या सर्व व्याख्या तात्त्वि व गूढ व्याख्याप्रमाणेच सदोष आहेत, कारण सुख हा कलेचा हेतु असे येथे गृहीत धरिले आहे. मनुष्याच्या जीवनात कलेचे प्रयोजन काय, मानव्याच्या विकासात कलेचे स्थान काय, कला काय करते, या दृष्टीने कलेकडे त्यांनी पाहिले नाही.

कलेची जास्तीत जास्त निर्दोष अशी व्याख्या करता येण्यासाठी सुख हे कलेचे उद्दिष्ट आहे. ही कल्पना आधी विसरून गेले पाहिजे, आणि कला ही मानवी जीवनातील एक अति महत्त्वाची गोष्ट आहे असे मानावयास सिध्द झाले पाहिजे. या दृष्टीने कलेकडे पाहू लागताच मानवजातीचे परस्परांतील विचारविनिमयाचे, परस्परांतील व्यवहाराचे कला हे एक महान व प्रभावशाली साधन आहे असे आपणास दिसून आल्याशिवाय राहणार नाही.

कलाकृति स्वतःच्या जनकाशी स्वतःचे ग्रहण करणा-याचा संबंध जोडते एवढेच नव्हे, तर त्या ग्रहण करणा-याचा ज्यांच्या ज्यांच्या हृदयात आज तसेच भाव उठले असतील व ज्यांच्या ज्याच्या हृदयात पुढे उठतील - त्या सर्वांशी - भूत, वर्तमान व भविष्यकाळातील समान भावनांच्या भागीदारांशी संबंध जोडीत असते.

शब्दांनी आपण आपले विचार व अनुभव प्रकट करून दुस-यांना देत असतो. वाणी हे मानवात ऐक्य निर्माण करण्याचे, समान विचार निर्माण करण्याचे जसे साधन आहे, त्याप्रमाणेच कलाही एक साधन आहे. वाणीकृत व्यवहारांत व कलाकृत व्यवहारांत फरक इतकाच की वाणीकृत व्यवहारांत मनुष्य आपल्या भावनाहि प्रकट करूं शकतो. वाणींने मनुष्य विचार देतो, कलेने भावनाहि देतो.

कानांनी किंवा डोळयांनी मनुष्य दुस-याच्या भावना ग्रहण करू शकतो, एवढेच नव्हे तर ज्यांने त्या भावना प्रकट केल्या, त्याचे हृदय त्या भावनांनी जसे उचबंळले असले, तसेच भावना ग्रहण करणा-याचेही हृदय उचंबळून येते. या अनुभवावर कलाव्यापाराची उभारणी केलेली आहे. अगदी साधे उदाहरण घेऊ या. एक मनुष्य हसतो व त्यांचे हास्य पाहून दुसराहि आनंदी होतो, दुसराहि हसतो. किंवा एखादा मनुष्य रडतो व त्यांचे रडणे ऐकून दुसराहि दुःखी होतो. एखाद्याची प्रक्षुब्ध व अस्वस्थ स्थिती पाहून दुसराहि तसाच होतो. एखादा मनुष्य आपल्या हावभावांनी किंवा अभिनयानें, आपल्या विशिष्ट आवाजाने स्वतःचे धैर्य, निश्चय, दुःख किंवा शांति अशा निरनिराळया भावना प्रकट करितो व हीच प्रेक्षकांच्या मनाचीही स्थिती होते. एखादा मनुष्य कण्हतो, विव्हळतो व त्याचे ते विव्हळणें ऐकून दुस-याच्या हृदयाचीही कालवाकालव होते. मनुष्य आपल्या कौतुकाच्या, भक्तीच्या, प्रेमाच्या, आदराच्या, भीतीच्या, अशा नाना प्रकारच्या भावना, निरनिराळया वस्तूंबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा स्थानाबद्दल प्रकट करतो व दुस-याला त्या त्या वस्तूंबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा स्थानाबद्दल तत्सम भावनांच प्राप्त होतात.

दुस-याच्या भावनांचा भाव ग्रहण करून तत्सम भावना अनुभवण्याची मनुष्यात जी विशेष शक्ति आहे. त्या शक्तीवर कलेच्या व्यापाराचा पाया रचिलेला आहे.

ज्या वेळेस एखादा मनुष्य विशेष भावना अनुभवीत असत, त्यावेळेस स्वतःच्या मुद्रेने, किंवा स्वतःच्या अस्तित्वाने, किंवा बोलण्याने जर तो दुस-यास स्वतःच्या भावनांशी एकरूप करूं शकला तर तेथे कला आहे असे म्हणता येणार नाही. जो मनुष्य स्वतः हसतो व इतरांसहि हसवतो, स्वतः रडतो व इतरांसही रडवितो, स्वतः दुःख भोगीत असतां दुस-यांनाही ते दुःख अनुभवण्यास लावितो - तेथे कला आहे असे म्हणता येणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel