या कवींच्या सा-याच कृती दुर्बोध आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती नाही. प्रयत्न फारच केले तर थोडेसे समजते; सारे तर कधीच समजत नाही. फ्रेंचच नव्हे तर जर्मन, स्वीडिश, नॉर्वेजिअन, इटॅलियन, रशियन सारेच कवी अशा कविता रचीत आहेत. त्यांची पुस्तके भराभरा छापली जात आहेत. खिळे जुळविण्याच्या कामांत पाने जुळविण्याच्या कामांत, छापण्याच्या कामांत, बांधण्याच्या कामांत लाखो मजूर सारखे खपत आहेत. प्रचंड असे पिरॅमिड बांधावयास असे मजूर सारखे वर्षानुवर्षे खपत होते, त्याप्रमाणेच ही दुर्बोध पुस्तके छापण्यासाठी छापखान्यांत मजूर मरत आहेत, लेखनाच्या बाबतीतच नव्हे, तर इतर सर्व कलाक्षेत्रांत हेच दृश्य दिसून येईल. चित्रे, गीते, नाटके, इत्यादी कलांचे नमुने नीट तयार करून देण्यासाठी लाखो तास खपत आहेत.
दुर्बोधतेच्या बाबतीत चित्रकला काव्यकलेच्या बिलकुल मागे नाही. तिने काव्यदेवीच्या पुढे मजल मारिली आहे. १८९४ साली पॅरिस शहरांत चित्रकलेचे जंगी प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनाला गेलेल्या एका नवशिक्या चित्रकाराच्या रोजनिशीतील पुढील उतारा आहे :
''आज तीन प्रदर्शने पाहिली. ती तीन प्रदर्शने तीन पध्दतीची होती. प्रतीकवादी, प्रतिबिंबवादी, नवप्रतिबिंबवादी; अशा तीन संप्रदायांची चित्रे तीन ठिकाणी होती. अत्यंत काळजीपूर्वक व विचारपूर्वक ही चित्रे मी पाहात होतो. परंतु ही चित्रे पाहून मला काही समजेना, अर्थबोध थोडासुध्दा होईना. शेवटी मी चिडलो व चरफडलो. मला राग आला.
प्रथमदर्शनी कॅमिले पिझॅरो याच्या चित्रसंग्रहाचे प्रदर्शन होते. इतर संग्रहाशी तुलना करता हा संग्रह जरा व्यापक स्वरूपाचा असा होता. परंतु ही चित्रे रेखीव नव्हती. त्यांच्यांत भाव नव्हता, अर्थ नव्हता. रंगकाम तर फारच विचित्र त-हेचे; अशा प्रकारचे रंग दिलेले होते की जे कधी कोठेच दिसणार नाहीत. काढण्यात कधी कधी इतकी अनिश्चितता होती की हा हात, हे डोके, कोणत्या बाजूला फिरविलेले आहे ते समजून येत नसे.
रंगांममध्ये झगझगीत व गडद निळा, आणि झगझगीत गडद हिरवा यांचे आधिक्य होते. प्रत्येक चित्रांत कोणत्या तरी एकाच रंगाला विशेष प्राधान्य दिलेले असे, त्या रंगानेच ते चित्र बहुतेक भरलेले असे. उदाहरणार्थ, बदके सांभाळणा-या एका मुलीचे चित्र होते. या चित्राचा विशेष म्हणजे एकच रंग सर्वत्र होता. या रंगाचे ठिपके सर्वत्र उडविलेले होते. तोच रंग कोठे फिका, कोठे दाट दिलेला होता. तोंडावर, केसांवर, हातांवर कपडयांवर सर्वत्र हाच रंग खेळत होता.
याच गॅलरीत दुस-या चित्रकारांचीही चित्रे होती. एका चित्रकाराचे नाव मला वाचता येईना. काहीतरी रेडन वगैरे असे असावे. निळया चेह-याचे एक चित्र त्याने रंगविले होते. सर्व चेह-यावर ही निळी निळी झाक. थोडे त्यांत भु-या रंगाचे मिश्रण होते. पिझॅरोने पाण्याचे रंग वापरले होते. ठिपक्यांचे बंड एकंदरीत फार. चित्रांत एक गाय होती. तिच्या अंगावर नाना रंगांचे ठिपके! त्या गायीचा एकंदरीत रंग काय-काळी का ढवळी-काही सांगता येत नव्हते! चित्राच्या जवळ जाऊन पहा की लांबून पहा-एकूण एकच.
प्रतीकवाद्यांच्या चित्रांकडे मी बराच वेळ पाहत होतो. कोणालाही न विचारता कोणाची मदत न घेता या चित्राचा अर्थ समजतो का, हे मी पहात होतो. परंतु त्या चित्रांचा अर्थ समजणे म्हणजे मानवी बुध्दीच्या व तर्काच्या पलीकडचे होते. एका चित्रात एक नग्न बाई होती. आपल्या दोन्ही हातांनी ती स्तन पिळवटीत होती. त्या स्तनांतून लालसर रक्तधारा वहात होत्या. तिचे केस प्रथम खाली येऊन नंतर पुन्हा वर चढले होते व केसांच्या टोकांतून वृक्षवेली उत्पन्न झाल्या होत्या. चित्राचा सारा रंग पिवळा होता. केस पिंगट होते.
दुसरे एक चित्र पिवळा समुद्र असून त्याच्यावर काहीतरी तरंगत होते. ही नाव म्हणू का हृदय म्हणू? क्षितिजावर तेजोमय मूर्ती दिसते. त्या मूर्तीचे केस पिवळे आहेत. त्या केसांचा समुद्रांत अस्त झाला आहे.