१९१२ च्या मार्च महिन्यात २२ तारखेस जी मॉस्लेम लीगची बैठक झाली तेथे सरोजिनीबाईंस आमंत्रण होते. तेथे बाईंनी अत्यंत महत्त्वाचे, जोरदार व वक्तृत्वपरिपूर्ण असे भाषण केले. ऐक्याची देशास किती जरुरी आहे हे आपल्या रसाळ, काव्यमय परंतु स्फूर्तिदायक वाणीने त्यांनी मुसलमानांस पटविले. लखनौस हिंदूंबरोबर सहकार्य करण्याचा ठराव बहुमताने पास झाला. काम संपताच सरोजिनीबाई एकदम थेट पुण्यपत्तनी आल्या. गोपाळरावांस आपण समक्ष झालेली हकीकत कोहा सांगू असे त्यांस झाले होते.
२६ मार्च रोजी नामदार परांजप्यांसह सरोजिनीबाई गोपाळरावांस भेटण्यासाठी भारत सेवक समाजाच्या सदनात गेल्या. गोखले अशक्य झाले होते, तरी त्यांच्या उद्योगी स्वभावानुसार हा लेख वाच, ते स्फूट पाहा असे ते करीत. मुस्लिम लीगवरील टीका ते वाचीत होते. रिकामपण कसे ते त्यांस माहीतच नव्हते. इतक्यात सरोजिनीबाईंस पाहताच 'आपले म्हणणे खरे होणार, आपली इच्छा सफळ होण्याच्या मार्गास लागली हेच कळविण्यात आला ना इतक्या तातडीने?' असे ते एकदम म्हणाले. भराभर प्रश्नांचा भडिमार त्यांनी सुरू केला. सर्व वृत्त यथावत जाणून घेतले. गोपाळरावांच्या फटफटीत चेह-यावर प्रसन्नतेची छटा दिसू लागली. सरोजिनीबाई म्हणाल्या, 'राष्ट्रीय सभेनेही मुस्लिम लीगकडे सहानुभूतीची दृष्टी ठेवली पाहिजे. मी मुसलमानांस तसे वचन दिले आहे.' गोपाळराव म्हणाले 'माझ्या हातात जेवढे आहे तेवढे करण्यास मी कमी करणार नाही.' नंतर बाई जाण्यास निघाल्या. 'पुन: दोनप्रहरी या' असे गोपाळराव बोलले.
दुपारी सरोजिनीबाई एकट्याच गोखल्यांकडे आल्या. गोखले खाली होते. एखाद्या चंडोलाप्रमाणे ते आनंदी दिसले. त्यांची खिन्नता व उद्विग्नता लयास गेली होती. आशेचा किरण डोळ्यांसमोर पुन: चमकू लागला. भराभरा जिन्याच्या पाय-या चढून ते सरोजिनींस वरती घेऊन चालले. 'तुम्ही फार अशक्त व आजारी आहां; या पाय-या तुम्ही कसे चढणार?' असे बाई कळकळीने म्हणाल्या. गोखले म्हणाले, 'You have put new hopes into me; I feel strong enough to face life and work again.'