परंतु गरीबीने दिवस काढीत असतानाही त्याने स्वाभिमान सोडला नाही. कोणाजवळ याचना केली नाही. कोणाची खुशामत केली नाही. स्वाभिमान त्याने कसा राखिला याची एक गोष्ट येथे देतो. गोपाळ खानावळीत जात असे. एकदा त्याने सहज वाढप्याजवळ दही मागितले. तो म्हणाला, 'महिना आठ आणे जास्त द्यावे लागतील. उगीच नाही फुकट दही मिळत !' 'मला रोज दही वाढीत जा' असे गोपाळाने सांगितले. अर्थात आठ आणे जास्त द्यावे लागणार ते कोठून आणावयाचे? ठरीव पैशात तर उरकले पाहिजे. स्वाभिमान आणि आपली मिळकत यांची संगती राहील अशी त्याने युक्ती काढिली. खानावळीत खाडे पडावे म्हणून दर शनिवारी तो उपवास करू लागला. अशा प्रकारे आपला मान त्याने राखून घेतला. गैरवाजवी खर्च चुकीमुळे जरी झाला तरी तो आपल्या भावास लिहावयास त्यास भीती वाटे. आपण अनाठायी खर्च करतो हे पाहून आपला भाऊ काय बरे म्हणेल? तो तिकडे मोठया मिनतवारीने दिवस काढीत असता आपण असा खर्च कसा केला असे त्यास वाटे. अर्थातच तो अपव्यय कधी करीतच नसे. परंतु एकदा एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. त्याच्या एका स्नेह्याने त्यास तो नको नको म्हणत असता नाटकास नेले. होता होईतो कोणाचे मन मोडावयाचे नाहा हा गोपाळाचा स्वभाव. तो नाटकास गेला. त्याचे तिकीट त्याच्या मित्रानेच काढले. नाटक संपले; सर्व काही झाले. पढे काही दिवसांनी हा स्नेही गोपाळाकडे येऊन तिकिटाचे पैसे मागू लागला. गोपाळ चकित झाला. त्यास ही कल्पनाही नव्हती. आपण नको म्हणत असता आपला स्नेही आपणास नाटकास नेत आहे त्या अर्थी तोच पैसे खर्च करील असे त्यास वाटले होते. परंतु तोच मित्र प्रत्यक्ष जेव्हा पैसे मागू लागला तेव्हा स्वाभिमानी गोपाळाच्याने नाही कसे म्हणवणार? त्याने आठ आणे काढून दिले आणि पुनश्च असल्या फंदात पडावयाचे नाही असा कानास खडा लावून घेतला. परंतु हे आठ आणे भरून कसे काढावयाचे? एक सुंदर व्यक्ती त्याच्या कल्पक डोक्यास सुचली. रात्रीचा दिवा बंद करावयाचा व महिन्यास आठ आणे बत्तीचा खर्च होई तो म्युनिसिपल दिव्यावर अभ्यास करून वाचवायाचा. म्हणजे जास्त आठ आणे खर्ची पडणार नाहीत असे त्याने ठरविले. गरिबीमुळे असे दिवस काढावे लागतात. रा. ब. सीताराम विश्वनाथ पटवर्धनांची अशीच गोष्ट सांगतात की, त्यांनी म्युनिसिपालिटीच्या दिव्याजवळ अभ्यास केला. हा म्यु. दिव्याजवळ अभ्यास करणारा विद्यार्थी पुढे देशास उजेड दाखवील असे त्या वेळेस कोणास वाटले असेल काय? विशाल काळाच्या उदरातील घडामोड कोणास समजणार? अभ्यासात तर गोपाळाची कधीच कुरकुर नसे. गोपाळाची आई जरी शिकलेली नव्हती तरी तिची स्मरणशक्ती फार तीव्र असे. हा स्मरणशक्तीगुण गोपाळाच्या अंगात पूर्णपणे उतरला होता. त्यामुळे त्याच्या लक्षात फार राहत असे. मॅट्रिकच्या परीक्षेची वेळ आली आणि गोपाळ परीक्षेस मोठया उत्साहाने बसला. परीक्षा झाल्यावर सुटी असल्यामुळे गोपाळ घरी गेला.

आनंदात दिवस चालले होते. खेळण्यात, हिंडण्यात काळ सुखाने चालला होता, आपण परीक्षेत खात्रीने पास होणार असा गोपाळास भरंवसा होता. त्याच्या एका मुंबईच्या मित्राने त्यास तार करीन असे सांगितले होते. निकालाचा दिवस उजाडला. आज गोपाळाचे मन खाली-वर होत होते. इतक्या दिवस केलेल्या श्रमाचे चीज होणार की नाही हा प्रश्न त्याच्या मनापुढे होता. ठरलेली वेळ झाली आणि तार आली नाही. गोपाळ उदासीन झाला. आपला भाऊ आपणास काय म्हणेल? आपण उनाडलो नाही आणि असे का बरे झाले? सर्व श्रम वाया गेले. मन खट्टू होऊन गोपाळ एकटाच लांब दूर फिरावयास गेला. परंतु लवकरच तार आल्याचे आनंददायक वर्तमान त्यास वाटेत कळले. गोपाळाचा आनंद गगनात मावेना. भावनावश माणसाला आनंदही जास्त होतो. दु:खही जास्त होते. आपल्या भावनांस ताब्यात ठेवण्यास गोपाळ पुढे न्या. रानडयांच्या उदाहरणाने शिकला. परीक्षा पास होण्याचा आनंद पास होणारेच जाणतात. वर्षाच्या श्रमांचा मोबदला एका क्षणात मिळावयाचा असतो. केलेल्या श्रमांचे सार्थक होऊन जो आनंद- सात्त्वि आनंद भोगावयास मिळतो तो अमोल आहे. मनाला नवीन कार्य करण्यास हुरूप येतो. 'क्लेश: फलेन हि पुनर्नवतां विधत्ते' हेच खरे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel