गायू (१८५४-१८८८) तो म्हणतो, ''सौंदर्य हे वस्तूवर काहीतरी बाहेरून चिकटवलेले, बांडगुळाप्रमाणे उगवलेले असे नसते, तर सौंदर्य हे त्या वस्तूच्या अंरंगांतूनच फुलून बाहेर पडत असते. विचारयुक्त व जाणीवयुक्त अशा जीवनाचे भावदर्शन म्हणजे कला होय. ह्या कलेमुळे आपणांस जीवनाचा गंभीर अर्थ कळतो, जीवनाची खोल अशी अनुभूति येते; ह्या कलेमुळे परम थोर भावना अति उदात्त असे विचार आपल्या हृदयात उचंबळतात. व्यक्तीला संकुचित वैयक्तिम जीवनातून उचलून त्याला व्यापक विश्वात्मक जीवनात नेऊन सोडणे हे कलेचे महान मध्येय आहे. कला संकुचितपणाला दूर करते. समानविचार, समानश्रध्दा एवढेच नव्हे तर समानभावनाही कला आपणास देत असते.''

चेरबुलीझच्या मते, कला म्हणजे व्यापार होय-एक प्रकारची चेष्टा होय. कला (१) आकाराची, रूपाची, जन्मत:च असलेली इच्छा तृप्त करते. (२) या आकारांना कल्पनांनी नटविते. (३) इंद्रिये, हृदय व बुध्दि या तिहींना ती आनंद देते.

तत्त्वत: सौंदर्य हे वस्तूत नसून ते आपल्या आत्म्यातून प्रकट होत असते. सौंदर्य म्हणजे मोहक मृगजळच होय. समुद्रावरचा तरंग तसे हे सौंदर्य. वास्तविक सौंदर्य म्हणून काही नाहीच. अंतिम सत्य म्हणून सौंदर्य आहे असे नाही. जे महत्त्वाचे व प्रमाणबध्द असे काही दिसते, जे सुसंगत व सुसंवादी असे काही दिसते ते आपणास सुंदर वाटते, झाले.

कोस्टरचे म्हणणे असे की, सत्यंशिवंसुंदरंच्या कल्पना आपल्याठायी जन्मजातच असतात. ह्या कल्पना आपल्या जीवनाला प्रकाश देतात. ह्या कल्पना म्हणजेच ईश्वर. ईश्वर हा सत्य, शिव व सुंदर आहे. सौंदर्याच्या कल्पनेत ऐक्य, निरनिराळया अवयवांची अनेकता व परस्पर व्यवस्था ह्या गोष्टी असतात. व्यवस्थेमुळेच जीवनातील नानाविध व्यवहारात, नाना भिन्न भिन्न आविष्कारात आपण ऐक्य पाहू शकतो.

अगदी आताआतापर्यंतची मते माहीत असणे बरे म्हणून तीही थोडक्यात देतो. १८९५ मध्ये प्रसिध्द झालेल्या एका फ्रेंच ग्रंथांत असें म्हटले आहे की ''सौंदर्य हे आपल्या शारीरिक भावनांपासून निर्माण होतें. कलांचा हेतु सुख हा आहे, हे मुख नैतिक असणें आवश्यक आहे'' १८९८ मध्ये दुसरा एक ग्रंथ प्रसिध्द झाला आहे. हा ग्रंथकार असें म्हणतो की ''कलवान् स्वतःच्या व्यक्तित्त्वाचा आकार ज्यावेळेस वस्तुला देत असतो, त्यावेळेस त्याच्या मनात भूताकाळासंबंधीच्या ज्या कल्पना असतात व वर्तमानकाळातील जे ध्येय असतें - त्या सर्वांचा परिणाम कलेवर होत असतो, त्या निर्मितीवर होत असतो.

१८९४ मध्ये पेलॅडन म्हणून पंडित झाला. तो म्हणतो कीं ''परमेश्वराची प्रकट होण्याची जी अनेक द्वारें, त्यांतील सौंर्द्य हे एक आहे. सौंर्द्य म्हणजे परमात्मदर्शन. ईश्वराशिवाय अन्य कशालाच सत्यता नाही; ईश्वरावाचून अन्य कशांत सौंदर्य नाही. ईश्वरच फक्त सत्य व सुंदर आहे. पेलॅडनचा ग्रंथ फार विचित्र आहे. हा ग्रंथ पोरकट व गांवढळ आहे असे म्हटले तरी चालेल. असं आहे तरीहि ह्या ग्रंथांतील काही सिध्दांत विशेष महत्त्वाचे आहेत व तरुण पिढीला हा ग्रंथ फार आवडतो. तरुणांचा आवडता ग्रंथ म्हणून हा प्रसिध्द आहे.

फ्रान्समधील सौंदर्यविषयक विचार जवळजवळ सारे सारखेच आहेत. एक व्हेरॉनचे पुस्तक मात्र त्याला अपवाद आहे. व्हेरॉनचा ग्रंथ विवेचनपूर्ण असा आहे. विषयाची स्पष्ट व विषद मांडणी त्याने केली आहे. कलेची अगदी बरोबर अशी व्याख्या जरी ह्या ग्रंथांत दिलेली नसली, तरी पण अंतिम सौंदर्याच्या, ध्येयभूत सौंदर्याच्या, गूड कल्पनांतून सौंदर्यशास्त्रात त्याने मोकळे केले आहे. १८२५-८९ हा त्याचा काळ होय. तो म्हणतो ''कला म्हणजे भावनाप्रकाशन. हे भावनाप्रकाशन रेखा, रंग व आकार यांच्या समुश्चयानें किंवा गति, सूर, शब्द यांच्या अनुक्रमाने केलें जातें. गति, सूर व शब्द यांत एक प्रकारचा मेळ, तालबध्दता असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel