प्रकरण दहावे
(सुबोधतेचा अभाव; दुर्बोध कला; नवीन फ्रेंच कला; ही कला वाईट आहे असे म्हणण्याचा आपणांस अधिकार आहे का? परमोच्च कला सामान्य जनतेस सदैव समजत असे; सामान्य जनतेस जी कला समजत नाही ती कलाच नव्हे.)
श्रध्दा नसल्यामुळे वरच्या वर्गातील लोकांच्या कलेला काही फारसा विषयच उरला नाही. परंतु याशिवाय, दिवसेंदिवस ही कला असंग्राहक होत गेल्यामुळे, सामान्य जनापासून दूरदूर जात चालल्यामुळे, ती दुर्बोध, गुंतागुंतीची व कृत्रिम अशी होऊ लागली.
जेव्हा एखादा जागतिक कलावान् स्वत:ची कृती निर्मिती (असे जागतिक कलावान् ग्रीक लोकांत काही होते; ज्यू लोकांतील पहिले धर्मोपदेशकही असे होते.) तेव्हा त्याला जे काही सांगावयाचे असते, ते तो अशा रीतीने सांगण्याचा साहजिकचज प्रयत्न करितो की, ते सांगितलेले विश्वजनांस समजेल. परंतु सुख, संपत्ती व सत्ता यांत लोळणा-या मुठभर विवक्षित लोकांसाठी म्हणून जेव्हा कलावान् काही निर्माण करू लागतो, रचू लागतो, तेव्हा त्या लोकांनाच फक्त समजावे, त्यांच्यावरच परिणाम व्हावा म्हणून तो प्रयत्न करतो. ह्या श्रीमंतांची स्थिती त्याला माहीत असते. सर्वसामान्य जनतेस कधीच न लाभणारा, दुस-यांना हेवा उत्पन्न होण्यासारखा असा त्यांचा जीवनक्रम, याचे ह्या कलावानाला ज्ञान असते. कधी कधी हा कलावान् एखाद्या राजासाठीच, एखाद्या पोपसाठीच, एखाद्या राणीसाठीच म्हणून लिहित असतो. ज्याला आपली कलाकृती सर्व जगासाठी करण्याची इच्छा असते असा जो जागतिक कलावान् त्याच्या कामापेक्षा, या एखाद्या राजाराणीसाठी लिहिणा-या कलावानाचे काम फार सोपे असते. राजाला समजले म्हणजे झाले. राणी खूश झाली म्हणजे बस्स. राजाराणींना कशांत सुख असते, त्यांचे जीवनक्रम कसे असतात, त्यांच्या आवडीनावडी काय हे त्याला सारे माहीत असते. अशा कलावानाला आपले पांडित्य दाखविण्याची फार हौस असते. आपले काव्य किती कठीण आहे. किती थोडया लोकांना ते समजते हे त्यांना, राजे-महाराजांना वगैरे दाखवावयाचे असते. आपल्या लेखनांत असे काही दूरचे संदर्भ, अशा काही आख्यायिका, असे काही संकेत तो आणतो की, फार थोडया व्यक्तींनाच ते समजतील व उमजतील, बाकीच्यांना ते दुर्बोध राहतील. एक तर अशा प्रकारे वाटेल तितके लिहिता येत असे; आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाषाशैली जितकी संदिग्ध व गहन गूढ तितकी त्या कलेतील मार्मिकांना व दीक्षितांना गोडी जास्त वाटत असे. अशी ही जी अगडबंब, संदर्भप्रचुर, दुर्बोध भाषासरणी-तिचा प्रसार होतां होतां शेवटी कळस झाला. दुर्बोध लिहिणा-यांचा एक संप्रदायच निघाला! पुढेपुढे तर केवळ गूढ, अस्पष्ट असंग्राहक (सामान्य लोकांना दूर ठेवणे) लिहिणे हेच गौरवाचे मानले गेले असे नव्हे तर चुकीचे लिहिलेले रूक्ष व भावनाहीन लिहिलेले, कसे तरी कडबोळयासारखे लिहिलेले यालाही श्रेष्ठपणाचा मान मिळू लागला! चुकीचे लिहिलेले! होय, कलावान् चुकीचे कसे लिहील? ज्याअर्थी चूक दिसते, त्याअर्थी त्यांत काहीतरी गूढ दुसरा अर्थ असला पाहिजे-असे म्हणून वाचू लागत व डोलू लागत!
बॉडलिअरच्या दु:खाची फुले (Flowers of evils) या प्रसिध्द काव्यपुस्तकाच्या प्रस्तावनेत थिओफिल् गोंटियर लिहितो ''बॉडलिअरने काव्यप्रांतांतून उत्कटता, भावना, सत्य, यथार्थता यांना हद्दपार केले आहे.''
बॉडलिअरने इतकेच केले नाही, तर स्वत:च्या या कृत्याचे स्वत:च्या कवितांत समर्थनही केले आहे; या प्रकारची त्याने तरफदारी केली आहे. बॉडलिअरच्या गद्यपद्य भागांचे एक पुस्तक आहे. या पुस्तकांतील गद्याचा डोके खाजवून खाजवून पाहिले तरी अर्थ लागणार नाही! अर्थाचा कितीही तर्क केला, तरी शेवटी अर्थ गुप्तच राहतो.
व्हर्लेन हाही एक मोठा कवी म्हणून मानला जातो. बॉडलिअरचे जसे अनुकरण होऊ लागले, तसे याचेही होऊ लागले. 'काव्यरचनेची कला' म्हणून याने एक प्रबंध लिहिला. काव्यांतील भाषाशैली कशी असावी याबद्दल तो उपदेश करतो.