त्याच सायंकाळी घरी एका प्रसिध्द संगीत विशारदाने बीथोव्हेनची रागिणी वाजविली. तुम्ही ब्रीथोव्हेनचा अभ्यास केला नसेल, तो तुम्हाला समजत नसेल, असे मला कोणी म्हणेल. परंतु मी नम्रपणे असे सांगण्याची परवानगी घेतो की, बीथोव्हेनच्या या रागिणीबद्दल इतरांस काय वाटत असेल ते वाटो; परंतु बीथोव्हेनने आयुष्याच्या शेवटच्या भागांत ज्या रागरागिण्या रचिल्या त्या मी उत्कृष्टपणे जाणतो; मी त्यांचा नीट अभ्यास केलेला आहे. कारण संगीताचे मला फार वेड आहे. संगीताचा माझ्यावर विलक्षण परिणाम होतो. जणू रोम रोम माझा हलतो, नाचतो. बीथोव्हेनच्या या रागरागिण्यांनी मीसुध्दा पूर्वी आनंदून जात असे व तल्लीन होत असे. परंतु ब्रीथोव्हेनचा जो माझ्यावर परिणाम होई, त्या परिणामाशी इतर संगीतस्त्रष्टयांच्या संगीताने मजवर जो परिणाम होई त्याची तुलना करण्यासाठी मी आणखी अभ्यास केला. बॅक, हेडन, मोझार्ट, चॉपिन, यांच्या संगीतश्रवणाने ज्या बलवान्, जोरदार, प्रबळ अशा भावना, स्पष्ट व सुखद अशा संवेदना हृदयांत उद्भुत होत, त्यांच्याशी मी ब्रीथोव्हेनच्या संगीताने होणा-या परिणामाची तुलना करून पाहिली आहे. परंतु एवढयाच तुलनेने भागणार नव्हते. या संगीतविशारदांच्याच रागरागिण्यांशी नव्हे, तर नाना लोकगीते, इटॅलियन, नॉर्वेजियन, रशियन लोकांत खेडयापाडयांतून जे लोकसंगीत आहे, तेथील स्त्रीपुरुष जी गाणी गातात-त्यांच्याशीही तुलना करून पाहणे जरूर होते. बीथोव्हेनच्या रागिण्यांनी एक प्रकारची हुरहूर, एक प्रकारची करूण, अदोय अशी अस्वस्थता, एक प्रकारची अनिश्चित अशी अशांति, यांचा अनुभव येतो. निरागस सहज आनंद, मोकळा व प्रबल उत्साह तो देऊ शकत नाही. बीथोव्हेनचे गाणे वाकवील, उभे करणार नाही; खिन्न करील, प्रफुल्लित करणार नाही. बीथोव्हेनच्या रागरागिण्या ऐकून पूर्वी कृत्रिम रीतीने आनंद व उत्साहाच्या भावना माझ्यात उत्पन्न झाल्या आहेत असे मी मानीत असे. असे मृगजळ निर्माण करण्याचा मी प्रयत्न करीत असे; परंतु त्या कृत्रिम व मार्मिक भावना क्षणांत नाहीशा होत.

आमच्या घरच्या पाहुण्याने बिथोव्हेन आळवून दाखविला. जे ऐकायला हजर होते त्या सर्वांनी (जरी त्यांच्या चेह-यावर ते संगीत ऐकताना कंटाळा स्पष्टपणे दिसून येत होता तरी) बीथोव्हेनच्या त्या गंभीर व हृदय हलविणा-या रचनेची खूप स्तुती केली, ''बीथोव्हेनने जीवनाच्या शेवटी रचलेले हे भाग आज जसे आम्हाला समजले, तसे पूर्वी कधीच समजले नव्हते. आज तुम्ही नवीन दृष्टी दिलीत, नवीन सृष्टी दाखविलीत, बीथोव्हेन का थोर व मोठा ते आज कळले, आज हे कान कृतार्थ झाले''-इत्यादी शब्दांचा उच्चार सर्वांनी केला. त्या शेतकरणीच्या गाण्याने मजवर जो परिणाम झाला होता, ज्यांनी ज्यांनी ते गाणे ऐकले, त्या सर्वांवरच त्या गाण्याचा जो परिणाम झाला होता, त्या परिणामाशी बीथोव्हेनच्या या रागिणींनी झालेल्या परिणामाची तुलना करून मी माझे मत जेव्हा सांगू लागलो, तेव्हा एकदम सारे बीथोव्हेनचे स्तोत्रपाठक माझ्याकडे तिरस्काराने पाहू लागले; तुच्छतादर्शक स्मित त्यांनी दर्शविले. माझ्या विचित्र उद्गारांना उत्तर देणे म्हणजेही मूर्खपणा व कमीपणा आहे असे ते दर्शवीत होते.

परंतु काहीही असो. त्या शेतकरणीच्या गाण्यांत खरी कला होती. निश्चित व प्रबळ भावना ते गाणे देत होते आणि बीथेव्हेनची ती १०१ वी रागिणी कलाक्षेत्रांतील एक अपेशी प्रयत्न होता. त्यात स्पष्ट अशी भावना नव्हती व म्हणूनच तेथे हृदय तन्मय व एकरूप होणे अशक्य होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel