एकदा मी हॅम्लेट नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी गेलो होतो. रॉसी हा नामांकित नट त्यांत काम करणार होता. शोकांत नाटकांतील अत्यंत उत्कृष्ट नाटक म्हणून हॅम्लेटची ख्याती. नाटयविषयक कलेचा हॅम्लेटमध्ये जणू कळस झाला आहे असे समजण्यात येत असते. असे नाटक व रॉसीसारखा पात्राशी एकरूप होऊन काम करणारा उत्कृष्ट नट-मग काय विचारावे! परंतु नाटकांतील विषय व नटाचा अभिनय-मला कशानेही आनंद झाला नाही. ख-या कलाकृतीचे अनुकरण किंवा नक्कल पाहून ज्या खिन्न व उद्विग्न भावना मनात येतात, तशा प्रकारच्या भावना मी अनुभवीत होतो. अस्सल व अभिजात कृतीपासून मिळणा-या भावना निराळया असतात असे मला वाटले. हॅम्लेट मला नक्कल वाटली.
परंतु थोडयाच दिवसांपूर्वी व्होगल्स या रानटी समजलेल्या लोकांच्या एका खेळासंबंधी, नाटयकृतीसंबंधी मी वाचले. तो खेळ पाहून आलेल्या एका माणसाने ते वर्णन लिहिले होते. वर्णन पुढीलप्रमाणे होते: एक मोठा मनुष्य हरणी होतो व एक मुलगा तिचे पाडस होतो. हरणाच्या कातडयांचा त्यांनी पोषाख केलेला असतो. तिसरा एक मनुष्य पारधी बनतो. त्याच्या हातात तीरकमठा असतो. चौथा एक मनुष्य पक्षी बनतो. तो त्या हरणीला व पाडसाला पारधी जवळ येताच धोक्याची सूचना देतो, शीळ घालतो. पाखराच्या आवाजासारखा आवाज तो काढतो. खेळाला सुरुवात होते. त्या हरणीच्या व पाडसाच्या मागे तो पारधी लागतो. ती हरणी व ते पाडस पळत पडद्याआड जातात. पुन्हा बाहेर येतात. त्यांची धावपळ सुरू असते. त्यांच्या पाठोपाठ तो शिकारी पण येत असतो. (असे खेळ लहानशा तंबूसारख्या झोपडयांतून करण्यात येतात.) तो पारधी दरवेळेला त्या हरणीच्या अधिक जवळ जवळ येत असतो. ते पाडस थकते, दमते, धापा टाकते. ते थबकते, थांबते, आईच्या अंगाला विलगते. ती हरणी थांबते, दम टाकते, पाडसाला चाटते इतक्यांत तो पारधी अगदी नजीक येतो; तो धनुष्याला बाण लावतो. डोक्यावर तो पक्षी ओरडतो-संकटाची सूचना देतो. पुन्हा ती मायलेकरे चौखूर उधळतात. पुन्हा धावपळ, आंतबाहेर सुरू होते. पुन्हा तो पारधी त्यांना गाठतो. तो पहा त्याने बाण लावला. आकर्ण ओढला. पक्षी वर ओरडतो-टणत्कार झाला-वाण सणसणत आला. अरेरे, त्या कोवळया पाडसाला लागला रे बाण. त्याला पळता येत नाही. अंगांत बाण घुसलेले असे ते पाडस आईला बिलगते. गरीब लहानसे लोण्यासारखे मऊ, त्यात वज्राप्रमाणे बाण घुसला! माता संकट विसरते, स्वत:च्या प्राणावरचे संकट विसरते. ती थांबते, पाडसाला चाटते. तो पहा दुसरा बाण धनुष्याला लावला गेला. तो खेळ पाहून आलेला मनुष्य लिहितो, त्यावेळेस सारे प्रेक्षक अगदी तटस्थ असतात, जणू ते गोठून जातात, पुतळे होतात. भावनांनी जणू ते भारून जातात. इतक्यांत सुस्कारे ऐकू येतात, 'अरेरे, चुक्चुक् चक्' असे ऐकू येते. हुंदके ऐकू येतात. कोणी मूर्च्छित पडतात. या केवळ वर्णनावरूनच तो खेळ, ते त्या रानटी लोकांचे नाटक म्हणजे खरी कलाकृती होती-असे मला वाटल्यावाचून राहिले नाही.
मी जे काही सांगून राहिलो आहे, ते अविवेकाचे, अतिशयोक्तीचे, मूर्खपणाचे असे कोणाला वाटण्याचा संभव आहे. पुष्कळांना माझे हे सांगणे वाचून आश्चर्य वाटेल. परंतु मला जे वाटते ते मी सांगितलेच पाहिजे. आपल्या वरच्या वर्गातील कलेत काही कलावान् कादंब-या, गोष्टी, नाटके, संगीते, चित्रे, शिल्पे निर्माण करीत असतात. प्रेक्षक पाहतात, श्रोते श्रवण करतात. ''वाहवा वाहवा पुतळा हा, वहावा वाहवा कविता ही'' असे म्हणतात व डोलतात. नाना टीकाकार या कलेचे मूल्यमापन करीत असतात. गुणदोषचर्चा करण्यात येते. नंतर शेलापागोटे किंवा अर्धचंद्र देण्यात येत असतो. काही कलांची नावाजणी होते. काहींची हुटहुट करण्यात येत असते. काही कलावानांची स्मारके उभारली जातात, त्यांचे पुतळे करण्यात येतात. कलावान, कलाप्रेक्षक व कलाश्रोते, कलाटीकाकार-या सर्वांचा परस्परपूरक हा जो घोळका-या घोळक्यांतील क्वचितच एखाद्याला ख-या भावनेचा अनुभव आला असेल. (कलेवरची चर्चा व टीका ऐकण्यापूर्वी वाळपणी व अगदी तरुणपणी कदाचित त्या भावनेचा अनुभव त्यांना आला असेल.) अत्यंत सामान्य मनुष्यालाही, एखाद्या लहान मुलासही जो अनुभव येतो. जी भावना असते. दुस-याच्या भावनांशी एकरूप होण्याची जी भावना, ज्या भावनेमुळे दुस-याच्या सुखाने आपण सुखावतो, दुस-याच्या दु:खाने दु:खी होतो. ज्या भावनेमुळे व ज्या शक्तीमुळे दुस-याच्या अंतरात्म्याशी आपण आपला अंतरात्मा एकरूप करू शकतो, जी भावना अनुभविणे म्हणजेच कलेचे सारे हृद्गत-कलेचे सारसर्वस्व, कलेचा प्राण-ती भावना वरच्या त्या घोळक्यांत, क्वचितच भाग्याने एखाद्याला लाभत असेल आणि म्हणूनच दांभिक, कृत्रिम व नकली कलेपासून अभिजात व जिवंत कला निवडून काढणे त्यांना अशक्य असते; आणि जी अत्यंत हीन अति दांभिक व कृत्रिम अशी कला. तिलाच खरी कला समजून ते मिठी मारतात! प्रेतालाच ते कवटाळीत असतात व ख-या प्राणवान कलेकडे ते ढुंकूनही बघत नाहीत. कारण ही दांभिक कला दंभ फुटू नये, आपले सोंग उघडकीस येऊ नये म्हणून अधिकच अलंकृत होऊन, नटून-सजून पुढेपुढे करीत असते, व ती सत्कला मागे मागेच राहते-कारण ती विनयी असते.