प्रकरण सोळावे
(ख-या कलेच्या अभावाचे परिणाम; कलेच्या विकृतीचे परिणाम; निरूपयोगी व अहितकर अशा कलेसाठी केला जाणारा श्रम व होमिली जाणारी जीवने; श्रीमंत लोकांचे अनैसर्गिक व अस्वाभाविक जीवन; मुले व सामान्य लोक यांचा होणारा गोंधळ व बुध्दिभेद; योग्य व अयोग्य खरे व खोटे, न्याय्य व अन्याय्य यासंबंधीचा घोटाळा; निट्शे व रेडबिग्रर्ड; देशाभिमानाच्या व सुखोपभोगाच्या खुळया व खोडसाळ कल्पना.)
मानवी प्रगतीची जी दोन साधने, त्यातील कला हे एक आहे, शब्दांनी मनुष्य विचारविनिमय करतो; कलेच्या द्वारे भावनाविनिमय करतो. कलेच्या द्वारे कलावान आजच्याच लोकांना भावना देतो असे नव्हे तर भूत व भविष्यकालीन लोकांच्याही भावनांची अनुभूती आणून देत असतो. परस्पर व्यवहार करण्याची ही जी दोन साधने त्यांचा माणसाने उपयोग करणे हे अगदी स्वाभाविक आहे. विचारविनिमयाच्या या दोन साधनांपैकी राहणार नाही. विकृत कला विनाशकारी आहे. विकृत वाणीही नुकसानकारक आहे. हे दुष्परिणाम द्विविध असू शकतात. एक प्रकार म्हणजे ह्या साधनांनी जे खरोखर झाले पाहिजे होते ते होत नाही व दुसरा प्रकार म्हणजे जे व्हावयाला नको तेच होते; हे उभयस्वरूपी परिणाम आजच्या आपल्या समाजात दिसून येत आहेत. कलेचे साधन बिघडल्यामुळे कलेने जो खरोखर परिणाम झाला पाहिजे होता तो आजच्या वरच्या वर्गातील लोकांच्या जीवनावर होत नाही. ज्या कलेने कोणतीही भावना मिळत नाही, क्षणभर करमणूक मात्र होते आणि ज्या करमणुकीने लोक बिघडतात व सच्च्युत होतात-अशा खोटया भावनाशून्य नकली कलेचा एका बाजूने होणारा प्रसार आणि दुस-या बाजूने विशिष्ट पंथ, आपापली राष्ट्रे यासंबंधीचीच असंग्राहक कला-जी मानवांना-अखिल मानवांना-न जोडता फोडण्यास मात्र कारणीभूत होते आणि ज्या ह्या असंग्राहक क्षुद्र कलेलाच श्रेष्ठ मानण्यात येत आहे, अशा कलेचा प्रसार- या दो्न्हींमुळे आजकाल माणसांची रूचीच इतकी बिघडून गेली आहे की, सत्कलेचा त्यांच्यावर काही परिणामच होत नाही. रोगाने हे इतके पछाडले गेले आहेत की-सत्कलेचे पौष्टिक दूध त्यांना कडूच लागते. सत्कला त्यांना समजत नाही, तिने त्यांचे निगरगट्ट हृदय हालत नाही. यामुळे सत्कला ज्या थोर भावना देण्यासाठी उभी असते त्या भावनांना हे लोक मुकतात. मानवांना आजपर्यंत ज्या थोर भावना मिळाल्या, त्या एकमेकांसा देण्याचे साधन कला हेच आहे व ह्या भावना देणारी सत्कलाच ह्या लोकांना रूचत व पचत नसल्यामुळे हे लोक सद्भावनाहीन राहिले आहेत.
कलेममध्ये जे जे उत्तमोत्तम कलावानाने ओतले असेल ते अशा लोकांच्या बाबतीत व्यर्थ आहे. सत्कलेची चंद्रकला पाहून ज्यांचा हृदयसिंधु उचंबळत नाही, भरभरून येत नाही, अशांना दांभिक व खोटी कला, किंवा क्षुद्र व असंग्राहक कला ह्याच उतरता व त्यांनाच ते सत्कला म्हणून मानू लागतात. आजचे आपले लोक बॉडलिअर, व्हर्लेन, मोरिअस इब्सेन, मॅटर्लिक अशांची साहित्ये वाचून डोलतात; मॉनेट, पूव्हिस डो चॅव्हनीस, बर्न जोनेस, स्टक्, बॉकलिन् यांची चित्रे पाहून हे तल्लीन होतात; वॅग्नर, लिस्झ्ट, रिचर्ड स्ट्रॉस यांच्या संगीतने बेहोष होतात. या लोकांना परमोच्च धर्मपर कला किंवा अतिसाधी विश्वजनांची कला समजण्याची पात्रताच राहिली नाही.
ख-या कलाकृतींचा वरच्या वर्गातील लोकांच्या मनावर काही परिणाम होत नाही. यामुळे लोक जरी वयाने वाढतात, शिक्षण घेतात, तरी कलेमुळे जीवनात जी सहृदयता, जी विशालता, जी आर्द्रता येत असते, जी ऐक्यबुध्दी येत असते, त्या सर्वांपासून दूर त्यांचे जीवन राहाते. यामुळे त्यांची जीवने समृध्द व सफल होत नाहीत. त्यांच्या जीवनाची वाढ होत नाही. पूर्णतेकडे त्यांचे पाऊल पुढे पडत नाही. ते अधिक सद्यहृद्य व सरस हृद्य होत नाहीत. त्यांच्या जीवनभूमीत प्रेम, दया, सहानुभूती इत्यादी सद्गुणांचे पीक येत नाही. उलट संस्कृतीची व सुधारणांची सर्व आधुनिक साधने त्यांच्याजवळ असल्यामुळे ते अधिकच रानटी, अधिकच क्रूर, अधिकच आडदंड व अधिकच अरेरावी असे होतात.