प्रकरण सातवे
(सत्ताधीश वर्गाची जीवनाबद्दलची जी कल्पना त्या कल्पनेस अनुरूप अशी कलामीमांसा)
वरच्या वर्गातील लोकांची मंदिरी धर्मावरील श्रध्दा नाहीशी झाल्यापासून कला चांगली किंवा वाईट हे ठरविण्याचे प्रमाण सौंदर्य हे झाले (सौंदर्य म्हणजे कलाकृतीपासून मिळणारे सुख) या विचारनुरूप सौंदर्यशास्त्र निर्माण झाले व त्या शास्त्रांत या दृष्टीचे समर्थन करण्यात आले. या शास्त्राप्रमाणे सौंदर्यप्रदर्शन हे कलेचे मध्येय ठरले. कलेसंबंधीची ही कल्पना उराशी बाळगणारे तिचे समर्थन करू लागले. हे समर्थन करताना ते असे सांगू लागत की, ''कलेची ही व्याख्या आम्ही नव्यानेच शोधून काढली असे नाही, तर वस्तुरूपच मुळी असे आहे; वास्तविक सत्यच असे आहे. ग्रीक लोकांनीही हे सत्य पाहिले होते.'' परंतु हे म्हणणे बरोबर नाही. या म्हणण्यास आधार व पुरावा नाही. ग्रीक लोकांचे नैतिक मध्येय ख्रिस्ताच्या नैतिक मध्येयापेक्षा कमदर्जाचे होते. शिवाय सुंदराची व शिवंची त्यांनी अगदी स्पष्ट फारकत केलेली नव्हती. सुंदर व शिव हे दोन अगदी अलग अलग भाग त्यांनी मानले नव्हते. सुंदराच्या व साधुत्वाच्या कल्पना परस्पर निरपेक्ष व परस्पर भिन्न आहेत असे स्वच्छ व असंदिग्ध मत त्यांनी मांडले नव्हते. एवढयावरून जे सुंदर आहे तेच ते चांगले मानीत असे म्हणता येणार नाही. साधुतेची परमोच्च कल्पना ग्रीक लोकांना अज्ञात होती (ही कल्पना सुंदरतेशी एकरूप तर नसतेच उलट पुष्कळदा विरुध्दच असते) ज्यू लोकांना इसायाच्या काळात ही कल्पना होती व ख्रिस्ताने तीच अत्यंत स्पष्टपणे मांडली. सॉक्रेटिस, प्लेटो, ऍरिस्टॉटल हे जे ग्रीक लोकांतील थोर तत्त्वज्ञ त्यांच्या लक्षात आले होते की शिवत्व हे कधी कधी सौंदर्यापासून दूर असते. सॉक्रेटिसाने तर अगदी स्पष्टपणे ''साधुत्व हे सौंदर्यापेक्षा श्रेष्ठ आहे.'' असे मानले आहे. ''सुंदराने शिवाची उपासना केली पाहिजे.'' असे त्याने सांगितले आहे. प्लेटोने सुंदर व शिव या दोन्ही भावांचा समन्वय करण्यासाठी देवी सौंदर्य असा शब्द उपयोगांत आणला. ऍरिस्टॉटल स्वच्छच म्हणतो की, ''कलेने लोकांवर नैतिक परिणाम झालाच पाहिजे.'' थोर ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी असे विचार प्रदर्शित केले आहेत तरी सुंदरता व साधुता एकत्रही असतात-जेथे सुंदरता आहे तेथे साधुता आहे व जेथे साधुता आहे तेथे सुंदरता आहे-या विचाराला ते झुगारून देऊ शकले नाहीत.
म्हणून तत्कालीन भाषेत सुंदर-शिव असा एक सामासिक शब्दप्रयोग रूढ होऊ लागला होता. ख्रिस्ती व बुध्दधर्मात साधुत्वाची जी थोर व भव्य कल्पना दाखविलेली आहे, त्या कल्पनेच्या जवळपास हे ग्रीक ऋषी जात होते; परंतु शिव कल्पना दाखविलेली आहे, त्या कल्पनेच्या जवळपास हे ग्रीक ऋषी जात होते; परंतु शिव व सुंदर यांच्यातील संबंध दाखवून देत असता ते घोटाळयात व गोंधळात पडले. सौंदर्य व साधुता यांबद्दलचे प्लेटोचे विचार परस्परविरोधी विधानांनी भरलेले आहेत. ग्रीक लोकांच्या विचारांतील हा जो गोंधळ तोच १८ व्या शतकांतील युरोपियन लोकांच्या शास्त्राचा पाया झाला! ज्या युरोपियनांची कशांवरच श्रध्दा नव्हती त्यांनी या ग्रीक गोंधळास शास्त्राचे महनीय पद दिले, गोंधळालाच नियम मानले! वस्तुस्वरूपांतच मुळात साधुत्व व सुंदरत्व एकत्र असते असे दाखविण्याचा ते प्रयत्न करू लागले. सौंदर्य व शिवत्व यांचे साहचर्य असलेच पाहिजे, कारण ते वस्तुस्वरूपच आहे. ग्रीक लोकांचा सुंदरं-शिवं हा जो सामासिक शब्द-तो मानवजातीचे परमोच्च ध्येय दर्शविणारे असे हे युरोपियन लोक म्हणू लागले. (त्या ग्रीक शब्दाचा ग्रीक लोकांना उपयोग होता, परंतु त्यांच्यापेक्षाही थोर नीतिकल्पना देणा-या ख्रिश्चन धर्मास व ख्रिश्चनधर्मीयांस तो शब्द निरर्थक होता.) या गैरसमजुतीवर नवसौंदर्य शास्त्र रचले गेले, आणि त्याचे समर्थन करण्यासाठी प्राचीनांच्या शिकवणीतून शब्दच्छल करून नाना अर्थ काढू लागले. प्राचीनांच्या जे मनातही नसेल ते त्यांच्यावर लादण्यात येऊ लागले. हे नवसौंदर्यशास्त्र ग्रीकांतही होते असे दाखविण्यासाठी हा उपद्व्याप करणे प्राप्त होते.
खरे पाहिले तर प्राचीनांचे कलेसंबंधीचे विचार या युरोपियन विचारांहून अगदी निराळे होते. ''ऍरिस्टॉटल सौंदर्यशास्त्र'' या पुस्तकात बेनार्ड म्हणतात ''सूक्ष्म रीतीने पाहणा-याला असे दिसून येईल की सौंदर्य व कला या दोन गोष्टी ऍरिस्टॉटल अगदी परस्पर भिन्न अशा मानी. प्लेटो व त्याच्या पाठीमागून येणारे ज्याप्रमाणे मानीत तसेच ऍरिस्टॉटल मानी.'' प्राचीनांचे विचार या नवसौंदर्यमीमांसेस अनुकूल तर नाहीतच, उलट या मीमांसेच्या ते विरुध्दच आहेत, असे आहे तरीही सर्व सौंदर्यशास्त्रवेत्ते शास्लरपासून ते वाईटापर्यंत असे मानतात की सौंदर्यशास्त्राचा पाया सॉक्रेटिस, प्लेटो, ऍरिस्टॉटल यांनी घातला; त्यांच्यानंतर एपिक्यूरियन व स्टोहक यांनी ती परंपरा चालवली, नंतर सेनेका, फ्लूटार्क व प्लॅटिनस यांनी ती उचलून धरली. प्लॅटिनसनंतर या शास्त्राचा वाली व कैवारी कोणी निघाला नाही. दुर्दैवाने म्हणा किंवा यदृच्छेने म्हणा चौथ्या शतकात हे शास्त्र जे अकस्मात् एकाएकी विलुप्त झाले ते पंधराव्या शतकानंतर मात्क्यान् जर्मनीत पुन्हा जिवंत झाले ! आणि १७५० ममध्ये वाममार्गाने हा मिणमिण जळणारा दिवा पुन्हा प्रज्वलित केला.'' अशा प्रकारची विचारसरणी हे नवसौंदर्यशास्त्रवेत्ते मांडीत असतात.