पण एक चमत्कार मात्र सांगण्याजोगा आहे. गोपाळराव आणि बळवंतराव या दोघा देशभक्तांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रेतयात्रा ज्या निघाल्या त्यांत दोघांनाही राष्ट्राने आपल्या हृदयात केवढे उच्च स्थान दिले आहे याचा स्पष्ट पुरावा आपणांस आणि भावी पिढयांस मिळत आहे. आणि चमत्कारांतला चमत्कार असा की, राजनिष्ठ म्हणून गाजलेल्या मुंबईच्या नव्या राजधानीत राजद्रोही म्हणून शिक्षा झालेल्या टिळकांचा देह पडला आणि सरकारविरोधी म्हणून शापलेल्या पुण्याच्या जुन्या राजधानीत सी. आय. ई. म्हणून राजसन्मान मिळवलेल्या गोखल्यांचा अंत झाला ! हा एक योगायोगच नव्हे तर काय? यावरून एवढे निर्विवाद होते की, दोघेही थोर लोकसेवक समाजाने वंद्य मानले आहेत. आता तपशिलाच्या मुद्दयांवर वादीप्रतिवादी केवढेही त्वेषाने तुटून पडून भांडोत ! जनतेने स्वयंस्फूर्तीने शिक्कामोर्तब केलेली या दोघा वंद्य पुरुषांची थोरवी कोणासही हिरावून घेता येणार नाही ! त्या थोरवीच्या स्वरुपासंबंधानेही जरी मतभेद होईल तरी हे लहानमोठे मतभेदाचे मुद्दे जशी अधिक चर्चा होईल व आपण जरा पुढे जाऊ तसे स्पष्ट होतील. अद्यापि त्रयस्थास त्यासंबंधाने निर्णायक बोलण्याची वेळ आलेली दिसत नाही. मात्र मागे सांगितल्याप्रमाणे या थोर पुरुषांच्या संबंधाने 'आठवणी', चरित्रे, चर्चा, अधिकाधिक प्रसिध्द होत आहेत व त्यावरून तो काळ लवकरच येईल अशी आशा वाटते. देशप्रगतीच्या विविधांगांचे व मूलतत्त्वांचे सम्यग्ज्ञान व त्यांचा आचारात्मक अनुभव अजून आमच्या लोकांस चांगला आलेला नाही पम येत चाललेला आहे आणि म्हणूनच निर्णायक मत देण्यास अनुकूलसा काळही जवळ येत आहे असे वर सुचविण्यात आले आहे.

रा. साने यांचे प्रस्तुत चरित्र हे वरील दिशेने वारा वाहू लागल्याचे एक चिन्ह आहे असे समजण्यास चिंता नाही असे समजण्यास चिंता नाही. रा. साने हे टिळक-गोखल्यांच्या पिढीत वाढले नसून अगदी उदयोन्मुख पिढीतले एक होतकरू पदवीधर आहेत. टिळकांना व कदाचित गोखल्यांना त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीअखेरीला पाहिले असेल. आज या थोर पुरुषांशी समागम करून घेण्यास त्या पुरुषांची भाषणे, लेख व कृती व त्यांच्याविषयी इतरांनी व्यक्त केलेले विचार व प्रगट केलेली माहिती यांवरच अवलंबून राहून रा. साने यांस आपले मत लिहावयास पाहिजे. ही मर्यादा संभाळून नि:पक्षपाती दृष्टीने रा. साने यांनी आपले बिकट काम केले आहे. त्यांची त्रयस्थाची भूमिका आहे. आणि अद्यापि जरी या भूमिकेस पूर्णावकाश झालेला दिसत नाही तरी त्या बाजूची पाउलवाट मळलेली आहे आणि रा. साने त्याच वाटेने आपली चाल करीत आहेत.

वरील भूमिकाविशेषाचा मुद्दा सोडला तरीही रा. साने यांचे प्रस्तुत चरित्र आपणांस प्रियच होईल. कारण रा. साने यांची भाषाशैली प्रशंसनीय आहे. तिच्यात तारुण्याचा आवेश जसा चमकतो तसाच तारुण्यातील निर्मळपणाही लकाकत आहे. इंग्रजी, मराठी व संस्कृत या तिन्ही वाङ्मयांशी त्यांचा जो निकट परिचय आहे त्याचेही प्रतिबिंब ग्रंथात जागजागी पडलेले आपणांस दिसून आनंद होतो. देशप्रीती आणि देशसेवार्ती यांचे पाझर रा. साने यांच्या ग्रंथात जागोजाग फुटलेले दिसतात. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथ फार मधुर झाला आहे.

थोर पुरुषांच्या मुख्य दोन कोटी कल्पना येतात. एक विचारस्रष्टयांची व दुसरी कार्यकर्त्यांची. श्रीकृष्ण, शंकराचार्य, कान्ट, स्पेन्सर, रुसो, बुध्द, माझिनी, रामदास हे पहिल्या कोटीत येतील आणि अर्जुन, शिवाजी, नेपोलियन, वॉशिंग्टन, कव्हूर वगैरे दुस-या कोर्टात पडतील. विचारस्रष्टयांचा मागोवा घेत कार्यकर्ते जर गेले तर होणारे परिणाम फार विशाल व व चिरस्थाई होतात व समाजाची प्रगती फार झपाटयाने व निश्चयाने होते. मानवी प्रगतीच्या दरबारात विचारस्रष्टे व कार्यकर्ते या दोघांनाही सर्वोच्च स्थाने दिली पाहिजेत हे जरी खरे आहे तरी त्यातल्या त्यात विचारस्रष्टयांचा मान उजव्या बाजूस बसण्याचा आणि कार्यकर्त्यांचा मान डाव्या बाजूस असण्याचा आहे, हा फरक ध्यानात ठेविला पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel