दुस-या कवींच्या काव्यांतून उतारे व उदाहरणे देण्यापूर्वी मला जरा थांबणे भाग आहे. बॉडलिअर व व्हर्लेन या दोन कविता रचणा-यांना इतकी प्रसिध्दी, ख्याति व मानमान्यता का मिळाली? मोठे कवी म्हणून हे का मानले गेले? या गोष्टींबद्दल थोडा विचार केला पाहिजे. ज्या फ्रेंच लोकांत चेनिअर, मसेट, लॅमर्टाईन आणि तो सर्वांचा मुकुटमणि व्हिक्टर ह्यूगो हे झाले, त्यांनी ह्या दोन पक्षकारांस इतके महत्त्व का द्यावे? ज्यांच्या काव्याचे बाह्यरूपही सुंदर नाही व अंतरंगही सामान्य व हीन, अशा ह्या लोकांना एवढे महत्त्व कसे प्राप्त झाले हे समजत नाही. मला तरी हे सारे कोडे वाटते. बॉडलिअरचे जीवनासंबंधीचे विचार, ते का थोर व उदात्त होते? जीवनासंबंधीचे त्याचे तत्त्वज्ञान अर्थहीन आहे. क्षुद्र उघडाबोडका जो अहंकार त्याची त्याने प्राणप्रतिष्ठा केली. नीतीच्याऐवजी कृत्रिम सौंदर्याची अनिश्चित व संदिग्ध अशी कल्पना त्याने मांडली. स्त्रीच्या मुखावरील सहजसौंदर्य, नैसर्गिक तजेला, ही त्याला रुचत नसत. रंग फासले व भुकटया लावलेले तोंड त्याला आवडे, नैसर्गिक वृक्ष त्याला आवडत नसत. तर धातूंची बनविलेली कृत्रिम झाडे त्याला आवडत. बाहेरचा पाऊस आवडत नसे, परंतु रंगभूमीवरील पावसाचा देखावा त्याला पसंत असे. कृत्रिमाचा तो उपासक होता.
आणि व्हर्लेन, त्याने तरी जीवनाला काय अर्थ दिला होता? दुबळी रंगेलवृत्ती, बेछूट विकार, नीतीच्या नावाने शून्याकार व या सर्व गोष्टींना लपविण्यासाठी रोमन कॅथॉलिक धर्मातील बाह्यविधींना त्याने दिलेले महत्त्व, यांत त्याचे सारे तत्त्वज्ञान आले. या दोन्ही कवींत सहजता नाही, कळकळ नाही, सहृदयता नाही, प्रामाणिकपणा नाही, साधेपणा नाही, सरळपणा नाही, दोघांमध्ये भरपूर दंभ व कृत्रिमता ही होती. मारून-मुटकून आणलेली प्रतिभा व फाजील अहंकार याची त्यांना जोड होती. या दोघांच्या ज्या कमीत कमी वाईट अशा कृती आहेत, त्यांतूनही हेच सारे दोष दिसून येतील. त्यांच्या काव्यांत त्यांचे स्वत:चेच स्तोत्र व स्तोम आहे. ते काहीही वर्णन करीत असू देत-ते जणू स्वत:चेच वर्णन करीत आहेत असे वाटते. ते स्वत:ला कधी विसरत नाहीत. असे कृत्रिम काव्ये तयार करणारे काव्यकारखानदार जरी हे होते, तरी त्यांनी आपला एक पंथ बनविला, एक नवीन संप्रदाय स्थापिला. शेकडो लोक त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागले. हे दोघे गुरुदेव झाले, आदर्शकवी झाले! हे कसे झाले, का झाले?
याचा उलगडा एकाच गोष्टीने होईल. ज्या समाजात हे काव्ये रचीत होते, त्या समाजातील कला फारच हीन होती. कला म्हणजे एक थोर व गंभीर वस्तू आहे, जीवनाशी तिचा जिव्हाळयाचा संबंध आहे असे कोणी मानीत असे. कला म्हणजे करमणूक, कला म्हणजे गारूडयाचा खेळ. या करमणुकीत जर नवीनपणा नसेल तर कंटाळा येईल. कंटाळवाणी होऊ पाहणारी करमणूक पुन्हा मजेदार वाटावी म्हणून तिच्यात काहीतरी नावीन्य निर्माण करण्याची जरूरी असते. पत्ते खेळताना झब्बूचा कंटाळा आला की सातपानी खेळतात; सातपानींचा कंटाळा आला तर मार्क डाव; त्याचा कंटाळा आला तर बिझिक-हे जसे चालते तसेच येथेही झाले. वस्तूचे आंतररूप तेच, फक्त बाह्य आकारांत जरा फेरफार करावयाचा. वरच्या वर्गातील लोकांच्या कलेचा विषय दिवसेंदिवस फारच मर्यादित व संकुचित होऊ लागला होता. त्यामुळे या वर्गातील कलावानांना सांगायचे तरी काय याची चिंता पडू लागली. सांगावयाचे ते सारे सांगून झाले आहे. नवीन शोधून काढणे तर अशक्य. वरच्या वर्गातील लोकांच्या जीवनात दोन-चार गोष्टींखेरीज असणार ते काय? येऊन जाऊन सुखविलास व जीवनाचे नैराश्य-भरीला घमेंड व गर्व. आता याच गोष्टी कितीदा वर्णावयाच्या? मग करायचे तरी काय? शेवटी या कंटाळवाण्या कलेला नवीन नवीन बाह्य पोषाख देऊन ते तिला सजवू लागले-जणू बाह्य फरकाने आतील आत्मा बदलणारच होता!
बॉडलिअर व व्हर्लेन यांनी एक नवीन टूम काढली. त्यांनी एक नवीन आकार, नवीन पोषाख कलेला दिला. आतापर्यंत कलेत जे वर्णन आले नव्हते ते तिच्यात घुसडून द्यावयाचे. ती वर्णने असंदिग्ध ठेवावयाची म्हणजे टीकाकार व वरच्या वर्गाचे लोक वाहवा वाहवा म्हणू लागणारच.