कला हृदयस्पर्शी व्हावी म्हणून, भावनादायक व्हावी म्हणून मी मुख्य असे तीन गुण सांगितले. परंतु या तिन्ही गुणांत एकाचा लय करता येईल. एक कळकळ व तळमळ असली म्हणजे पुरे. जिव्हाळा ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. कलावानाजवळ आंतरिकता जर असेल तर हे इतर गुण आपोआप येतील. तळमळ असली की सारे आले. कलावानाला आंतून प्रेरणा पाहिजे. स्वत:ची भावना प्रकट करण्याची पोटतिडीक पाहिजे. ती भावना स्वत:च्याच जीवनांतून जणू निघालेली असते, त्या वेळेस ती स्वतंत्र व वैशिष्टयपूर्ण असणारच; म्हणजे पहिला गुण आलाच. कलावान जर कळकळीचा असेल, त्याचे आतडे तुटत असेल, तर जी भावना तो प्रकट करील, ती त्याच्याच विशिष्ट जीवनवेलीवरचे फूल असणार. ती भावना उसनी, भाडोत्री, दत्तक घेतलेली नसणार. ज्याअर्थी प्रत्येक व्यक्ती इतरांपासून स्वतंत्र आहे व भिन्न आहे, त्याअर्थी प्रत्येकाची भावनाही स्वतंत्रच असणार. स्वतंत्र म्हणजे ती उसनी नसणार; त्याच्याच जीवनांतील अनुभवांचा छाप तिच्यावर असणार. ही भावना कलावानाच्या जितकी अधिक अंतरंगांतून आलेली असेल त्या मानाने ती अधिक त्याचीच असणार. ती भावना म्हणजे त्याच्या हृदयपाताळांतून वर आलेली गंगा होय; त्याच्या हृदयसागरांतील ते मोती होय; त्याच्याच हृदयाकाशांतील तेजस्वी तारा होय. कलावानाच्या जीवनांतून बाहेर आलेली ही भावना साहजिकच अधिक व्यापक असणार, साहजिकच हजारोंच्या हृदयाला जाऊन मिळणार; कारण जीवन सारे एकच आहे. जीवनातील खरा अनुभव दुस-याला हलविल्याशिवाय राहात नाही. स्वत:च्या अंतरंगांतील ती भावना असल्यामुळे, साहजिकच ती अधिक स्वच्छ व स्पष्ट अशा रीतीने देता येईल. तेथे ना संदेह, ना संशय, ना गुळगुळीतपणा ना भित्रेपणा. त्या कलावानाला सहजच असे शब्द स्फुरतील, असे रंग सुचतील, की ते शब्द व ते रंग त्याच्या भावनेचे स्वरूप स्वच्छपणे जगाला कळवितील.
म्हणून वर सांगितलेल्या तीन गुणांपैकी आंतरिकता हाच महत्त्वाचा गुण आहे. या गुणाला आंतरिकता म्हणा, जिव्हाळा म्हणा, तळमळ म्हणा, कळकळ म्हणा, पोटतिडीक म्हणा-काही म्हणा-हा गुण सर्वांत मोलाचा आहे. ज्यांचे जीवन कृत्रिम झालेले नाही, जे फार शिकलेसवरलेले नाहीत अशा अडाणी लोकांच्या कलेत म्हणूनच कळकळ व तळमळ हे गुण मुख्यत्वेकरून असतात. त्यांची ती भोळीभाबडी कला वेड लावते; हृदय मोहून टाकते. परंतु वरच्या वर्गाच्या कलेमध्ये या कळकळीच्या नावाने आवळयाएवढे पूज्य असते. त्या लोकांच्या हृदयाचा झरा सुकलेला असतो. दंभ व घमेंड यांनीच ते कलानिर्मितीस तयार होत असता. त्यांना आतून प्रेरणा नसते, आतील प्रसववेदना नसते. पैसा त्यांना कलाकृती निर्माण करावयास लावीत असतो; कधीकधी अहंकारामुळे कलानिर्मितीस ते प्रवृत्त होतात; कधी स्पर्धेमुळे ते या कामास आरंभ करतात. त्यांना हृदयाची हाक नसते, त्यांचे हृदय शब्दांच्या वा रंगांच्या रूपाने बाहेर पडण्यासाठी धडपडत नसते, तडफडत नसते.
खरी कला व कृत्रिम नकली यांच्यातील भिन्नता वरील तीन गुणांमुळे दिसून येते. हे तीन गुण प्रत्येक कलाकृतीचे श्रेष्ठत्व ठरवतील. अर्थात् या वेळेस आपण कलाकृतीतील विषय बाजूला ठेवला आहे. भावनेची उत्कटता हीच सध्या पहात आहोत. भावनेचा प्रकार सध्या पहात नाही.