फार थोडा भाग वर सांगितलेल्या गोष्टीत येतो. हे मानवी जीवन नानाप्रकारच्या कलाकृतींनी भरलेले आहे. मुलाला झोपवताना म्हणण्यात येणा-या गोड ओव्या व अंगाई गीतें, परस्परांस हसवतांना होणा-या थट्टा करण्यात येणारे गुदगुदल्या वगैरे विनोद, नानाप्रकारच्या गंमतीच्या नकला, सुंदर हावभाव, घरांना रंगरंगोटी देऊन शृंगारणे, पोषाख, भांडीकुंडी, यांपासून तो भव्य मंदिरे, त्या मंदिरातील महोत्सव, सुंदर राजवाडे, रमणीय बागा, पुतळे, उंच मनोरे, मोठमोठया मिरवणुकी यांपर्यंत सर्वत्र कला भरून राहिली आहे. हा सारा पसारा म्हणजे कलात्मक व्यापारच होय. भावनाप्रसारक हा जो महान मानवी व्यवहार, विराट मानवी व्यापार, त्यातील काही भागच निराळा काढून घेऊन त्याला विशेष महत्त्व देण्यात येते व कला ही संज्ञा त्याला देण्यात येते.
धार्मिक प्रेरणेंने हृदयात उचंबळणा-या भावना ज्या व्यापाराने आपण अन्यसंक्रांत करतों, दुस-यांना देतो, त्या व्यापारास मनुष्यांनी विशेष महत्त्व सदैव दिले आहे; या मर्यादित व्यापारालाच मनुष्यांनी विशेषेकरून सर्वार्थाने कला हे नाव दिले आहे.
सॉक्रेटिस, फ्लेटो, ऍरिस्टॉटल - ह्या प्राचीन ऋषींनी त्याच दृष्टीने कलेकडे पाहिले आहे. कलेकडे पाहण्याची त्यांची ही अशीच धार्मिक दृष्टी आहे. हिब्यूधर्मोपदेशक, प्राचीन ख्रिश्चन संत यांचीही हीच दृष्टी होती. मुसलमानांचीही हीच दृष्टि होती व अजूनही ती कायम आहे; आणि शेतकरी वगैरे सारे लोक सारा बहुजनसमाज याच दृष्टीने कलेला ओळखीत आला आहे व आजही जाच दृष्टीने कलेला तो ओळखीत आहे.
मानवजातीतील काही थोर उपदेशक कलेला अजिबात निषिद्वही मानतात. फ्लेटोने आपल्या रिपब्लिक या ग्रंथांत कलेला अजिबात निषिद्धही मानिले आहे. प्राचीन काळातील ख्रिश्चन धर्मोपदेशक, अत्यंत कडवे असे मुसलमान व काही बुध्दधर्मीय भिक्षु कलेला थारा देत नाहीत.
कलेला या प्रकारे दूर राखणारे, कलेला निषिध्द मानणारे जे लोक त्यांना कलेची भीति वाटते. मनुष्यांची इच्छा नसतांही कला त्यांना उन्मत्त बनविते, बेहोष करिते. कलेमधील ही शक्ती फार धोक्याची व भयंकर अशी आहे. कलेनें थोडें फार मंगल होईल ते साधण्यासाठी कलेने होणारी अपरंपार हानीही पदरात घ्यावी लागेल. कला देईल थोडे, परंतु नेईल फार. एक बिंदु होईल. परंतु प्रचंड वणवेही पेटवील ! तेव्हा सारी कलाच अजिबात रद्द ठरवावी, हद्दपार करावी असे त्या थोर आचार्यानी ठरविले. सर्व प्रकारच्या कलेला सहानुभूति दर्शविण्याऐवजी अजिबात कलेचे उच्चाटणच करा असे ते सांगू लागले. (आज सुख देणारी सारी कला चांगलीच आहे असे ते सांगू लागले. (आज सुख देणारी सारी कला चांगलीच आहे असे मानले जाते. या आजच्या मताविरुध्द हे प्राचीनांचे मत आहे. कलेचे नाव घेऊन उभी राहणारी जी कला तिच्यातील फारच थोडी मानवजातीचे कल्याण करणारी, मानवी जीवनाला सुंदर व उन्मत्त करणारी अशी असते. बाकीची सारी कला उल्लू करणारीच असते).
अशाप्रकारे अजिबात सर्वच कलेला हाकलून देणे ही चूक आहे. कारण जे नाकारता येणें शक्य नाही त्याचा ते निषेध करू पहात होते. जे घालविणे शक्य नाही, त्याला ते घालवू पहात होते. परस्परभावना व परस्परविचार यांच्या विनिमयाचें कला हे अति महत्त्वाचे व अत्यंत बलशाली असे साधन आहे. कलाशिवाय मानवजात टिकू शकणार नाही. कलेविना असणारा मानवीसमाज म्हणजे पशूंचा कळप होईल. अर्थात त्याच बरोबर सौंदर्यनिर्माती - म्हणजेच केवळ जी सुख देणारी, ती सत् कला असे मानणारे आजचे सुसंस्कृत व सुधारलेले युरोपियन पंडित तेही तितकेच चुकलेले आहेत.
कलेच्या नावाखाली अशा काही कृति घरात घुसतील की ज्या समाजात बिघाड उत्पन्न करीतील, अनीति मानवतील अशा धास्तीने प्राचीन उपदेशकांनी कलेला अजीच दरवाजे बंद केले आणि आज कलेने मिळणारे एखादें सुख कदाचित् आपण गमावून बसू या भीतीने कलेच्या नावाने जे जे येतें, त्या सर्वांना आपण घरांत घेत आहोत आणि माझ्या मते ही दुसरी चूक पहिल्या चूकीपेक्षाही अधिक वातुक व अनिष्ट आहे; कारण या चुकीमुळे फार घोर परिणाम होण्याचा संभव असतो.