खरेच, आजच्या समाजातील कृत्रिम कलावानांना हे अशक्य, खरोखरच अशक्य आहे. परंतु त्या उद्याच्या कलावानाला ते अशक्य नाही. कारण विषयांचे दारिद्रय लपविण्यासाठी मुद्दाम उभारलेली कृत्रिम तंत्रे व अवडंबरे त्याच्याजवळ नसतील. त्याच्या कलेला अनंत, अपार, अवीट व अतूट असा विषय असणार; त्या कलावानाला पगार नसेल, तो धंदेवाईक बनून कलेचे दुकान घालणार नाही; अंत:स्फूर्तीने व अंत:प्रेरणेनेच तो कलाकृती निर्माण करील. आणि आजच्या कलेची विकृतता व कृत्रिमता त्याच्या कलाकृतीत नसल्यामुळे ती विश्वजनांच्या मनाला मोहील.
सारांश, आजच्या कलेपासून उद्याची कला विषय व स्वरूप दोन्ही बाबतीत संपूर्णपणे निराळी असणार. ज्या भावना मनुष्यांना एकत्र आणतील, एकत्र जोडतील, अशा भावनाच भविष्यकालीन कलेतून दिल्या जातील, कलेचे स्वरूपही वाटेल त्याला ठरवता येईल. त्याच्यासाठी तंत्रे व शस्त्रे यांची जरूर राहणार नाही. ज्याचे त्याचे हृदयच तंत्र ठरवील. भावनांची असंग्राहकता व संकुचितता नाहीशी होऊन त्या उदार व विधात्मक असतील. भावना एकांगी न राहता सर्वांगीण राहतील. कलेचे स्वरूपही दुर्बोध, बोजड व अवजड न राहता (आज असे असण्यातच उत्कृष्टत्व मानले जात आहे) ते सुटसुटीत, साधे सरळ व उत्कट असे राहील. ज्या वेळेस कला एवं गुणविशिष्ट अशी होईल, तेव्हाच ती भावनांना मातीत लोटणार नाही, त्यांचा अध:पात करणार नाही, त्यांना हृतसार करणार नाही. ''माझ्यासाठी तुम्ही सारे उत्कृष्ट शक्ती खर्च करा, व मी मात्र तुम्हाला खड्डयांत लोटीन.'' असे आजच्या कलेप्रमाणे भविष्यकालीन उगवती कला म्हणणार नाही. कलेने खरोखर जसे असले पाहिजे, तशीच ती राहील, तशीच ती होईल. बुध्दिगम्य धार्मिक विचार हृदयगम्य करावयाचे, बुध्दीला प्रतीत होणा-या सत्याला भावनेने ऊब देऊन ते हृदयाला समजेल असे करावयाचे हे कलेचे काम आहे. जे मानवी ऐक्य बुध्दीच्या डोळयाला दिसत आहे, त्या ऐक्याकडे प्रत्यक्ष रोजच्या जीवनातून लोक अधिकाधिक जवळ जातील असे करणे, ह्यासाठी त्यांच्या हृदयांत प्रेमपूर आणणे, त्यांच्या हृदयाला हे ऐक्य भावनेच्या भाषेत समजावून देणे हे कलेचे काम आहे. बुध्दीला समजणा-या गोष्टी जेंव्हा भावनामय होतात तेंव्हाच त्या गोष्टी कृतीत येऊ लागतात. विचारांना जळजळीत भावना करणे हे कलेचे काम आहे. ऐक्याच्या विचारांची जिवंत भावना हृदयाहृदयांत ओतून सर्व पांगलेल्या बंधूंना प्रेमाने बांधून एकत्र आणणे हे जे कलेचे नियोजित असे महान् कर्तव्य-ते ती उद्या लौकर अंगिकारील यात संशय नाही.