खिस्ताच्या ख-या शिकवणीपासून हा धर्म कितीही दूर गेलेला असला, ख्रिस्ताने दिलेल्या धर्माशी तुलना करून पाहता हा धर्म कितीही अधःपतित व भ्रष्ट झालेला  जरी दिसत असला, ख्रिस्ताच्या धर्माशीच नव्हे तर रोमन लोकांतीलही जुलिया वगैरेंच्या जीवनाशी तुलना करून पाहता हा धर्म जरी हिणकस ठरत असला, तरीही ज्या रानटी लोकांनी ह्या धर्माचा अंगिकार केला, त्यांना तो श्रेष्ठच होता. देव, वीर, भुते, प्रेते, पिशाच्चे इत्यादीकांची पूजा करणारा जो त्यांचा पहिला धर्म होता त्यापेक्षा हा भ्रष्टाही ख्रिस्तीधर्म त्यांना थोर वाटला, म्हणून ह्या मंदिरी ख्रिस्तीधर्माची शिकवणूक त्यांनी धर्म म्हणून स्वीकारली. या धर्माच्या पायावर तत्कालीन कला उभारली गेली. व्हर्जिन मेरी, ख्रिस्त, संत, देवदूत यांची पवित्र पूजा करणें, चर्चवर व चर्चने काढलेल्या शासनपत्रांवर, आज्ञापत्रांवर अंधश्रध्दा ठेवणे, नरकयातनांची भीति, पुण्यवंतांना मिळणा-या धन्य व कृतार्थ जीवनाची आशा-इत्यादी गोष्टीबद्दलच्या भावना जी कला देई ती सत्कला म्हणून मानिली गेली. याविरुध्द भावना देणारी ती असत् कला म्हणून संबोधिली गेली.

ज्या धार्मिक शिकवणीवर ही कला उभारली गेली, ती धार्मिक शिकवण जरी ख्रिस्ताच्या शिकवणीहून विपरित होती, तरी या विकृत शिकवणीवर उभारिली गेलेली कला ही खरी कलाच होती यांत शंका नाही. कारण ज्या लोकांत ही कला उत्पन्न झाली, त्या लोकांच्या ज्या धार्मिक भावना होत्या, त्या धार्मिक भावनांचे पोषण या कलेमुळे होत होते. त्या धार्मिक भावनांना अनुकूल व अनुरूप अशी ही कला होती.

मध्ययुगातील कलावान हे खरे हाडाचे कलावान होते. धार्मिक भावनांमुळेच त्यांच्या जीवनात चैतन्य व स्फूर्ति उसळली होती. शिल्प, खोदकाम, चित्रकला, संगीत, काव्य, नाटक इत्यादी प्रकारातून, ज्या भावना त्यांनी स्वतः अनुभविल्या, ज्या मानसिक स्थितीतून ते गेले, त्या भावना, ते अनुभव, ते सारे आंतरिक जीवन, त्यांनी भरपूर दिले आहे. त्या काळातील बहुजनसमाजाला जो परमोच्चधर्म म्हणून मिळाला होता, जी श्रेष्ठ तत्त्वे म्हणून मिळाली होती, त्यांच्यावर त्या कलावानांचा कलात्मक व्यापार उभारलेला होता. आज आपण कदाचित ती कला हीन मानू, परंतु ती कृत्रिम नव्हती, ती सत्यस्वरूपी होती. तिच्यात दंभ नव्हता. कारण सर्व समाज त्या कलेला मानीत होता, त्या कलेकडे आदराने पाहात होता.

मंदिरी ख्रिस्तीधर्माच्या सत्यतेबद्दल वरच्या श्रीमंत, सुशिक्षित अशा युरोपियन वर्गात संशय व अंधश्रध्दा उत्पन्न होऊ लागेपर्यंत ही स्थिती अशीच चालली. पुढे पोपच्या सत्तेचा कळस झाला. तिचे दुरुपयोग मर्यादेच्या बाहेर गेले. धर्मयुध्दे झाली. अशा काळी व अशा वेळी ग्रीक व रोमन लोकांच्या ग्रंथाशी वरच्या वर्गातील लोकांचा संबंध आला. प्राचीन ऋषीचे सरळ, बुध्दीस पटणारे असे विचार त्यांना दिसले, आणि बुध्दीला न पटणारी मंदिरी ख्रिश्चनधर्माची शिकवणही समोर दिसली. या मंदिरी ख्रिश्चनधर्मावर त्यांची श्रध्दा बसेना. ते अशक्य होऊ लागले.

बाह्यतः जरी ते मंदिरी शिकवणीप्रमाणे वागताना दिसत होते, तरी अंतरी श्रध्दा नव्हती. परंतु बंड उभारण्याचे काही धैर्य त्यांना नव्हते. बहुजनसमाजावर आपले प्रभुत्व व वर्चस्व राहावे म्हणून आणि मनात शैथिल्य, निरुत्साह व आलस्य होते म्हणून जे मनात होते ते जनात आणण्याचे धैर्य त्यांना दाखविता आले नाही. बहुजनसमाज मंदिरी ख्रिश्चनधर्मच आंधळेपणाने अजूनही मानीत होता. 'त्या जुन्या मंदिरी धर्मावरच विश्वास ठेवा' असे स्वतःच्या स्वार्थासाठी, त्या धर्माबद्दल मनात श्रध्दा व आदर नसतांही, बहुजनसमाजाला वरचे वर्ग बाह्यतः सांगत व तसे करण्यात उत्तेजन देत.

परंतु असा एक काळ लौकरच आला की ज्यावेळेस मंदिरी ख्रिस्तीधर्म सर्व ख्रिस्ती राष्ट्रांचा सामान्यधर्म म्हणून राहिली नाही. बहुजनसमाजातील काही भाग अजून आंधळेपणाने तो धर्म मानीत होता; परंतु वरचे वर्ग उघड उघड हा धर्म मानीतनासे झाले. आणि या वरच्या वर्गातील लोकांच्या हातात सत्ता होती, संपत्ति होती. कला निर्माण करावयास लावण्याला व तिला उत्तेजन देण्याला त्यांच्याजवळ साधने होती व फुरसतही होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel