वाचकांच्या डोक्यावर पुस्तकाचे दैव अवलंबून असते. त्याचप्रमाणे नवीन मांडलेल्या विचारांचे व सिध्दांताचे दैवही लोकांच्या बौध्दिक कुवतीवर अवलंबून असते. जसा समाज-तशा त्या समाजाच्या कल्पना, तशी त्या समाजाची शास्त्रे, तसे त्या समाजाचे विचार, पुष्कळवेळा समाजात रूढ असलेल्या विचारांचेच समर्थन करण्यासाठी शास्त्रे निर्माण होत असतात! समाजांतील काही लोक जर चुकीची मते व चुकीचे विचार उराशी धरून बसलेले असतीस, आणि जर एखाद्याने त्या चुकीच्या विचारांचे समर्थन करणारे शास्त्र रचिले तर ते शास्त्र व ती विचारसरणी त्या लोकांत लगेच प्रिय होऊन बसतात. ते पुस्तक त्यांचे धर्मपुस्तक होते, त्यांतील वाक्ये म्हणजे वेदवाक्ये होतात! मग ती विचारसरणी, ते नवशास्त्र कितीही चुकीचे असले तरी हरकत नाही. त्याला नीट आधार, भक्कम पाया नसला तरीही फिकीर नाही. भरमसाट मते त्यात मांडलेली असली तरी त्याची लोकांना पर्वा नसते. अर्थशास्त्रांतील माल्थसच्या सिध्दात्र्नताची अशीच कथा आहे. ''जगातील लोकसंख्या भूमितिश्रेणीने वाढत आहे, परंतु जीविकेची साधने मात्र अंकगणित, श्रेणीनेच वाढत आहेत. यामुळे जगाला वाढलेली लोकसंख्या पोसवत नाही.'' या माल्थसच्या सिध्दात्र्नताची पुढे अशी वाढ झाली की, ''मानवी प्रगती नैसर्गिक निवड व जीवनार्थ कलह यांवर अवलंबून आहे व जो समर्थ आहे तो टिकेल व जगेल-इतरांना मरावेच लागेल. हे विचार लोकांना ताबडतोब आवडू लागले! तशीच ती मार्क्सची विचारसरणी. ''आस्ते आस्ते प्रचंड प्रमाणावर होणा-या यांत्रिक निपजीने लहानलहान धंदेवाले मरून जातील व हे अपरिहार्यच आहे'' असे हे निरनिराळे सिध्दांत, कितीही भ्रामक, अयथार्थ व असत्य असले, जरी ते हवेत उभारलेले असले, कोणत्याही प्रकारचा भक्कम पुरावा व आधार जरी त्यांना नसला, ते कितीही अनैतिक असले, मानवजातीने आजपर्यंत जे मानले, कबूल केले, मानवजातीला आजपर्यंत जे काही माहीत आहे, ज्ञात आहे, त्या सर्वांच्या विरुध्द जरी हे सिध्दांत असले, तरी आंधळेपणाने ते स्वीकारले जातात. त्यांची शहानिशाही कोणी करत नाही. ते सिध्दांत बरेवाईट आहेत का खरेखोटे आहेत ते कोणी पाहात नाही. हातोहाती तोंडोतोंडी भराभर ते पसरत जातात. शतकानुशतके त्यांचा उदोउदो होतो. व्यासपीठांवरून, सभांतून, मंदिरांतून, त्यांची घोषणा केली जाते. त्या सिध्दांतावर भाष्ये लिहिली जातात, प्रवचने दिली जातात, व्याख्यानमाला गुंफिल्या जातात. जिकडे तिकडे त्या सिध्दांताची शिकवण देण्यात येत असते. शेवटी ज्या परिस्थितीत ते सिध्दांत जत्र्नमाला आलेले असतात, ती परिस्थिती जेव्हा बदलते, तेव्हा ते सिध्दांत मरून जातात; किंवा या सिध्दांतातील अयुक्तता व बाष्फळपणा जर कधी दिसून आली तर ते मरून जातात. वामगर्टनची विचारपध्दती अशाच प्रकारची आहे. १९०० वर्षे ख्रिस्ताची शिकवण समोर असूनही जे मध्येय दोन हजार वर्षांपूर्वीच्या गुलाम पाळणा-या, दिसावयास सुंदर अशा इमारती बांधणा-या, नग्न अशा मानवी शरीराचे उत्कृष्ट पुतळे हुबेहूब तयार करणा-या अर्धवट रानटी, अशा थोडयाशा लोकांनी डोळयांसमोर ठेवले होते. तेच मध्येय आजच्या युरोपियन राष्ट्रांनी पसंत करावे यांत कलेने कमालच केली म्हणावयाची!
हे असे सारे परस्परविरोधी प्रकार खुशाल बिनदिक्कत चालले आहेत. सत्यं शिवं सुंदरं या त्रिमूर्तीच्या आराधनेतील एक भक्त बनून विद्वान् लोक घोटाळे उत्पन्न करणारे पृहद् ग्रंथ लिहित आहेत. त्या ग्रंथांत स्पष्ट काही नाही, विशद असे काही नाही. सत्यं, शिवं, सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं हे शब्द मोठमोठया ठश्यांनी जाडया जाडया अक्षरांत छापले जात आहेत. तत्त्वज्ञ, सौंदर्यसमीक्षक, कलावान्, कादंबरीकार, शिव व सुंदर या तिन्ही मिळून जणू एकच वस्तू, एकच देव, एकच मध्येय, एकच विचार-अशाप्रकारचे सिध्दांत मांडले जात आहेत व ते ऐकून ऐकणारे माना डोलवीत आहेत. हे पवित्र व धर्ममय शब्द उच्चारताना आपण काहीतरी अर्थपूर्ण व निश्चित असे सांगत आहोत असे त्यांना वाटत असते. ज्याच्या पायावर आपणांस आपले विचार, आपली मते उभारता येतील असे काहीतरी स्वच्छ, स्पष्ट व सारभूत आपण सांगत आहोत असे त्यांना वाटत असते. परंतु वास्तविक पाहू गेले तर या तिन्ही शब्दांना निश्चित असा अर्थ नाही, एवढेच नव्हे तर अस्तित्वांत असलेल्या कलेला काही विवक्षित अर्थ देण्याच्या कामीही या शब्दांमुळे अडचण होत आहे! केवळ नाना प्रकारच्या सुखसंवेदना देणारी जी आजची कला, तिचे नसते खोटे महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी मात्र ह्या शब्दांची जरूर असते, दुसरे काही नाही.