आपल्या आजच्या समाजात असे सांगण्यात येत असते की, कलावानाला जर निर्वाहाची निश्चिंतता असेल, त्याला पोटापाण्याची कोणत्याही प्रकारची विवंचना व काळजी जर नसेल, तर तो अधिक चांगली व अधिक विपुल कला निर्माण करील. असा सुखासीन कलावान् पुष्कळ कलाकृती देईल व त्या अधिक सुंदरही असतील. आजकाल आपण जिला कला म्हणतो, ती खरी हृदयसंभव नसून वरपांगी व दांभिक आहे हे सिध्द करावयास अजूनही पुरावा पाहिजे असेल तर हे वरचे मत बघा. हे वरील मत हीच गोष्ट सिध्द करीत नाही का? अशा सुखवस्तु कलेत कलावानाचे आंतडे नसते; तेथे त्याचे हृदय नसते, त्याच्या जीवनाचे सार नसते. कलाकृती म्हणजे कलावानाचे हृदय त्या कलाकृतीला पाहताच तिच्या निर्मात्याचे, तिच्या जनकाचे अंतर्जीवन आपण पहात आहोत असे वाटले पाहिजे. कलाकृती अंत:समुद्रातून न्हाऊनमाखून बाहेर आलेली असते. कलाकृतीला स्पर्श करताच जिवंत उडणा-या हृदयाला स्पर्श करीत आहोत असे वाटले पाहिजे. मूर्त भावना म्हणजे कलाकृती. पगार घेणारे, सुखात लोळणारे, निश्चिंत असणारे अशांच्या कलाकृती अशा असू शकतील का? ज्यांची कला पैशावर अवलंबून आहे ती पोटातील कला नसून पोटार्थी कला आहे. कलावानाने कलेचीच सतत सेवा करीत राहिले पाहिजे ही गोष्ट चूक आहे. कला हा एक श्रमविभागाचा प्रश्न नाही, कला हा धंदा नाही. धंद्यामध्ये श्रमविभाग असतो. जोडे शिवावयाचे असतील, पावरोटी भाजण्याचे काम करावयाचे असेल तर तेथे श्रमविभाग आवश्यक आहे. जोडे शिवणा-यास स्वत:चा पाव तयार करण्याचीही पाळी येणे व पाव तयार करणा-यास स्वत:चा जोडा शिवीत बसावयास लागणे, ह्यात त्या दोघांना त्रास आहे. तेथे तो श्रमविभाग सोयीस्कर आहे. परंतु तुम्ही श्रम करा व मला पैसे द्या आणि मी तुम्हांला खोलीत बसून कलाकृती देतो, हे म्हणणे योग्य नाही. कारण कला म्हणजे भावनाप्रधान हे जर खरे असेल, तर त्याच माणसाला जिवंत, निरोगी व सतेज भावना देता येतील, तो मनुष्याला शोभेसे, संयमी, स्वाश्रयी श्रमी जीवन जगत असेल. ख-या कलावानाच्या हातून उत्कृष्ट कलाकृती निर्माण होण्यासाठी पोटाची निश्चिंतता, ऐषआराम व सुखासिनता यांची मदत न होता उलट अपायच होत असतो. ह्या गोष्टी हृदयाला व बुध्दीला पोषक नाहीत. जीवनार्थ श्रम करण्याची गोष्ट सर्व मनुष्यांना आवश्यक व हितकर अशी आहे. स्वत:च्या व इतरांच्या जीवनासाठी सृष्टीशी झगडणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सुखासीन कलावान् ह्या महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहणे इष्ट नाही. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून दूर राहून कसे चालणार? ज्या परिस्थितीत राहिल्यामुळे मनुष्यास नाना भावना सहज स्फुरतात, ती परिस्थिती गमावून कसे चालेल? इतर लोकांशी काम करताना संबंध येतात, सृष्टीशी तिच्या निरनिराळया रूपात आपण मिळून जात असतो-नाना अनुभव, नाना प्रसंग - ह्यातून तर भावनांचे पीक येत असते. ह्या सर्व संधी गमावून बसणारा जो सुखासीन कलावान् तो काय कलाकृती निर्माण करणार? कृत्रिम कलागृहातून वाढवण्यात येणा-या फिकट व दुर्बळ वनस्पतीप्रमाणे त्याच्या भावना दुबळया, रंगरूपहीन व निष्प्राण अशाच असणार. आजचे आपले कलावान् खाण्यापिण्याची चंगळ आहे, लोळण्याला गादीगिर्दी आहे अशा सुस्थितीत असतात व ही स्थिती त्यांच्या कलानिर्मितीस फारच अपायकारक, अनिष्ट व घातक अशी आहे.
भविष्यकालीन कलेचा खष्टा मानवाचे नैसर्गिक व सहज जीवन टाळणार नाही. श्रमजीवनाला तो कंटाळणार नाही, उलट कवटाळील. आणि असे जीवन जगत असता ज्या थोर आध्यात्मिक शक्तींचा त्याला अनुभव येईल, ज्या थोर भावनांचे त्याला दर्शन घडेल, त्याची फळे सर्व जनतेस, आबालवृध्दांस चाखावयास मिळावी म्हणून तो प्रयत्न करील. कारण ज्या भावनांचा, ज्या थोर सुंदर भावनांचा त्याला अंतरी अनुभव येतो, त्या भावना स्वत:च्या जितक्या अधिक भावाबहिणींना तो देईल तितका त्याला अधिक आनंद होणार हे उघड आहे. स्वत:च्या भावनात सर्व जगाला वाटेकरी करावे असे त्याला वाटते. हेच त्याचे परममुख असते. हेच त्याचे बक्षिस, हेच पारितोषिक. स्वत:च्या कलाकृतींचा अधिकाधिक प्रसार झालेला पाहण्यातच ख-या कलावानाचा आनंद असतो. पैसे घेऊन आपली कला कलावान् कशी विकीत याचे त्याला आश्चर्य वाटेल. त्याला हा चमत्कार समजणारच नाही.
कलामंदिराला बाजारपेठेचे रूप देणारे हे आजकालचे दलाल व व्यापारी-हे आजकालचे धंदेवाईक कलावान्-या सर्वांना दूर केल्याशिवाय कलेचे मंदिर पवित्र मंदिर म्हणून मानले जाणार नाही.