जगाच्या आरंभापासून तो आजपर्यंत वैषयीक अनिर्बंधाचे काय परिणाम होतात ते दिसून येतच आहे. प्राचिन ट्रोजनबॉर या वैषयीक वासनांमुळेच झाले; आणि आजच्या आत्महत्या व खून इत्यादि मानवी दु:खांचे हेच कारण आहे. वर्तमानपत्रांतून या वैषयीक वासनेच्या अतृप्तांमुळे आत्महत्या व तिच्या आड येणा-या दुस-यांचे खून अशा गोष्टी नेहमी वाचावयास मिळतात.
आणि हे असे चालले असून कला काय करीत आहे? बहुतेक सर्व कला थोडेफार अपवाद वगळून नाना मिषांनी, नाना स्वरूपोत हे वैषयीक प्रेम रंगविण्यातच मग्न आहेत. हे वैषयीक प्रेम उतानपणे वर्णिन्यात येत असते. कादंब-यांची नुसती स्मृती होताच ती विषयवासना उद्दिपीत करणारी वर्णने डोळयांसमोर उभी राहतात. काही वर्णनांना थोडी मर्यादा तरी असते, परंतु काहींना हे बंधन रुचत नसते. या असल्या साहित्याने सारा समाज भरलेला आहे. स्त्रियांची नग्न शरीरे व इतर किळसवाणे प्रकार दाखविणारी चित्रे व शिल्पे-जी चित्रे वर्तमानपत्रांतून, मासिकांतून व जाहिरातींतून सारखी दिली जात आहेत; तसेच नाटकगृहे, नाचघरे, सिनेमा, जलसे-यांतील गीते, तमाशेवजा लाजिरवाणे प्रकार, शरीर शक्य तितकी उघडी करून होणारे नाच-इत्यादि प्रकारांची नुसती आठवण केली तरी असे दिसते की, आजच्या कलेला जणू एकच विषय आहे-तो म्हणजे दुर्गुणांचे बीज सर्वत्र पेरणे हा होय. दुर्गुण जितके फैलावता येतील तितके फैलवायचे हेच जणू तिचे ध्येय झाले आहे.
या विपरीत कलेमुळे समाजात आज जे दुष्परिणाम होऊन राहिले आहेत, त्यातील हे उघड उघड दिसणारे काही दाखविले. समाजात आज जी कला म्हणून आहे, ती मानवजातीच्या प्रगतीस पोषक तर नाहीच, उलट मानवी जीवनातील सर्व साधुत्वाला, सौजन्याला, मांगल्याला, संयमाला, जे जे चांगले व थोर आहे त्याला कसून विरोध करणारे जर कोणी असेल तर ती आजची कला होय.
या सध्याच्या बाजारबसवी कलेपासून जो अलिप्त आहे, या सद्य:कालीन कलेशी ज्याचा स्वार्थसंबंध नाही, अशाच्या मनात ह्या ग्रंथाच्या आरंभी जो प्रश्न विचारला तो सहजच उभा राहतो. तो प्रश्न म्हणजे जी कला वरच्या मूठभर लोकांची आहे, अशा ह्या कलेसाठीच का हे अनंत मानवीश्रम? अशा ह्या कलेसाठीच का ही मानवी जीवने, ही नीति, हा चांगुलपणा यांचा होम होत आहे? सहाजिकच उत्तर येते, होय. मग असा हा होम होणे इष्ट आहे काय? उत्तर येते, नाही. हा त्याग व हे अपार श्रम-सारे अनाठायी आहे, ह्या अशा गोष्टी होता कामा नयेत. ह्याला आळा बसलाच पाहिजे. ह्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे. ज्याची बुध्दि शाबूत आहे व भ्रष्ट झालेली नाही, ज्याच्या भावना अधिकृत व शुध्द आहेत अशा प्रत्येकाचे मन हेच सांगेल की नाही, हे असे मानवी जीवनाचे होम होता कामा नयेत. या गोष्टी होता कामा नयेत, एवढेच नव्हे, ही बलिदाने बंद झाली पाहिजेत; एवढेच नव्हे, तर ज्यांना योग्य रीतीने जगात जगावयाचे आहे, चांगले माणुसकीचे जीवन ज्यांना कंठावयाचे असेल, त्यांनी आपले सारे प्रयत्न, आपली सारी असेल नसेल ती शक्ती ह्या कलेच्या विनाशाकडे लाविली पाहिजे. कारण ही आजची कला म्हणजे मानवजातीला नाडणारे पाप आहे. मानवजातीला मातीत मिळविणारा हा शाप आहे.
परंतु पुन्हा प्रश्न विचारण्यात येईल की ख्रिस्ती समाजात आज जी कला मानली जाते, ती सारीच गमवायची का, ती सारीच नष्ट करावयाची का? जे वाईट आहे त्याबरोबर चांगल्याही दूर करावयाचे का? मला वाटते प्रत्येक विवेकी, विचारी व नीतिपर मनुष्य प्लेटोने या बाबतीत दिलेला जो निकाल मागे एकेठिकाणी दिला आहे तो मान्य करीन. आरंभीच्या ख्रिश्चन धर्मातील व इस्लामी धर्मातील उपदेशकांनीही तसाच निकाल दिलेला आहे. म्हणजेच नीतिमय मनुष्य म्हणेल की, ''आजची विषयोत्तेजक व पतित करणारी कला असण्यापेक्षा नसलेली बरी. एखादा सत्कण मिळावयाचा, परंतु त्याच्यासाठी खंडोबरी घाण कोण घेत बसतो? तो एखादा कणही नको व हे अपारंपार भूसही नको.'' सुदैवाने असा प्रश्न कोणाला पडणार नाही व कोणालाही तो या रीतीने किंवा अन्य रीतीने सोडवावा लागणार नाही. मनुष्य जे काही करू शकेल, आपण विचारवंत व सुशिक्षित समजले जाणारे-ज्यांना जीवनाचा अर्थ समजणे शक्य आहे असे-ह्या सर्वांना करता येईल ते एवढेच की जी चूक आपण करीत आहोत ती ओळखणे, जे पाप करीत आहोत ते समजून घेणे ती चूक व ते पाप पुन्हा पुन्हा करीत निगरगट्ट नाही व्हायवयाचे, तर या पापकंपातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावयाचा.