फुल्लर साहेबांचे जरी स्वदेशी प्रयाण झाले तरी बंगालची फाळणी पुढे बादशहा हिंदुस्तानात येईपर्यंत रद्द झाली नाही. ही न होण्याचे कारण स्वत: कर्झनसाहेबांनी दिले आहे. किचनेरबरोबरच्या झगड्यात कर्झन नामोहरण झाले. मानधन कर्झन राजीनामा देऊन गेले. त्यांस थोडाबहुत तरी संतोष व्हावा म्हणून, जिच्यासाठी कर्झनानी रात्रीचा दिवस केला, सर्व राष्ट्राचा विरोधही जुमानला नाही, अशी बंगालची फाळणी रद्द करण्यात आली नाही. कर्झन साहेब जून ३०, १९०८ रोजी इंग्लंडमध्ये म्हणाले की, ''That measure had  been thrown as a sap to soothe my wounder feeling rather than on grounds of political propriety or expediency.'' मोर्ले साहेब ही फाळणी रद्द करणार असे वाटत होते व अशी दाट वदंताही होती. परंतु कोठे माशी शिंकली कोण जाणे! ज्या गोष्टीमुळे अनर्थपरंपरा ओढवली ती गोष्ट दूर करणे या तत्त्वज्ञ मुत्सद्दयाच्या का जिवावर आले कोणास कळे? येवढे खरे की, हा व्रण आणखी पाचसहा वर्षे बुजावयाचा नव्हता.

परंतु गोखल्यांचा इंग्लंडमध्ये जाण्यात हा मुख्य हेतू नव्हता. उदार पक्षाच्या मंत्रिमंडळाकडून आणा अर्धा आणा राजकीय हक्क मिळाले तर पहावे यासाठी ते गेले होते. या बाजूने शक्य ती खटपट त्यांना करावयाची होती. त्यांनी पुष्कळ प्रमुख लोकांच्या भेटी घेतल्या. हिंदुस्तानातील स्थिती कशी आहे, राज्यकारभार कशा धोरणाने चालतो, हे राज्यकारभाराचे यंत्र कसे अहितकारक आहे हे त्यांनी दाखवून दिले. मोर्ले साहेबांची पहिली मुलाखत त्यांनी गेल्या वर्षीच घेतली होती. नोव्हेंबरमध्ये ते मोर्लेसाहेबांस भेटून अर्धा तास त्यांचे संभाषण झाले होते. या भाषणाविषयी Immensely interesting.' असे मोर्ले लिहितात. या वर्षी त्यांची पहिली भेट मे च्या ७-८ तारखेस झाली. मोर्ले साहेबांस हिंदुस्थानविषयक प्रश्न सोडविण्यास गोखल्यांची पुष्कळ मदत झाली यात शंका नाही. गोखले व मोर्ले यांच्या एकंदर पाच मुलाखती झाल्या. शेवटची मुलाकत १ आगष्ट रोजी झाली. मोर्ले साहेब मिंटो यास लिहितात : 'आपण गोखल्यांशी मिळते घेऊन त्यांची मर्जी राखिली पाहिजे. यात आपला फार फायदा आहे. गोखल्यांची हाऊस ऑफ कॉमन्समधील लोकांवर छाप पडली आहे, आणि माझ्या हिंदुस्तानविषयक भाषणाची त्यांनी तरफदारी केली आहे,' ते पुढे लिहितात, 'He has a  politician's head; appreciates executive responsibility, has an eye for the tactics of practical common sense.' गोखल्यांनी हिंदुस्तानास वसाहतीचे स्वराज्य प्राप्त करून घेणे हे आपले ध्येय आहे असे मोर्ले यांस स्पष्टपणे सांगितले. परंतु तत्त्वज्ञ मोर्ले काय म्हणतो पहा:- 'I equally made no secret of my conviction, that for many a day to come- long  beyond  the short span of time that may be left to us- this was a mere dream.' वसाहतीचा दर्जा हिंदुस्तानास देणे म्हणजे मोर्ले  यांस स्वप्न वाटत होते. या वेळेस मंत्रिमंडळाने किंवा पार्लमेंटने  जास्त सुधारणांचे हक्कही दिले असते. परंतु देणारे देते आणि कोठावळ्याचे पोट दुखते! मोर्लेसाहेबांस हिंदुस्तान योग्य दिसत नव्हता. त्यांस हिंदुस्तानास अल्प स्वल्प अधिकारी देणे हिताचे वाटत होते. मोर्ले साहेबांचा कंजूषपणा पाहिला म्हणजे छानदार लिहिणारा गडी मनाने किती कृपण व संकुचित असतो हे आढळून या बहुरुपी जगाची गंमत वाटते. आपल्या सुंदर व तत्त्वपूर्ण विचारांनी जगास झुलविणा-या कलमकुशाग्रणींचे  हे कार्पण्य  व व्यवहारातील अनाठायी कठोरता पाहून मन उद्विग्न होते व या तकलुपी, वरपांगी लिहिणारांची कीव येते.

मोर्ले साहेबांस हिंदुस्तानास थोडे हक्क देण्यास ही वेळ योग्य आहे, असे स्पष्ट दिसत होते. ते जरा ऐटीने गोखल्यांस म्हणतात, 'ज्याच्यावर मंत्रिमंडळाचा आणि कॉमन्स सभेचा विश्वास आहे असा सेक्रेटरी सुदैवाने तुम्हांस लाभला आहे, तुमचा व्हाइसरॉय हाही सुधारणा द्याव्या याच मताचा आहे. देशातील इतर सरकारी अधिकारी व्हाइसरॉयच्या विरुध्द जाणार नाहीत. परंतु  या सुधारणा देण्याच्या बाबतीत येऊन जाऊन अडचण येईल, मोडता येईल तो तुमच्या देशातील वेडया व जहाल लोकांचा.' मोर्लेसाहेब म्हणतात -

'Only one thing can spoil it. Perversity and unreason in your  friends. If they keep up  the ferment in  E. Bengal that will only make it hard, or even impossible of Government to move a step. I ask you for no sort of engagement; you must of course be the judge of your own difficulties. So be it. We are quite earnest in our resolution to make an effective move. If your speakers or your newspapers set to work to belittle what we do, to clamour for the impossible then all will go wrong.'

मोर्ले याची मुत्सद्देगिरी वरील उता-यात आहे. 'तुमच्या देशातील अत्याचार बंद करा, नाहीतर काही देत नाही.' अशी ही धमकी होती. गोखल्यांनी कबूल केले की, मी हिंदुस्तानातील माझ्या मित्रांस लिहितो की, शांतता राखा.  ही कामगिरी करीत असताना गोपाळराव इतर कामेही करीत होते. त्यांच्या खटपटीने आणि वजनाने सभाबंदीचा कायदा रद्द करण्यात आला; राष्ट्रीय गीते आणि मिरवणुकी यांस येणारे अडथळे नाहीसे झाले. शाळांतून हाकलून दिलेल्या मुलांना पुन: शाळेत जाण्यास परवाना मिळाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel