याप्रमाणे दोघां भावांचे शिक्षण चालले असता अकस्मात् संकट ओढवले. कोणालाही न चुकणारा, कधी तरी येणारा मृत्यूचा हल्ला गोपाळरावांच्या वडिलांवर आला. मुले अद्यापि शिकत होती. घरात मिळविते कोणी नाही अशा वेळी कुटुंबवत्सल माणसाची एकाएकी मृत्यूने उचलबांगडी करावी हे कठोर वाटते. कर्ता माणूस मृत्यूमुखी पडला असता घरातील इतर मंडळीची जी दु:खप्रद व अनुकंपनीयि स्थिती होते तीच या भावांची झाली. गोपाळाची आई अंताजीपंताकडे गेली आणि गोपाळाच्या वडील भावास नौकरी शोधावी लागली. शिक्षणाची कायमची रजा गोविंदास घेणे भाग पडले. परिस्थितीला तोंड देणे जरूर होते आणि ते धैर्याने व नि:स्वार्थ बुध्दीने गोविंदाने दिलेही. चुलत्याकडे आई गेली होती, परंतु ती पुन: लवकरच परत आली. कागल संस्थानचे अधिकारी रावसाहेब विष्णु परशुराम वैद्य यांच्या मध्यस्थीने गोविंदास कारकुनीची जागा मिळाली. या वेळेस गोविंदाचे वय आठरा वर्षांचे होते आणि गोपाळ तेरा वर्षांचा होता. सेवाधर्माचा भुंगा गोविंदास लावून घेणे भाग पडले. परंतु कुटुंबाच्या पोषणासाठी व आपल्या भावाच्या शिक्षणासाठी त्यास तसे करणे प्राप्त होते. आपले शिक्षण पुरे झाले नाही तरी आपल्या भावाचे शिक्षण पुरे व्हावे ही सदिच्छा त्यांच्या अंतरंगी वसत होती. या रोपटयास आज पाणी घातले तर त्याचा वृक्ष होऊन त्याच्या शीतल छायेत आपणास बसावयास मिळेल आणि आपले पांग गोपाळ फेडील या भावी आशेने आज गोपाळासाठी ते झीज सोशीत होते. परंतु हे कार्य करण्यात गोविंदराव हे अनपेक्षित रीतीने देशावर महदुपकार करीत होते. हा वृक्ष त्यांनाच सुखविणार नव्हता तर नोकरशाहीने संतापविलेल्या आपल्या देशबांधवांसही शांतविणार होता, असो.
गोपाळाच्या शिक्षणासाठी ते दरमहा १० रुपये पाठवीत असत. कारकुनाचा पगार तो केवढा असणार आणि त्यात संस्थान ! परंतु गोविंदरावांनी आपल्या भावाची आबाळ होऊ दिली नाही. स्वत:च्या पोटास त्यांनी वेळ-वखत चिमटा घेतला. परंतु गोपाळाचे अडू दिले नाही. गोपाळानेही आपल्या भावाच्या पैशाचे चीज केले. उधळपट्टी ही त्याला माहीतच नव्हती. हल्ली आपण याच्या विपरीत देखावे कितीतरी पाहतो. मुलाच्या भावी वैभवाच्या मनोराज्यात दंग होऊन बाप मुलाला पैसे पाठवीत असतो. स्वत: ढोंपरपंचा नेसून हाडाची काडे करून मुलाच्या गरजा भागवितो. परंतु बापाकडे बेटयाचे लक्ष असते काय? ऐट करावी, कपडयाच्या झोकात असावे, सुंदरशी यष्टि हस्त-करकमलात धारण करावी, आणि सिनेमा, नाटकगृहे यांस आपल्या पदधुलीने पावन करावे हा याचा स्तुत्य कार्यक्रम असतो ! कोटबुटांत पैसा उडतो आणि बापास व बेटयास अंती कपाळास हात लावावा लागतो ! गोपाळाची वागणूक चोख. सत्याचा अपलाप मरण आले तरी गोपाळ करावयाचा नाही. या गुणाचा गोपाळास भावी आयुष्यात उपयोग झाला. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून वेळ मारून नेता आली असती असे प्रसंग पुढील जीवनक्रमांत त्याच्यावर आले. परंतु त्याने सत्यालाच श्रेष्ट मानले. सत्याचेच सिंहासन बसावयास पसंत केले. आपला भाऊ आपणास किती दगदगीने मिळवून पैसा पाठवितो याची जाणीव त्याच्या कर्तव्योन्मुख मनात सदैव जागृत असे. तो भावास दरमहा हिशोब पाठवीत असे.