अशा प्रकारे मोर्ले साहेबांजवळ खलबते व मुलाखती चालू असता अन्य द्वारे देशसेवा करण्याचे आपले कर्तव्य स्वसुखनिरभिलाषी गोखले करीतच होते. लंडनमध्ये 'ईस्ट इंडिया असोसिएशन' म्हणून एक संस्था आहे. मिस मॅनिंग या सन्मान्य स्त्रीच्या देखरेखीखाली या संस्थेची वार्षिक सभा 'इम्पीरियल इन्स्टिट्यूट'मध्ये भरली होती या सभेपुढे गोपाळरावांनी स्वराज्य (Self Government) या विषयावर एक निबंध वाचला. हा निबंध फार उत्कृष्ट आहे. त्यात ब्रिटिश राजसत्ता हिंदुस्तानात आल्यापासून तिचे थोडक्यात पर्यालोचन केले आहे. नंतर निरनिराळ्या वेळी दिलेली वचने व जाहीरनामे यांची आठवण देऊन - 'Good Government could never be a substitute for Government by the people themselves.' हे इंग्लंडच्या प्रधानाचे महत्त्वाचे वाक्य त्यात सांगितले आहे. हिंदुस्तानातील सर्व बड्या जागा गो-यांनी अडविल्या आहेत, जास्त अडवू पाहत आहेत आणि तरुण, सुशिक्षित व लायक माणसांस चांगल्या जागा मिळत नाहीत; उद्योगधंदे बुडत चालले; दारिद्रय वाढत चालले; शिक्षणाच्या नावाने तर आवळ्यायेवढे पूज्य; असा सर्वत्र नन्नाचा पाढा हिंदुस्तानास ऐकू येत होता. असे का व्हावे? जपानने आपली सर्वतोपरी भरभराट पाचपन्नास वर्षांत करून दाखविली आणि जगास थक्क केले. हिंदुस्तानामध्ये हे निदान सुधारलेल्या राज्यकर्त्यांच्या शंभर वर्षांच्या कारकीर्दीत तरी झाले पाहिजे होत, परंतु झाले नाही आणि आणखी शंभर वर्षे जरी गेली तरी होईल असे दिसत नाही. लोक सुशिक्षित होऊ द्यात मग आम्ही त्यांस जास्त जास्त शिक्षण मिळाले म्हणजे राज्यकारभारातही घेऊ. परंतु हे शिक्षण मिळणार कधी? आणि ते जर कधीच मिळणार नसेल तर राज्यकारभारातही भाग कधीच मिळणार नाही हे उघड आहे. गोपाळराव म्हणाले: आम्हांस काही एकदम आजच स्वराज्य नको. परतु आज काही तरी जास्त हक्क दिल्याखेरीज गत्यंतर नाही. हे हक्क म्हणजे गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलात, एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलमध्ये आणि स्टेट सेक्रेटरीच्याही कौन्सिलात भरपूर सुधारणा करणे, त्याप्रमाणे जिल्हाधिका-यांस मदत व सल्ला देण्यात प्रांतानिहाय व जिल्हानिहाय बोर्डे असावी. प्रथम दोन तीन वर्षे ही केवळ सल्ला देणारी असावी. परंतु पुढे त्या बोर्डांचा जिल्हाधिका-यांवर दाबही आसावा. अशा प्रकारच्या सुधारणा अत्यंत जरुरीच्या म्हणून गोपाळरावांनी सुचविल्या. यानंतर थोड्या दिवसांनी गोखले हिंदुस्तानात परत आले.
