जोसेफच्या कादंबरीतही थोडया अनावश्यक गोष्टी आहेत. जोसेफच्या रक्ताने माखलेल्या कोटाचे वर्णन, जॅकबचा पोषाख व त्याचे घर यांचे वर्णन, पाँटिकरच्या पत्नीची एकंदर ऐट, तिची चालचलणूक, तिचे हावभाव, तिचा पोषाख, तिची सारी ढब, ''ये, माझ्याकडे ये''-असे म्हणताना ती डाव्या हातांतील काकणे नीट सारीत होती वगैरे गोष्टींची जरूर नव्हती. या गोष्टींतील भावनांचा भाव इतका बलवान आहे की इतर पाल्हाळांची येथे जरूर नव्हती; अत्यंत आवश्यक अशा गोष्टी फक्त द्यावयाच्या. ''जोसेफ दुस-या खोलीत गेला व तेथे मनमुराद रडला'' असे साधेसुधे उल्लेख फक्त पाहिजेत. बाकी पाल्हाळांचा, भावनेच्या प्रवाहाला अडथळा मात्र होतो. एकंदरीत ही कादंबरी फार सुंदर आहे. सर्वांना ती रडवील, गंभीर करील, समभावना सर्वांच्या हृदयांत निर्मिल; म्हणूनच ती अजून टिकली आहे; अशीच हजारो वर्षे ती टिकेल, परंतु आजच्या उत्कृष्ट अशा ज्या  कादंब-या आहेत त्यांतील पाल्हाळ वगळला तर बाकी काय राहील? पाल्हाळ हेच याचे मुख्य स्वरूप, कथ्य असे फारच थोडे असावयाचे.

जे वाङ्मयात दारिद्रय तेच संगीतातही. संगीतातही भावनादारिद्रय आहेच. अर्वाचीन संगीत रचणा-यांच्या रागरागिण्या या शून्य व क्षुद्र असतात. त्यांच्या चिजांत काही जीवच नसतो. विशाल व व्यापक भावनाच नव्हे तर कसलीच भावना त्यांत नसते. या रिक्त संगीताचा काहीतरी परिणाम व्हावा म्हणून वाजवणारे व गाणारे नानाप्रकारची आदळआपट करीत असतात. ते ताना घेतील, सारखे आलाप घेतील, एकदम वर जातील, एकदम खाली येतील-सारी सोंगे करतील. परंतु ऐकणा-यांच्या हृदयांत स्वच्छ अशी भावना उत्पन्न होईल तर शपथ. खरे पाहिले तर संगीत हे मोकळे आहे. ते सर्वांच्या हृदयांत घुसते, सर्वांना समजते. संगीताचे मंदिर सर्वांसाठी आहे. परंतु हे संगीत काही विशिष्ट वर्गाचेच झाले आहे. ते कृत्रिम करण्यात आले आहे. त्याला खूप बांधून टाकण्यात आले आहे. निरनिराळया राष्ट्रांनी आपापल्या संगीतपध्दती निर्माण केल्या आहेत. एका राष्ट्रांतील संगीत दुस-या राष्ट्रांना समजणार नाही; परंतु दुसरी राष्ट्रे आहेत, त्याच राष्ट्रांतील बहुजनसमाजासही ते समजण्याची मारामार झाली आहे. ते दुर्बोध व असामान्य आपण करून टाकले आहे. जितके क्लिष्ट व कृत्रिम करावयाचे तितके केले आहे. काव्यांत ज्याप्रमाणे नाना रूढी आहेत, त्याप्रमाणे संगीतही क्षुद्र व दुष्ट रूढींनी घेरले गेले आहे, ते कोंडवाडयांत पडले आहे. हे भावनाहीन संगीत काही लोकांनाच स्पर्श करू शकते व त्यांनाही स्वच्छ व स्पष्ट काही भावबोध ते करून देईल तर शपथ.

संगीतात नृत्य, मिरवणुकी वगैरे जर काही असेल तर ते मात्र सर्वांना समजेल असे असते. परंतु या गोष्टी वगळल्या तर फारच थोडे संगीत सर्व जनतेचे आहे असे म्हणता येईल. बॅक, हेडन, मोझार्ट, शुबर्ट, बीथोव्हेन, चॉपिन यांच्या संगीतरचनेतून दहा-बारा मधले भाग मोठया कष्टाने काढता येतील, जे सर्वजनतेचे असे म्हणता येतील.

काव्य व संगीत यांच्यात भावनाशून्यत्व व विषयदारिद्रय भरून काढण्यासाठी जसा पाल्हाळ रचण्यात येतो, आणि या पाल्हाळानेच त्या कृतींचे सार्वजनिकत्व, विश्वजनव्यापकत्व जसे कमी होते, तसे चित्रकलेतही जरी असले तरी ते कमी असते असे म्हटले पाहिजे. कलेच्या इतर प्रांतांपेक्षा चित्रकलेतच सर्व सांसारिकांना व्यापणा-या ख्रिश्चन कलेचे नमुने अधिक पहावयास मिळतात. या कलेतच अशा कृती आहेत की ज्या सर्वांना अनुभवता येतील अशा भावना प्रगट करीत आहोत.

चित्रे, पुतळे, प्राण्यांच्या प्रतिकृती, सुंदर देखावे, व्यंगचित्रे (ज्यांतील विषय सर्वांना समजतील असे असावेत), सुंदर अलंकार, नक्षीकामे, खेळणी, बाहुल्या इत्यादी चित्रकला व शिल्पकला यांतील प्रकार हे बहुजनसमाजाच्या परिचयाचे असतात. या प्रकारांना कोणी कला मानीत नाही व कोणी मानलीच तर ती हीन कला, क्षुद्र कला असे मानतो. वास्तविकरीत्या या सर्व वस्तू-जर त्याही ख-या भावना देत असतील तर चांगल्या कलेचे नमुने म्हणून समजण्यास प्रत्यवाय नसावा. (जरी त्या वस्तू क्षुद्र व सामान्य असल्या तरीही; वस्तू सामान्य असेल, परंतु तिने दिलेली भावना पुष्कळ वेळा हृदयाला वेड लावते.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel