कळकळ हा सेमिनॉव्हचा मुख्य गुण आहे. शिवाय या पुस्तकातील विषयही महत्त्वाचा आहे. रशियातील सर्वांत महत्त्वाचा जो वर्ग म्हणजे शेतकरी व मजूर. त्यांच्या संबंधीच्या या गोष्टी आहेत. सेमिनॉव्ह या लोकांतच वावरतो, वापरतो. या लोकांच्या जीवनाशी तो एकरूप झालेला आहे. शिवाय ख्रिस्ताच्या ख-या शिकवणींपासून माणसे किती दूर आहेत किंवा किती जवळ आहेत हे ग्रंथकार दाखवीत आहे, हे या गोष्टीचे स्वारस्य आहे. उगीच बाह्य हकीगती रंगवीत बसणे हा हेतू नाही. ख्रिस्ताची शिकवण ग्रंथकाराच्या हृदयांत स्थिर व दृढमूल आहे. मानवी कृत्यांचे महत्त्वमापन करण्यासाठी त्याच्या हातात हे निरपवाद प्रमाण आहे. शिवाय आणखीही एक गोष्ट म्हणजे गोष्टीची सजावटही विषयानुरूप आहे. गंभीर परंतु साधे सरळ वातावरण सर्वत्र आहे. बारीक-सारीक वर्णने... त्यांत अतिशयोक्ति व दंभ नाही. भाषा तर फारच सुंदर आहे. पुष्कळवेळा ती नवीन व सहज अशी वाटते. ती जोरदार, ठसकेबाज, वैचित्र्यपूर्ण अशी आहे. विशेषत: पात्रांच्या तोंडी घातलेली घरगुती भाषा तर फारच सुरेख साधली आहे.
५
(ऍमिलच्या रोजनिशीतील उता-यांना लिहिलेली प्रस्तावना)
अठरा महिन्यांपूर्वी अॅमिलची रोजनिशी सहज हाती पडली. त्यांतील विचारांचे गांभीर्य अपूर्व होते. त्यांतील विचार फार महत्त्वाचे होते. मांडणीही मोठी सुंदर होती. थोर व सुंदर विचार, गोड व सुंदर भाषेत मांडलेले पाहून आनंद वाटला. विशेषत: या पुस्तकातील पानापानांत, ओळीओळीत कळकळ व तळमळ भरून राहिली आहेत. दंभाला येथे वावच नाही.
हा ग्रंथ वाचीत असताना जे विचार मला आवडले, त्याच्यावर मी खुणा केल्या. या खुणा केलेल्या उता-यांचे भाषांतर करण्याचे माझ्या मुलीने अंगावर घेतले. ते भाषांतर म्हणजेच हे प्रस्तुत पुस्तक होय. अॅमिल आपली रोजनिशी सतत वीस वर्षे लिहित होता. त्या रोजनिशीतील कांही निवडक उतारे छापले गेले. त्या निवडक उता-यातील ही फेरनिवड आहे.
हेन्री अॅमिल १८२१ मध्ये जन्मला. लहानपणीच तो पोरका झाला. जिनिव्हा येथे उच्च शिक्षण घेतल्यानंतर बर्लिन व हेडेलबर्ग या दोन्ही विद्यापीठांत तो कांही वर्षे राहिला. १८४९ मध्ये तो जिनिव्हा येथे परत आला व तेथील विश्वविद्यालयांत तो आचार्य झाला. प्रथम सौंदर्यशास्त्राचा व नंतर तत्त्वज्ञानाचा तो अध्यापक होता. मरेपर्यंत हे काम तो करीत होता.
त्याचे सारे जीवन जिनिव्हा येथेच गेले. १८८१ मध्ये तो मरण पावला. जसे इतर अध्यापक असतात, तसाच तो एक होता. आपापल्या विशिष्ट विषयांवर अगदी नवीन पुस्तकांतीलही माहिती मिळवून व्याख्याने तयार करावयाची, ती मुलांपुढे द्यावयाची, टिप्पणी उतरून द्यावयाच्या... असे यांत्रिक काम तोही इतरांप्रमाणे करीत होता. कधी कविता किंवा लेख लिहून छापखानेवाले, मासिकेवाले यांना देऊन कांही पैसे मिळवायचे... असेही थोडेथोडे अॅमिल मधूनमधून करीत असे.
अॅमिल साहित्यक्षेत्रात किंवा विद्यापीठात फारसा गाजला नाही. त्याला फारसे यश व कीर्ति मिळाली नाहीत. म्हातारपण जवळ येत असता तो स्वत:बद्दल पुढीलप्रमाणे लिहितो :
''देवाने मला ज्या देणग्या दिल्या त्यांचा विशेष असा काय उपयोग मी केला? माझ्या वाटयाला जी ही ५० वर्षे आली, त्या सर्वांचा मी काय उपयोग केला? मी काय पिकविले? काय कमाविले? माझ्या जीवनाच्या क्षेत्रातून मी काय मिळविले? कोणती फुले, कोणती फळे? माझा पत्रव्यवहार, माझ्या रोजनिशीनी ही हृदयांतून निघालेली हजारो पाने, माझी व्याख्याने, माझ्या कविता, माझे निबंध, माझे काही लेख, कांही टाचणे टिपणे... या सर्व भरकटण्याचा काय अर्थ? वाळलेल्या पानांचा पाचोळा हाच अर्थ नाही का? माझा कधी कोणाला उपयोग झाला आहे का? मी मेल्यावर एक क्षणभर तरी माझ्यामागे माझे नांव टिकेल का? माझ्या नावांत कोणाला काही अर्थ वाटेल का? क्षुद्र, अर्थहीन, फोल असे जीवन, मूल्य निस्सार असे जीवन!''