ही गोष्ट लिहितांना ग्रंथकाराच्या बुध्दीच्या डोळयांसमोर हृदयांत नव्हे... नवनारीची अंधूक कल्पना असावी असे मला वाटते. पुरुषाबरोबर समान हक्क सांगणारी, त्याच्याबरोबर काम करणारी, पुरुषाइतकीच नव्हे तर त्याच्याहून अधिक कार्यक्षमता समाजकार्यात दाखविणारी, गुरांचे रोग संशोधीत आहे, नाटकगृह चालवीत आहे, वखारीत लक्ष घालीत आहे, तिला सर्व कांही येते, ती पुरुषाहून काकणभर देखील कमी नाही, अशा स्त्रिची कल्पना चेकॉव्हच्या डोळयासमोर असावी. स्त्रीजातीचा प्रश्न जिने जिव्हाळयाने हातात घेतला आहे, त्यासाठी जी धडपडत आहे, त्याच्यावर जोर देत आहे अशी स्त्री चेकॉव्हच्या मनात असावी. बहुजन समाजाचा सुशिक्षित बहुजनसमाजच बलाक गरीब गाईंना शाप देण्यास चेकॉव्हला सांगत असतो. चेकॉव्ह पर्वतावर चढतो. तेथे हातात पाणी घेऊन चेकॉव्ह शापवाणी उच्चारू पाहताच त्याच्या तोंडातून आशीर्वादच बाहेर पडतो. शापाऐवजी तो धन्यवादच देतो. प्रेमाने पुरुषाचे सर्व अपराध पोटात घालणारी ती क्षमामूर्ति स्त्रीजात दिसावयाला दुबळी, बावळट... तिला चेकॉव्ह शेवटी धन्यवाद देतो. ती बंडखोर दाखविण्याऐवजी प्रेममूर्तीच तो दाखवितो. स्त्रीचा खरा मोठेपणा प्रकट होतो. या पुस्तकांत स्त्रीच्या बंडखोरीचा मनावर ठसा न उमटता ती किती प्रेमळ आहे हाच विचार उत्कटत्वाने वाचकाच्या हृदयांत उभा राहतो. या गोष्टीत सर्वत्र जरी एक प्रकारचा गोड विनोद असला तरी या गोष्टीतील कांही प्रसंगी डोळे भरून आल्याशिवाय राहात नाहीत. कुकिनवर डार्लिंगचे किती प्रेम! ज्या ज्या गोष्टी कुकिनला आवडत, महत्त्वाच्या वाटत, त्या गोष्टींवर ती किती प्रेम करते! तिची ती भक्ति, तिची ती अहंविस्मृति, स्वत:ची आवड-निवड दूर ठेवून कुकिनच्या आवडीनावडीच स्वत:च्या करणे, ती निष्ठा, तो त्याग हे सारे पाहून हृदय गहिंवरून येते, सद्गदित होते. तो लाकडाचा कारखानदार, तो गुरांचा डॉक्टर... सर्वांजवळ तिचे वर्तन किती गोड, किती मधूर! ते सारे वाचून मन ओथंबून येते. ज्यांत मिळेल तसा पाण्याचा रंग, तसे डार्लिंगचे आहे. परंतु ती शेवटी एकटी राहते. प्रेम करायला कोणीच राहत नाही. तेव्हाच्या तिच्या स्थितीचे वर्णन, ते वाचून चित्त द्रवते, मन विरघळते. शेवटी स्वत:च्या हृदयांतील स्त्रोसहजभावना, त्या मातृसहज भावना, त्यांची सारी शक्ति एकत्र करून ती त्या बावळट मुलावर, त्या उद्यांच्या पिडीवर प्रेम करू लागते. त्या मुलाला ती आपले मातृप्रेम देते (जे प्रेम स्वत:च्या मुलांना देण्याची तिची संधि मिळाली नाही.) हा शेवटचा वृत्तांत तन्मय करून टाकतो, हृदय उचंबळवितो.
वेडा कुकिन, तुच्छ लाकूडवाला, अप्रिय पशूंचा डॉक्टर यांच्यावर प्रेम करायला कर्त्याने डार्लिंगला लाविले आहे. प्रेमाचा विषय कुकिन असो की तत्वज्ञशिरोमणी स्पिनोझा असो; प्रेमाचा विषय पास्कल असो का नाटककरा शिलर असो; प्रेम हे पवित्रच आहे. प्रेमाचा विजय डार्लिंगच्या बाबतीत भराभर बदलत आहे. असे जरी असले तरी प्रेम पवित्रच आहे. आजन्म एकाच वस्तूंवर प्रेम टिकले, किंवा ते निरनिराळया वस्तूंवर असले तरी ते पवित्रच आहे. जेथे जेथे ते असेल तेथे तेथे निष्ठावंत व सत्व विसरून जाणारे असले म्हणजे झाले.
नुकताच स्त्रियांच्यासंबंधीचा एक उतारा एके ठिकाणी मी वाचला होता. त्या उता-यांत एक फार महत्त्वाचा व गंभीर विचार मांडलेला होता. तो लेखक म्हणतो, ''पुरुषांना जे जे करता येणे शक्य आहे, ते ते आम्ही बायकाही करू शकतो असे सिध्द करण्याचा स्त्रिया प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांच्या या सामर्थ्याबद्दल मला संशयच नाही. पुरुषांना जे जे करता येते ते ते स्त्रियांनाही करता येईल, हे मला मान्य आहे. फक्त प्रश्न आहे, तो एवढाच की स्त्रियांना जे जे करता येते ते ते पुरुषांना करता येईल की नाही. तितके नाही तरी त्याच्या जवळजवळ, त्याच्या निम्मेशिम्मे तरी करता येईल की नाही याची मात्र जबर शंका मला आहे.''