डिसेंबर १९०६ ची अंत्यंत संस्मरणीय काँग्रेस कलकत्त्यास भरावयाची होती. या वर्षी नवीन राष्ट्रीय पक्षाचे प्रणेते टिळक हेच अध्यक्ष व्हावयाला पाहिजे होते. टिळकांनी बनारसच्या काँग्रेसच्या वेळीच बहिष्कारावर निराळा ठरावा व्हावा असा हट्ट धरला होता आणि हा बहिष्कार सर्वप्रांतीय व्हावा असे त्यांचे रास्त म्हणणे होते. याच गोष्टीने बंगालला खरी सहानुभूती दाखविता येणे शक्य होते. परंतु त्यावेळी बहिष्काराचा निराळा ठराव पास झाला नाही. काँग्रेसमध्ये बहिष्कार या शब्दाला मान्यता मिळाली, आणि गोखल्यांनी अध्यक्षस्थानावरून त्या शब्दास संमती दिली. यावरच टिळक यांनी त्या वेळेस संतोष मानिला. पुढच्या वर्षी आणखी पुढे जाऊ, अशी त्यांनी मनी गाठ बांधून ठेविली. टिळकच अध्यक्ष पाहिजेत असा पालबाबूंनी धौशा आरंभिला. मुंबईच्या फेरोजशहांस हे पसंत नव्हते. आता राष्ट्रीय सभेवर मोठी आपत्ती कोसळणार असे त्यांस वाटू लागले. टिळकांस अध्यक्ष होऊ देता कामा नये यासाठी त्यांनी निराळाच व्यूह रचला. मुंबईच्या सिंहाला बंगालच्या सुरेंद्राने साहाय्य देण्याचे ठरविले. अॅग्लो - इंडियन पत्रेही प्रागतिकांना गोंजारू लागली. या जहाज मंडळींना जर काँग्रेस अनुकूल झाली तर राष्ट्राचे तारू भडकेल आणि त्याला नीट तारून नेणे अशक्य होईल अशी त्यांनी हाकाटी सुरू केली. याच पत्रांनी १९०५ मध्ये गोखल्यांसारख्यांसही गालिप्रदान करण्यास मागेपुढे पाहिले नाही. कारण त्यांनी बहिष्कार न्याय्य ठरविला होता. परंतु आता राष्ट्रीय पक्ष प्रबळ होणार हे पाहून या अॅग्लो - इंडियनांस उकळी फुटली आणि प्रेमाचे भरते आले. परंतु 'अंतरींचा हेतु वेगळाचि' हे इंगितज्ञांसतच समजून येते. सुरेंद्रनाथांचे उजवे हात जे भूपेंद्रनाथ बसू यांनी दादाभाईंस तार केली. 'राष्ट्रीय सभा मोठ्या आपत्तीत आहे. आपण तीस तारणार नाही का?' अशा अर्थाची ही तार होती. ही तार करतान देशातील इतर पुढा-यांचा, स्वागतकमिटीचा, कोणाचाही सल्ला घेण्यात आला नव्हता; देशावर येणा-या आपत्तीमुळे या देशभक्तांस धीर धरवला नाही आणि दादाभाईंस अध्यक्ष होण्यास त्यांनी बोलाविले. दादाभाईंसारख्या देशाच्यासाठी सर्व आयुष्य घालविणारा महर्षी अशा वेळी जकार कसा देईल? त्यांनी अध्यक्ष होण्याचे कबूल केले. दादाभाईंच्या अध्यक्षस्थानी योजनेस विरोध कोण आणि कोणत्या तोंडाने करणार? परंतु हे एकंदर करणे कपट-नाटक होते असे म्हणण्यास आम्हांस यत्किंचितही दिक्कत वाटत नाही. हे देशातील रास्त मतास पायांखाली तुडविण्यासारखे होते. सरकारच्या कृष्णकारस्थानांसच काही हसावयास नको! परंतु करावयाचे काय? आपलेच दात आणि आपलेच ओठ! आजपर्यंत ज्या काँग्रेसमध्ये 'हम करे सो कायदा' असे वागलो त्याच काँग्रेसमध्ये आपणास मान वाकवावी लागले ही कल्पनाच या पुढा-यांस सहन होत नव्हती. आजपर्यंत जसे चालले तसेच पुढे चालावे असे यांचे पोक्त सांगणे असे. परंतु काळ बदलत आहे याकडे याचे लक्षच नसे. १८८५ ते १९०६ या वीस वर्षांत हिंदुस्तानात किती तफावत पडली होती हे या पुढा-यांनी जर पाहिले असते, आणि सरकारची वाढती बेपर्वाई जर नि:पक्षपातपणे पाहिली असती तर काँग्रेसच्या धोरणात फरक करणे त्यांसही इष्ट वाटले असते. परंतु एकाच वस्तूचे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे प्रतिबिंब पडते, हा प्रकृतिभेद आहे; आणि 'स्वभावो दुरतिक्रम:' हा अबाधित नियम आहे; असो.