आम्ही गावांकडे वळलो. फेडकाने अद्याप माझी बोटे घट्ट धरून ठेविली होती. आता कृतज्ञतेने माझा हात त्याने धरून ठेवला होता. पूर्वी कधीही इतके एकमेकांच्याजवळ आम्ही आलो नव्हतो. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या कितीतरी जवळ गेलो. प्रोका जरा दुरून फार दूर नाही... त्या रुंद रस्त्यांतून चालला होता.

''त्या मॅसोनोव्हच्या घरांत अजून उजेड आहे.'' - प्रोंका म्हणाला. ''आज सकाळी मी शाळेत जात होतो, तेव्हा गव्हरुक दारू पिऊन येत होता. त्याच्या घोडयाच्या तोंडाला फेस आला होता. तो त्या घोडयाला सारखा झोडपीत होता. मला किती वाईट वाटत होते! असे कांही पाहिले की मला नेहमीच रडू येते. का बरे त्या मुक्या प्राण्याला त्याने मारावे?'' प्रोंकाने केविलवाण्या रीतीने विचारले.

सेमकालाही राहवेना. तो म्हणाला, ''त्या दिवशी मी टूलाहून येत होतो. माझ्या वडिलांनी घोडयाचा लगाम सैल सोडला. घोडा रानोमाळ दौडत गेला, उधळला. माझे वडील दारू पिऊन तेथे माळावर बर्फातच पडलेले होते!''

''सारखा तो गव्हरुक मारीत होता. घोडयाच्या तोंडावर, डोळयांवर वाटेल तेथे फाडफाड मारीत होता. आणि मला वाईट वाटले, त्या दिलदार प्राण्याला त्याने का मारावे? घोडयावरून बसून आला, खाली उतरला त्याला झोडप झोडप झोडपले त्याने.'' - प्रोंका तेच पुन्हा सांगत होता.

एकाएकी सेमका थांबला. त्याचे घर जवळ आले होते. झरोक्यातून आंत डोकावून तो म्हणाला, ''आमच्या घरातील मंडळी तर सारी झोपलेली दिसते आणखी थोडे जायचे का फिरायला? येता का?''

''आता नाही. आज पुरे...'' - मी म्हटले.

''बरे तर नमस्कार. जय जय निकोलव्ह!'' तो मोठयाने म्हणाला.

आमच्यातून प्रथम फुटून निघण्याचे त्याला दु:ख होत होते. मोठया कष्टाने तो गेला. बाहेरून आत हात घालून त्याने कढी काढली व अदृश्य झाला.

''आम्हाला एकेकाला घरी पोचवणार ना? प्रथम एकाला, मग दुस-याला होय ना? फेडकाने विचारले.

आम्ही पुढे चाललो. प्रोकाच्या झोपडीत अजून बारीक दिवा दिसत होता. खिडकीतून त्याच्या घरात आम्ही डोकावले. त्याची आई बटाटे सोलीत होती. तिचा बांधा सडपातळ व उंच होता. ती सुरूप होती. काम करून करून ती दमली भागली होती. तिच्या भिवया व डोळे अगदी काळे होते. ती टेबलाजवळ बसली होती. झोपडीच्या मध्यभागी पाळणा होता. प्रोंकाचा लहान भाऊ बटाटे खात होता. मिठाला लावून लावून खात होता. तो गणितविषयांत फार हुशार होता. तो दुस-या वर्गात होता. आईच्याजवळ टेबलाशी तो उभा होता. ती लहानशी झोपडी होती. आत धड उजेड नव्हता व घाणही होती.

''तू अगदी त्रासदायक आहेस... कोठे होतास इतकावेळ.'' प्रोंका घरात शिरताच रागाने आई बोलली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel