''इतर सर्व काही जाऊ द्या चुलीत; परंतु शब्दमाधुर्य, पदलालित्य व नादमाधुर्य ही आधी हवी. ज्यांत काही अर्थ नाही, ज्यांत काही सार नाही, जे विक्षिप्तपणाचे आहे, जे केवळ हवेतील आहे, ज्यांत ना तम्य ना सत्य, ना रस, ना गांभीर्य-ते आधी पसंत करा. शब्द मात्र योग्य व वेंचक असे निवडा. अर्थाची पर्वा नका करू; अर्थअनर्थ भावव नित्यम्. परंतु शब्दांनाही फार महत्त्व नका देत बसू. त्या शब्दांत लालित्य असले म्हणजे पुरे. इतर गोष्टी तुच्छ माना. ज्या गीतांत प्रकट व अप्रकट, स्पष्ट व गूढ, निश्चित व अनिश्चित, सुबोध व दुर्बोध, व्याकृत व अव्याकृत, संस्कृत व प्राकृत मिसळलेली आहेत, ती गीते गोड गोड असतात. ती प्रिय, प्रियतम असतात. नेहमी संगीत, नादमाधुर्य, पदलालित्य यांच्याकडे लक्ष ठेवा. तुझे काव्य उडणा-या पाखरांप्रमाणे असावे, नाचणा-या लाटेप्रमाणे असावे. जे हृदय जात आहे, सरत आहे, भरत आहे, निसटत आहे, अशा हृदयांतील ते गाणे असू दे. ज्याप्रमाणे हृदय येथून तेथे जाते, त्याप्रमाणे तुझे गीत या प्रेमांतून त्या प्रेमांत, या भागांतून त्या भागांत, या आकाशांतून त्या आकाशांत असे जाऊ दे. तुझ्या गीताने, तुझ्या कवितेने स्वतंत्र पंख फडफडविले पाहिजेत. अर्थाच्या ओझ्याखाली गीत-कोकिळेचा गळा नको दावू. दुसरी प्रेमे, दुसरे प्रांत; मोह पाडणा-या अनेक वस्तु आहेत, तोटा रे कसला? जाऊ दे त्यांच्या पाठोपाठ तुझे काव्य. फुले आणि पांखरे, उषा व निशा, रंग आणि गंध! हे खरे काव्य. बाकी सारे नावाचे वाङ्मय, नावाचे साहित्य!''
ह्या दोन कवींनंतर मॅल्लरमे हा येतो. नवकवीत ह्याचे फार मानाचे व महत्त्वाचे स्थान आहे. तो स्पष्टच सांगतो की, अर्थ प्रकट न करण्यांत खरे काव्य आहे. काव्य म्हणजे कोडे! तो म्हणतो ''काव्यांत नाना ठिकाणचे संदर्भ आणावेत, नाना संकेत आणावेत, नाना सूचना असाव्यात. त्यांचा अर्थ चटकन् त्र्चयानात येणार नाही अशी खबरदारी घ्यावी. वस्तूंचे चिंतन, त्या चिंतनाने मनात उभ्या राहिलेल्या, जाऊ का पाहू करणा-या कल्पना-याने गीत तयार होत असते. पूर्वीच्या कवीत गूढता नाही. त्यांना जे काही सांगावयाचे असते ते सारे ते स्पष्ट सांगूनच टाकतात. रसिक मनाला बुध्दीला ताण देऊन, डोके खाजवून स्वत: अर्थ शोधून काढण्यांत जो आनंद असतो, तो काही और आहे. तो आनंद हे उतान कवी रसिकाला लाभू देत नाहीत. काव्यांतील अर्थ स्पष्ट करणे म्हणजे काव्यांतील ३/४ आनंद नाहीसा करणे होय. हळूहळू तर्काने उमजत जाण्यांत, हळूहळू कोडे उलगडण्यात, हळूहळू अंधारांतून प्रकाश येण्यांत, हळूहळू कळीची एकेक पाकळी खुलण्यांत अपार आनंद आहे. खरा आनंद अस्पष्टतेत, व्यंजनेत आहे. उघड करून दाखविण्यात अर्थ नाही. अप्रकट अर्थ हा अनंत आहे. झाकली मूठ सवालाखाची. वस्तु पदराखाली लपवून आणा, त्र्नहोकवून आणा, हातपाय दिसू दे, पण तोंड नका दाखवू. प्रतीकांत हीच गोष्ट असते. प्रतीकाच्याद्वारा हळूहळू वस्तुस्वरूप प्रकट होत असते. प्रतीकाच्या साधनाने मनुष्याच्या हृदयांतील विशिष्ट स्थितीचे हळूहळू एकेक पापुद्रा दूर होत होत दर्शन होत असते. एखाद्या पदार्थाला निवडून त्या पदार्थ्याच्याद्वारा मनाचे स्वरूप प्रकट करणे-यांत प्रतीक असते. बाह्यवर्णनाने आंतरिक ओळख करून देणे, किंवा आंतरिक वर्णनावरून बाह्य स्थितीची कल्पना आणून देणे-या दोन्ही क्रिया प्रतीकांत असतात. सामान्य माणसाला आपले पुस्तक समजताच कामा नये; ते त्याला नाहीच समजणार असा आत्मविश्वास लेखकाला हवा. ज्याची बुध्दी सामान्य आहे, ज्याचे साहित्यविषयक अध्ययन, वाचन, मनन फारसे नाही, अशा एखाद्या मनुष्याने जर तुमचे पुस्तक उघडून ''मला खूप आनंद होत आहे'' असे म्हटले तर लगेच त्याला म्हणा ''खोटे आहे तुझे म्हणणे. माझे पुस्तक का बावळटा तुला समजणार? तुला समजण्याइतके नालायक व रद्दी पुस्तक लिहिणारा का मी आहे?'' काव्यांत नेहमी गूढता हवी. नानावस्तूंच्या मूर्ति हृदयांत जागृत करणे हा साहित्याचा हेतू आहे, अन्य कोणताही नाही.
दुर्बोधतेला अशा प्रकारे या लोकांनी काव्यत्वच करून टाकले आहे. फ्रेंच टीकाकार डॉमिक् (ज्याने हे दुर्बोधत्वाचे तत्त्व पूर्णपणे अजून स्वीकारले नाही.) म्हणतो-ह्या दुर्बोधतापध्दतीचा त्याग करणे आता आवश्यक झाले आहे. या रीतीला रामराम ठोकण्याची वेळ आली आहे. नवीन संप्रदायाने तर दुर्बोध रचनेला परमोच्चपदावरच नेऊन बसविले आहे, आता हे सारे पुरे झाले असे म्हणण्याची पाळी आली आहे.'' डॉमिक्चे हे दुसरे यथार्थ व योग्य नाहीत असे कोण म्हणेल?