जी सर्वांची कला, त्या कलेतच स्वत:संबंधीचे एक निर्णायक तत्त्व असते; एक निरपवाद प्रमाण असते. हे प्रमाण म्हणजे धर्म्य व उदार भावनेचे, मंगल अशा दृष्टीचे. वरच्या वर्गाच्या कलेत याची वाण असते व म्हणून त्या कलेचे महत्त्वमापन करण्यासाठी, मूल्यमापन करण्यासाठी बाहेरचे गमक बनवावे लागते. अत्यंत उत्कृष्ट शिक्षण मिळालेले लोक बोलावून ते जो निर्णय देतील, तो निर्णय हे वरचे लोक मान्य करतात. त्या निर्णयावरून चांगले-वाईट ठरवितात. ज्यांना सुसंस्कृत म्हणतात, ज्यांच्या अधिकारावर व निर्णयावर हे सारे सोपविण्यात येते अशांची मग एक परंपरा निर्माण होते. एक संप्रदायच बनतो. उत्कृष्टत्व व हीनत्व ठरविण्याचे एक शास्त्र हे लोक बनवितात. त्या शास्त्रावरून मग निर्णय द्यावयाचा. हे शास्त्री व त्यांचे शास्त्र याच्यावर सारी भिस्त. परंतु हे शास्त्र पुष्कळ गैरसमज करणारे, फसवणूक करणारे असे असते. एक तर या उत्कृष्ट सुशिक्षितांची मतेही सदोष व चुकीची असतात. आणि दुसरे एकेकाळी जे निकाल मान्य झाले ते आजही तसे मानणे हे योग्य नसते. परंतु टीकाकाराच्या निर्णयास ना आधार ना पाया. तो ते शास्त्र पुढे आणील, परंपरा पुढे आणील. त्याला स्वत:ला स्वतंत्र अक्कल व जिवंत हृदय ही उरलेलीच नसतात. रोमन व ग्रीक लोकांची कलापरंपरा पूर्वी चांगली मानीत, म्हणून आजचे टीकाशास्त्र अजूनही ती पध्दतीच चांगली असे मानते. डान्टे हा थोर कवी म्हणून मानला गेला, रॅफेल हा थोर चित्रकार म्हणून नावाजला गेला, बॅक हा मोठा संगीतज्ञ म्हणून गाजला. आजचा टीकाकार-ज्याच्याजवळ असत्कलेपासून सत्कला वेगळी काढण्याचे प्रमाण नसते-ह्या पूर्वीच्या कलावानांनाच थोर मानतो, एवढेच नव्हे, त्यांच्या सर्व कृती कौतुकास्पद, आदरणीय व अनुकरणीयही समजत असतो. टीकाशास्त्राने उभे केलेले जे हे अधिकारी, ह्या अधिका-यांनी कलेची जितकी विटंबना व विकृतता केली आहे, ह्यांनी कलेला जितकी भ्रष्ट व विपरीत केली आहे, असे दुस-या कुणीही केले नाही. अजूनही ह्या टीकाकारांचा हा असध्दर्मच सुरूच आहे. कलावानाला एखाद्या भावनेचा अनुभव येतो. तो स्वत:च्या विशिष्ट अशा रीतीने त्या भावनेला कलारूपाने प्रकट करतो. तो खरा कलावान आपला स्वानुभव जगासमोर मांडतो. त्या कृतीत ओतलेल्या भावनेने बहुजनसमाजास स्पष्ट होतो. त्यांची हृदये भरून येतात, कलावानाच्या कृतीचे ते कौतुक करतात. ती सत्कृती सुविख्यात होते. प्रत्येकाच्या ओठांवर त्या कृतीचे नाव खेळते. त्यानंतर टीकाशास्त्र जागे होते. त्या कलावानांसंबंधी ते चर्चा करू लागते आणि शेवटी म्हणते की हा कलावान जरी फारसा वाईट नसला, जरी ब-यापैकी असला, तरी तो काही डान्टे, शेक्सपिअर, गटे नाही; तो रॅफेल किंवा बीथोव्हेन नाही. हे अमर असे कलावान दूर अप्राप्य असेच आहेत. त्यांच्याजवळ कोण जाऊन पोचेल?'' ही टीका ऐकून तो उदयोन्मुख तरुण कलावान या अमर आदर्शाचे अनुकरण करू लागतो व दुबळया अनुकरणात्मक कृती तयार करतो, इतकेच नव्हे तर नकली कलाकृती, खोटया कलाकृती, ज्यांत ना त्याचे हृदय, ना त्यांचा अनुभव-अशाने तो निर्माण करतो.

पुष्किनने पुष्कळ लहान लहान कविता व गोष्टी लिहिल्या. त्याच्या या सर्वच कृती जरी सारख्या योग्यतेच्या नसल्या, तरी सर्वांत खरेपणा आहे. कृत्रिमतेचा तेथे वास नाही. परंतु पुढे शेक्सपिअरची स्तुतिस्तोत्रे गाणारे टीकाशास्त्र त्याच्या हातांत येते. तो ते वाचतो. त्याचा परिणाम त्याच्यावर होऊन तो शेक्सपिअरचे अनुकरण करू लागतो. Baris Goduno  म्हणून तो एक कृती रचतो. ना त्या कृतीत भावना, ना रस, ना रंग. काहीतरी आदळ आपट आहे. सारे ओढून ताणून आणलेले. उरस्फोड व डोकेफोड मात्र आहे. टीकाकार या कृतीची नावाजणी करतात. ही कृती आदर्शकृती म्हणून उल्लेखितात. या कृतीचे मग अनुकरण होऊ लागते; तिच्या नकला बाजारात मिळू लागतात. सर्व राष्ट्रांच्या साहित्यात असे  प्रचार आहेत. नकलांच्या नकलांच्या नकलांच्या नकला असे होत जाते. टीकाकार स्वत: भावनाशून्य असतो. त्याच्या हृदयाची जातच अशी असते की भावना त्याला स्पर्श करावयास धजत नाही; भावना तेथे जावयास लाजते, ती माघारी मुरडते. भावनेचा जेथे अभाव आहे, मेंदूचे काहीतरी तर्कट जेथे आहे, अस्पष्ट व गोंधळलेले असे विचार जेथे मांडलेले आहेत, तेथे टीकाकार रमतो. अशा कृतींची तो पाठ थोपटतो, अशा कृतींना चिरंजीव भव, आयुष्मान भव असे आशीर्वाद तो देत असतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel