जी टीका पक्षामिनिवेशाचा स्वत:ला स्पर्श होऊ देत नाही, जी समदर्शी असते, जी टीका कलेला समजू शकते व कलेवर प्रेम करते, जी टीका नि:स्वार्थी व निर्वेतूक असते, जिला वैचारिक रागलोभ माहीत नाहीत, सत्याचे दर्शन समाजाला घडविण्यासाठी जी उभी असते, अशी टीका समाजात असणे हे समजाचे सद्भाग्य आहे. अशी टीका समाजात आहे की नाही, अशा टिकेला समाजात वाव आहे की नाही, तिला स्थान व मान आहे की नाही, तिचा अधिकार मानलि जातो की नाही यावर सुशिक्षित समाजाची भवितव्यता अवलंबून आहे. भाडोत्री जाहिरातीपेक्षा, बाजारी प्रतिष्ठेपेक्षा अशा टिकेच्या निर्णयाला समाजात मान्यता मिळाली पाहिजे, तरच युरोपियन संस्कृति पुढे टिकेल... नाहीतर तिची धडगत काही मला दिसत नाही.
अशी टिका जर नसेल तर ज्ञानाचेकिरण खेडयापाडयापर्यंत कसे पोचणार? अशी टीका जर नसेल तर सत्साहित्याचा झरा खेडयांतील जनतेच्या हृदयापर्यंत कसा जाणार? भाडोत्री बाजारांत, जाहिरातींच्या कोलाहलांत सत्साहित्य गुदमरणार काय? सत्साहित्याची सरस्वती गुप्त होणार, आटून जाणार का? प्रकाश सर्वत्र पसरतो की नाही हे या टिकेच्या अस्तित्वावर अवलंबून आहे.
व्हॉन पॉलेसची ही रमणीय कलाकृति, ही थोर कादंबरी लोकांस माहीत नसावी, साहित्यसेवकांसही माहीत नसावी, आणि अशीच इतर पुस्तके सुंदर व मंगल पुस्तके या छापलेल्या ढिगा-यांत लक्ष्यांत न यावीत, आणि अर्थहीन, बाष्कळ, क्षुद्र व केवळ घाणेरडया अशा भ्याडकृतींची सर्वत्र चर्चा केली जावी, त्यांचा नानादृष्टीनी उहापोह केला जावा हे सारे पाहून वरील प्रकारचे विचार माझ्या मनात उत्पन्न झाले. हे विचार संक्षेपाने व थोडक्यांत प्रकट करण्याची संधी मला मिळाली व तिचा मी उपयोग केला आहे. अशी संधी मला आता क्वचितच पुन्हा मिळेल!
२
(चेकॉव्हच्या डार्लिंग या गोष्टीला टॉलस्टॉयने जोडलेले दोन शब्द)
बायबलमध्ये एक गोष्ट आहे. तिच्यांत फार खोल अर्थ भरून राहिला आहे. मोबाईट लोकांचा राजा बलाक इस्त्राएल लोकांना शाप देण्यासाठी बलामला पाठवतो. ''बलाम, तुम्ही जा व त्यांना शाप द्या; त्याच्याबद्दल मी तुम्हाला वाटेल ते देईन. हे घ्या माझे वचन'' असे बलाक आग्रहपूर्वक सांगतो. बलामला पैशाचा मोह पडतो. बलाम घरी बराच विचार करतो व शेवटी आपला निश्चय सांगण्यासाठी बलाककडे जावयास निघतो. बलामला परावृत्त करण्यासाठी स्वत: एक देवदूत येतो. हा देवदूत बलामला दिसत नाही; ज्या गाढवावर तो बसून जात असतो ते गाढव देवदूताला आधी पाहाते. बलामलाही तो मग दिसतो. परंतु बलाम ऐकत नाही. स्वार्थाने तो आंधळा झालेला असतो. बलाम बलाककडे जातो व आपली कबुली त्याला सांगतो. दोघेजण पर्वतावर जातात. तेथे एक यज्ञभूमि तयार करण्यात आलेली असते. तेथे एक स्थंडिल असते. बकरी व वासरे यांचे हवन तेथे व्हावयाचे असते. हवन झाल्यावर शाप उच्चारावयाचा, शाप केव्हा उच्चारिला जातो याची बलाक वाट पहात असतो. शेवटी शापवाणी उच्चारण्यासाठी बलाम उभा राहातो, हातांत पाणी घेतो. परंतु काय असेल ते असा बलामच्या तोंडातून शापवचन बाहेर न पडता आशीर्वादच बाहेर पडतो!
बलाम म्हणाला, ''मी काय करू? देवाने आपल्या वेळेस हेच शब्द माझ्याकडून वदविले. माझा काय उपाय?''
बलाक म्हणाला, ''दुस-या ठिकाणी चल माझ्याबरोबर व माझ्यासाठी त्या इस्त्राएल लोकांना पुन्हा शाप दे, चल...''