रशियातील कामक-या शेतक-यांचा जसा घोटाळा झाला तसाच तो इतर देशांतील कामकरी व शेतकरी यांचाही होईल. फ्रान्स देशात बाइलिअरचा जर कोणी पुतळा उभारिला, किंवा भ्रष्ट व दुराचारी जो व्हर्लेन त्याचें कोणी भव्य स्मारक उभे केले तर तेथील सामान्य श्रमजीवी लोकांस वॉइलिअर व व्हर्लेन हे कोणी थोर महात्मे किंवा थोर तलवारबहाद्दर असावेत असेच वाटेल. आणि मग ते त्या दोघांच्या जीवनांची माहिती मिळवू लागल्यावर जेंव्हा या जोडीचे खरे स्वरूप त्यांना कळेल, तेंव्हा त्यांची किती बरे निराशा होईल? कोणी पट्टी किंवा टँग्लिऑनी यांना दहादहा हजार पौंड एकेका वेळी मिळाले, एका चित्रकाराला एका चित्रासाठी लाख रूपये मिळाले किंवा प्रेमप्रसंगांची कादंबरी लिहिणा-या कोणाला याहूनही अधिक प्राप्ती झाली, इत्यादि बातम्या जेंव्हा एखादा शेतकरी ऐकतो, तेंव्हा तर त्याच्या डोक्यात काय गोंधळ उडत असेल याची कल्पनाच करणे बरे.

मोठया माणसांचीच नाही तर मुलांचीही अशीच फसगत होते. त्यांचा घोटाळा होतो. त्यांना हे सारे आश्चर्य वाटते. मी स्वत: या स्थितीतून गेलेलो आहे. थोर संत व पराक्रमी वीर यांच्या जोडीला अशा कलावानांना आणून बसविण्यासाठी मला नीतीचे महात्म्य मनात कमी करावे लागले, असे करण्यासाठी नीतीची पूजा करणे मला सोडून देणे जरूर होते. कलाकृतींना नसते व भलते महत्त्व मला द्यावे लागले, प्रत्येक मुलाच्या मनात असाच घोटाळा उत्पन्न होणार. नीतीबद्दल तो साशंक होणार. कलावानाला जो कल्पनातीत मान व जे कल्पनातीत बक्षीस दिले जाते, त्याचे मुलांना व सामान्यजनास आश्चर्य वाटते. आपला समाज व कला यांच्यामध्ये जो आज अथार्थ व खोटा संबंध आहे, त्याचा हा तिसरा दुष्परिणाम होय.

चौथा दुष्परिणाम : सौंदर्य व सादुता यांच्यामध्ये वरच्या वर्गातील लोकांना दिवसेंदिवस अधिकाधिक अंतर दिसून येऊ लागल्यामुळे सौंदर्याच्याच ध्येयाला त्यांनी पहिले स्थान दिले व नीतीला सौंदर्याची दासी केले. सौंदर्य ही राणी व नीति तिची बटमिक - असे त्यांनी केले. सद्विवेकबुध्दीचा गळा त्यांनी दाबून टाकला. ख-या वस्तुस्थितीप्रमाणे स्वत:ची कलाच आता जुनाट व टाकाऊ झाली आहे हे कबूल न करता, नीतीच जुनीपुराणी गोष्ट झाली आहे असे ते म्हणू लागले. उच्च संस्कृतीत वावरणा-याला, 'विकासाच्या व उत्कर्षाच्या उच्च भूमिकेवर असलेल्या नीतीची जरूर तरी काय असेही ते उघड उघड विचारू लागले आहेत. स्वत:ला विकासाच्या परमोच्च भूमिकेवर गेलेले असेच ते अर्थात मानतात!

कलेशी असणारा हा जो असत् व अयोग्य संबंध त्याचे परिणाम कितीतरी दिवसांपासून दिसून येऊ लागलेले आहेत. परंतु अलिकडे निट्शे व त्याचे झील धरणारे, साथ देणारे साथीदार, तसेच दुर्बोधत्व हे कलाकृतीचे अंग आहे असे म्हणणारे काही पंडित, निट्शे वगैरेंशी ज्यांचे बरेचसे जुळते असे इंग्लंडमधीलही काही सौंदर्यमांसक-हे आल्यापासून, यांचे युग सुरू झाल्यापासून कलेचा व नीतीचा काही, एक संबंध नाही, एवढेच नव्हे तर नीतीचा या हद्दींच्या सुधारलेल्या जीवनाशीही काही संबंध नाही असे बेमुर्वतपणे व उच्छृंखलपणे उद्धोषिले जात आहे. दुर्बोधत्वाचे पुरस्कर्ते तसेच एकेकाळी ओस्कार वाइल्डने ज्यांचे पुढारीपण घेतले होते असे कांही कलामीमांसक कलेला विषयच असा शोधून काढतात की जेथे नीतीचा निषेध व अनीतीचा पुरस्कार करता येईल, जेथे नीतीला लाथ मारून अनीतीला हात जोडता येतील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel