जे खरोखर घडलेले नाही, ते खोटे म्हणावयाचे का?
जे घडले, घडत असते तेच सत्य का? घडलेल्या गोष्टी माहीत असणे म्हणजेच सत्य समजणे का? मला वाटत नाही. इश्वराच्या इच्छेप्रमाणे काय घडले पाहिजे, कसे असले पाहिजे, हे जो ओळखतो तोच सत्य जाणतो; त्यालाच खरे काय ते समजते.
घडलेला प्रसंग जो वर्णन करतो, ह्या किंवा त्या माणसाने काय केले हे जो सांगतो, तो सत्य सांगतो असे नाही. लोकांनी योग्य केलेले जो दाखवितो, लोकांनी बरोबर केलेले जो दाखवितो, तो सत्य सांगतो. ईश्वराच्या इच्छेप्रमाणे काय योग्य आहे हे ज्याने दाखवून दिले त्याने सत्य सांगितले; ईश्वराच्या इच्छेविरुध्द जे आहे ते असत्य, ईश्वराच्या इच्छेप्रमाणे जे आहे ते सत्य... असे जो सांगतो तो सत्य देतो.
सत्य हा मार्ग आहे. ख्रिस्त म्हणतो, ''मी पंथ आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे.''
जो केवळ आपल्या पायाभोवतालचेच पाहतो, त्याला सत्य समजणार नाही, परंतु सूर्याच्या प्रकाशात कोणत्या मार्गाने जावयाचे हे जो पाहतो, हे जो ठरवतो त्याला ते समजेल.
घडलेले वर्णन करून सांगणारे वाङमय चांगले व आवश्यक आहे असे नाही. जे जगात असले पाहिजे, दिसले पाहिजे ते जर वाङमयाने दाखविले तर चांगले व उपयुक्त होय. सत् व असत् यांचे मूल्य ठरविणारे, लोकांनी काय केले ते न सांगता, त्यांनी काय चूक केले, काय बरोबर केले, त्यांनी काय केले पाहिजे होते... हे सांगणारे वाङमय चांगले होय. ईश्वराकडे जाणारा तो जो अरुंद व बिकट पंथ त्यांचे दर्शन जे वाङमय करून देते, ख-या जीवनाचा रस्ता जे दाखवून देते, ते वाङमय चांगले, ते महत्त्वाचे व ते आवश्यक होय.
असा हा पंथ चालविण्यासाठी, हा जीवनपंथ उजळण्यासाठी जे केवळ घडते ते वर्णून भागणार नाही. या जगांत असत् भरपूर आहे. पाप भरपूर आहे, दुष्टाव्याला काही कमी नाही. जग असे आहे तसे त्याचे वर्णन करू जाणे म्हणजे हे उकिरडेच दाखविणे होय. जगातील पापांचेच वर्णन करीत बसावे लागेल, अन्यायांचेच अहवाल देत बसावे लागेल... मग सत्य दूरच राहील. जे आपण वर्णन करू त्यात सत्य असावे म्हणून, जे आहे त्याबद्दल न लिहिता कसे असावे त्याबद्दल लिहावे. जे आहे त्याचेच यथार्थ वर्णन करीत न बसता, देवाच्या राज्यातील सत्य दाखवावयाचे. जे आपल्या जवळ जवळ येत आहे, परंतु अद्याप पुष्कळच दूर आहे असे जे देवाचे राज्य त्याचे वर्णन करावयाचे. ज्या पुस्तकांत हरहमेशा घडणा-या गोष्टींचीच वर्णने आहेत, अशा पुस्तकांच्या पर्वतप्राय राशी पडलेल्या आहेत. परंतु जर ह्या पुस्तकांतून सत् काय व असत् काय हे दाखविण्यात आले नसेल, देवाच्या दाराकडे जाण्याचा जो एकच एक मार्ग तो जर दाखविण्यात आला नसेल, देवाच्या दाराकडे जाण्याचा जो एकच एक मार्ग तोजर दाखविण्यात आला नसेल, तर ती सारी इत्थंभूत वर्णने खोटी आहेत आणि परींच्या गोष्टी, म्हणी, आख्यायिका, दंतकथा, लोककथा, काल्पनिक गोष्टी.. यांच्यामधून कधी न घडणारे चमत्कार जरी कथन केलेले असले तरी त्या कथा सत्य असू शकतील. देवाची इच्छा कशांत आहे हे जर त्यांतून दाखविलेले असेल, तर त्या सा-या असंभाव्य व अद्भुत कथा सत्यच आहेत.