कलेवरचा हा प्रस्तुत ग्रंथ लिहिण्यासाठी म्हणून या हिवाळयात ज्यांची सर्व युरोपमध्ये ख्याति आहे अशा कादंब-या व गोष्टी मला फार त्रास व कंटाळा वाटत होता तरी वाचून काढल्या. झोला, बर्गेट, हुइसमन, किप्लिंग वाचून काढले. याच काळात मुलांच्या एका मासिकांतील एक गोष्ट मला सहज वाचावयास मिळाली. या गोष्टीचा लेखक अज्ञात आहे. त्याच्या नावाचा गाजावाजा झालेला नव्हता. कोठेतरी कोप-यात तो पडलेला असेल. ती गोष्ट अगदी साधी आहे. एक विधवा होती. ती गरीब होती. ईस्टरचा सण आला होता. जिकडेतिकडे तयारी चालली होती. विधवेची मुलेबाळे होती म्हणून तिलाही घरात गोडधोड करणे भाग होते. गरिबीत कोंडयाचा मांडा केला पाहिजे होता. मोठया मिनतवारीने तिने थोडा गव्हाचा आटा मिळविला होता. तो आटा ती एका टेबलावर ओतते. तो भिजवायचा असतो. परंतु त्या आठयांत घालण्याचा काहीतरी पदार्थ बाजारांतून आणण्याला ती विसरलेली असते. ती बाजारांत जावयास निघते. निघताना ती मुलांना म्हणते ''घरांतून बाहेर नका रे जाऊ. मी येईपर्यंत घरातच खेळा हो राजांनो. पीठ आहे तेथे. कुत्री येतील, कोंबडी येतील, नीट लक्ष ठेवा.'' मुलांना बजावून ती माता बाहेर जाते. इतर काही गल्लीतील मुले खेळतखिदळत, आरडाओरडा करीत त्या विधवेच्या झोपडीपाशी येतात. ती बाहेरची मुले आतील मुलांस बाहेर बोलावतात. ''या रे बाहेर. घरात काय बसता घरकोंबडयासारखे. आपण सारे मिळून खेळू. गंमत करू.'' मुलांना मोह आवरत नाही. आईने बाहेर जाऊ नका असे सांगितलेले असते, परंतु मुले ते विसरून जातात. मुलेच ती खेळापुढे ती सारेच विसरतात. मुले बाहेर जातात व इतर मुलांबरोबर खेळण्यात दंग होतात. इकडे एक कोंबडी आपल्या पिलांसह त्या झोपडीत शिरते. कोंबडी टेबलावर उडी मारते पिले खाली असतात. त्या पिलांची आई चोचीने वरची कणीक खाली फेकते. सारी कणीक ती पिस्कारून टाकते. सारी कणीक जमिनीवर घाणीत ती कोंबडी सांडीत होती. बाजारांतून जिन्नस घेऊन मुलांची आई येते तो घरांत कोंबडी व तिची पिले! त्या मातेला वाईट वाटते. तिची निराशा होते. एवढी कष्टाने मिळविलेली कणीक मातीत गेली. ती मुले घरी येतात. आई त्यांना पुष्कळ बोलते. त्यांना राग भरते. मुले स्फुंदू लागतात. शेवटी त्या मातेला मुलांची करूणा येते. सणावारी आपली मुले रडताना कोणा मातेला पहावतील? ती त्यांना जागी करते, पोटाशी घेते. परंतु आज सणाला काय करायचे? घरांत कणीक नाही, गहू नाहीत. नसेना कणीक. मुलांना कणीकच पाहिजे असे थोडेच असते! बाजरीचीच भाकर करण्याचे ती माता ठरविते. घरातील बाजारीच्याच पिठांत थोडा गूळ घालून ती गोड भाकर करते. भाकर करताना ती गाणे म्हणते. ''करू कोंडयाचा मांडा तुम्ही चिंता सारी सांडा.'' मुले ते गाणे उचलतात व आनंदाने नाचत नाचत म्हणतात. आज सणाला गव्हाची पोळी नाही वगैरे ती मुले विसरून जातात. ती माता स्वत:चे समाधान त्या मुलांना देते. मुलांना दु:खाचा विसर ती पाडते. ती गाणे गाते. ती मुलांना हसविते, आनंदविते, मुलांची निराशा जाते. रडवेले डोळे हसू लागतात; म्लान तोंडे टवटवीत होतात. ते गाणे गातात.
करू कोंडयाचा मांडा। तुम्ही चिंता सारी सांडा।
करू कोंडयाचा मांडा। बाळ खेळ तुम्ही मांडा॥
बाजरीची भाकर केव्हा तयार होईल याची वाट पहात आईच्या चुलीभोवती ती कोंडाळे करून बसतात.