे नव्हे, तर त्याच्याबरोबर उन्हातान्हांत, थंडीवा-यांत, पाऊसपाण्यांत जी रातदिन खपतात, जरूर पडेल तेव्हा, तो आजारी असता वा परगावी गेला असता, त्याची जागा भरून काढतात व काम पडू देत नाहीत, अडू देत नाहीत. या जीवनैक्यामुळे सुखदु:खांतील समरसतेमुळे जी त्याला प्रिय असतात; आर्थिक बाबतीतील त्याचे विचार, त्याच्या चिंता व काळज्या-केवळ गंमत म्हणून, आकडेमोड म्हणून, चर्चा व वादविवाद म्हणून, दुस-यांस दाखविण्यासाठी म्हणून नव्हे, तर जे प्रश्न त्याच्या कुटुंबाच्या जीवनमरणाचे असतात, जगावे की मरावे अशा तीव्रतेचे जे असतात; त्या प्रभांची मुलेबाळे झोपली असता बायकोबरोबर होणारी सचिंत चर्चा व बोलाचाली; निरहंकारी राहणी असूनही त्याचा दिसून येणारा सद्भिमान, अब्रूची चाड, मिंधेपणाची लाज; दुस-याला मदत व साहाय्य करण्याची त्याची अखंड तयारी, ताजेतवाने होण्यात त्याला वाटणारा निरागस व आरोग्यवान् आनंद, काम केल्यावर तो भाकरीवर कसा ताव मारतो, रात्री जाड घोंगडीवर कसा सुखाने क्षणांत झोपी जातो आणि अशा प्रकारच्या या विविध रंगांनी व रसांनी नटलेल्या त्याच्या जीवनांत सर्वत्र भरून राहिलेले धार्मिक भावभक्तीचे श्रध्दामय वातावरण-असे हे गरीब शेतक-याचे, कामक-याचे, मजुराचे, शेकडो अनुभवांनी श्रीमंत झालेले जीवन ते वरच्या वर्गातील लोकांच्या जीवनाशी तुलना करून पाहता नीरस, कंटाळवाणे, वैचित्र्यहीन ठरीव सांच्याचे आपणांस वाटावे हे आश्चर्य नव्हे काय? काय आहे आपल्या वरच्या वर्गातील लोकांच्या जीवनांत? काही ठरीव दोन चार सुखोपभोग, काही क्षुद्र चिंता, एवढेच ज्या जीवनांत असते, ज्या जीवनांत ना खरा श्रम, ना खरी धनधान्य निर्मिती, ज्या जीवनांत दुस-यांनी निर्माण केलेले रहावे, प्यावे, भोगावे व नाचावे या पलीकडे काहीएक नसते-अशा वरच्या वर्गातील लोकांच्या या करंटया जीवनाशी तुलना करिता अनंत वैचित्र्यपूर्ण असे कामक-यांचे जीवन कंटाळवाणे, नाविन्यहीन असे वाटावे काय?