''आता दहावीस वर्षे कोठली, आता एक वर्ष, एक महिनाही आपल्या वाटयास नाही असे जेव्हा वाटते, ज्यावेळेस दहा तास, दहा घटका अशा शब्दांनीच आपणास उर्वरित आयुष्याचा हिशोब करावा लागतो, घटका व पळेच आपण मोजीत बसतो, प्रत्येक येणारी रात्र म्हणजे त्या अज्ञाताचे आलेले आमंत्रण असे जेव्हा वाटते, प्रत्येक रात्र त्या अपरिचित मृत्यूची भीतीच घेऊन येत आहे असे जेव्हा वाटते, अशा वेळेस कला, शास्त्रे व राजकारण या सर्वांचा उघड उघड आपण त्याग करतो. आपण आपल्या हृदयाजवळ मग बोलू लागलो, स्वत:शीच हितगुज करतो आणि हे हितगुज शेवटच्या क्षणापर्यंत चाललेले असते. शेवटच्या क्षणापर्यंत ते शक्यही असते. मरणाची शिक्षा ज्याला फर्मावण्यात आली आहे, कांही तासांचाच जो सोबती आहे, अशाला एकच गोष्ट शिल्लक उरलेली असते व ती म्हणजे स्वत:च्या हृदयाजवळ बोलणे, स्वत:च्या अंतरात्म्याजवळ बोलणे, हे आंतरिक संभाषणच काय ते त्याला उरते. मरणाची शिक्षा झालेला हा गुन्हेगार स्वत:ची सर्व शक्ति अंत:करणांत एकत्र करतो. आता मनोवृध्दि... इंद्रियांचे किरण बाहेर जात नाहीत. सारी अंतर्मुख होतात. मनुष्य स्वत:शी बोलतो, स्वत:ला बघतो, स्वत:ला ऐकतो. अत:पर कोणतेही कर्म तो करीत नाही. एक चिंतन मात्र चालू असते. तो आता कर्ता, नसतो, तर केवळ श्रोता, मन्ता व द्रष्टाच असतो आणि तो कोणाचा तर स्वत:चाच. एखादा दमला-भागलेला ससा आपल्या बिळांत घुसतो, त्याप्रमाणे जीव सदसद्विवेक बुध्दीच्या घरटयांत, स्वत:च्या जाणीवेत, स्वत:च्या ज्ञप्तीत जणू जाऊन बसतो. जोपर्यंत लेखणी धरवते, जोपर्यंत हा एकान्त आहे, तोपर्यंत अंत:करणातील तो प्रतिध्वनि, तो अंतर्नाद, तो सिंहनाद, ती मंजूळ मुरली तो ऐकतो, त्यासमोर एकाग्र होतो, ईश्वराजवळ बोलाचाली करतो.

परंतु हे नैतिक निरीक्षण नव्हे, नैतिक संशोधन नव्हे; ही नैतिक चिकित्सा नव्हे. हा पश्चाताप नाही, ही प्रार्थना नाही. ही केवळ शरणागति असते.

माझ्या मुला! दे, तुझे हृदय मला दे.

जे जे होईल ते ते मुकाटयाने सहन करणे, इवलीदेखील कुरकूर न करणे हे इतरांपेक्षा मला अधिक शक्य आहे. कारण मला कांहीएक नको आहे. कशाचीही मला इच्छा नाही. माझी हांव सरली आहे. फार हाल होऊ नयेत, एवढी एकच इच्छा आहे. भगवान् ख्रिस्तानेसुध्दा त्या जेरूसलेम येथील बागेत हीच गोष्ट मागितली. परंतु शेवटी तो महात्मा काय म्हणाला, ''प्रभो, तरी पण तुझी इच्छा अशी असेल तसेच होवो. माझी इच्छा मरो व तुझीच पुढे सरो.'' ख्रिस्ताप्रमाणेच आपणही त्या प्रभूला म्हणू या की ''प्रभो, मी नाही, मी नाही, तूही तूही तूही... एक तूच मात्र आहेस. तुझी इच्छा प्रमाण.'' असे म्हणून आपण वाट पाहू या.''

जीवनाच्या सायंकाळी मरण जवळ येत असते. अ‍ॅमिलची अशी वृत्ति होती. अ‍ॅमिलच्या या रोजनिशीत भाषासौष्ठव भरपूर आहे, परंतु त्यामुळे कोठेही दुबंधिता किंवा कृत्रिमता आली नाही. भाषासौंदर्यामुळे प्रामाणिकपणा, कळकळ, उत्कटता, स्पष्टता या गुणांची बिलकूल हानि झालेली नाही. उत्कृष्ट व वेचक शब्द वापरण्याची त्याला सवयच झाली होती. ज्या गोष्टी आपण मुद्दाम काळजीपूर्वक विसरण्याची खटपट करीत असतो, त्या गोष्टीचे तीस वर्षे अ‍ॅमिल सारखे चिंतन करीत होता. त्या गोष्टीचा अनुभव घेत होता, त्या गोष्टीचे मनन करीत होता. आपणा सर्वांस मरणाची शिक्षा फर्मावलेली आहे. आज का उद्या. का चार दिवसांनी एवढाच प्रश्न. परंतु ही शिक्षा, ही गोष्ट आपण डोळयावर कातडे आणून मुद्दाम विसरतो व अ‍ॅमिलला ह्याची सदैव जाणीव आहे. त्याच्याजवळ ही जागरूकता, ही दक्षता होती म्हणूनच हे त्याचे लिहिणे, ही त्याची रोजनिशी इतकी गंभीर, हितकर, उपयुक्त व कळकळीची अशी झाली आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel