''For one thing, I would ask you specially to help this young society. It is because he demanded that everyone who came into it should study before he acted and should know before he spoke. Five years of silence he imposed on those who came to him before they might write on those who came to him before they might write or speak or try to guide their fellowmen and there he showed his wisdom and the secret of his power for he never spoke save with knowledge behind speaking, and those who try to emulate his example must also learn before they begin to teach.'' अशा रीतीने तरुण सुशिक्षित करावयाचे. नंतर देशासाठी, त्यांनी सोसायटीच्या भिक्षा-झोळीतून जो घास मिळेल त्यावर तृप्त राहून निरहंकार वृत्तीने आणि निरपेक्षपणे काम करणे हे कठीण तर खरेच, परंतु असे करण्यासाठी जेव्हा हजारो तरुण पुढे येतील तेव्हाच थोडा तरी भाग्योदय जवळ आला असे म्हणता येईल. स्वप्नात सुध्दा देशाचे विचारच मनी यावे, खेळावे आणि कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यात जागृतपणाचा वेळ जावा-यापेक्षा उच्चतम आयुष्यक्रम कोणता आहे? या कठीण कार्याला लोक वाहून घेतील की नाही अशी शंका चिरोलसाहेबांनी आपल्या पुस्तकात प्रदर्शित केली आहे, लोक परमेश्वरप्राप्तीला-पारलौकिक हितास्तव स्वार्थावर निखारा ठेवितील, घरदार सोडतील, मानापमानाचे गाठोडे गुंडाळतील; परंतु जेथे पारलौकिक हिताचा प्रश्न नाही; जनसेवेचे खडतर व्रत- ऐहिक कामच जेथे आहे तेथे लोक धावणार नाहीत, असे हिंदी मनाबद्दल कोती समजूत करून घेणा-या चिरोलसाहेबांस वाटले, ते म्हणतात-
''will The Servants of India find the same permanent inspirations in the cult of an Indian Motherland, however highly spiritualized, that has no rewards to offer either in this world or in any other?''
'जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपि गरीयसी' असे आमच्याकडेही सांगतात. परोपकार करणे म्हणजे परमेश्वरास संतुष्ट करणे हे हिंदवासी पूर्णपणे जाणतात भारतसेवक समाजाच्या नियमावलीत 'God' हा शब्द कोठेही नसला, तरी ज्या ईश्वराच्या लेकरांसाठी, ज्यांच्या हितासाठी हा संघ स्थापन झाला होता, त्या संघात सामील होण्याने आपल्या देशाचेच नव्हे पर परमेश्वराने नेमून दिलेले, त्याला आवडेल असेच काम आपण करीत आहो ही प्रत्येकाची भावना न होणे अपरिहार्य आहे. समष्टीच्या हितात व्यष्टीचे हित विसरणे, समष्टीचे हित तेच व्यष्टीचे हित असो वा नसो, व्यक्तीने तेच विशेषत: करावे असे आमचा धर्म शिकवितो. व्यष्टीचे हित व्यष्टीने अंतरंगी सुधारत जाणे यात आहे व तदनुसार नंतर इतरांस मार्ग दाखविणे म्हणजेच समष्टीच हित. चिरोलसाहेबांस ही शंका का आली हे आम्हास समजत नाही. 'जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले। तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा' किंवा 'दया क्षमा शांती । तेथे देवाची वसती॥' या व अशा प्रकारच्या शेकडो उद्गारांवरून हिंदुधर्माचे उज्ज्वल स्वरूप हेच दिसते की, ईश्वर स्वर्गात विलसत नसून तो प्रत्येकाच्या हृदयसिंहासनावर अधिष्ठित झालेला आहे. तेव्हा वरच्या अभंगात दर्शविल्याप्रमाणे जो सर्वांस आपल्या कुटुंबाप्रमाणे लेखतो त्याच्या जवळ पारलौकिक प्रश्नच उरत नाही. परलोकात जे मिळवावयाचे ते त्याच्या हृदयमंदिरात येऊन बसलेलेच असते. हिंदू लोकांस जनसेवा म्हणजे धार्मिक भावनामय परमेश्वरास आवडणारे कृत्यच वाटते. भिका-याला दान करणे किंवा रस्त्यावरचा दगड दूर करणे या साध्या गोष्टीतही धार्मिक भावना आहे. जर साधारण मनुष्यालाही प्रत्येक गोष्ट धर्ममय वाटते तर जनसेवेसारखे लोकोत्तर नैष्ठिक व्रत ज्याने घेतले त्याला धार्मिक स्फूर्ति का वाटू नये?